शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (15:56 IST)

कोरोना पॉझिटिव्ह आमदार आंदोलनात सहभागी, पाच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पटोले यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी भाजप नेत्यांमध्ये सध्या चढाओढ दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून पटोले यांच्याविरोधात भाजप नेते आणि कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. अशात नागपुरमध्ये भाजपचे कोरोना पॉझिटिव्ह आमदार आज शंभर कार्यकर्त्यांसह नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्यासमोर दाखल झाले. या कोरोना पॉझिटिव्ह आमदारांचं कृष्णा खोपडे असं नाव आहे. 
 
भाजप आमदार कृष्णा खोपडे हे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. खोपडे यांनी भाजपच्या 100 कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं. खोपडे हे 13 जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याबाबत त्यांनी स्वत: ट्विटरवर माहिती दिली होती. विशेष म्हणजे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी आमदार खोपडे हे कार्यकर्त्यांसह आंदोलनात दिसले. 
 
कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत असताना लोकप्रतिनिधींनीच अशाप्रकारे बेजबाबदार वागणं किती जनहिताचं आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. आंदोलनामध्ये कृष्णा खोपडे अनेक वेळेला विनामास्क दिसून आले. दरम्यान, खोपडे यांना कोरोना विषयी विचारलं तेव्हा त्यांनी मला कुठलीच लक्षणे नाहीत तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ला घेऊनच आपण बाहेर पडल्याची प्रतिक्रिया दिली.
 
दरम्यान, महानगरपालिकेने नागपुरात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोना संक्रमित व्यक्तीला किमान सात दिवसाचा गृह विलगीकरण आवश्यक आहे. 7 दिवसाच्या गृह विलगीकरणाच्या अखेरचे तीन दिवस कोणतीही लक्षण नसणे आवश्यक आहे. अशात आमदार कृष्णा खोपडे यांनी आंदोलनात सहभाग घेऊन कोरोनाच्या नियमांचा भंग केला असून सार्वजनिक जबाबदारीचा भान विसरले का? असे प्रश्न या निर्माण झाले आहेत.