मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2016 (17:00 IST)

नोटाबंदी विरोधात मतदानातून व्यक्त व्हा – धनंजय मुंडे

dhananjay munde
काळा पैसा बाहेर काढण्याचे आश्वासन देत केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला पण त्याचा सर्वात जास्त त्रास सामान्य जनतेला झाला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात मतदानाच्या माध्यमातून व्यक्त व्हा असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी मतदारांना केले. ते  उदगीर येथील सभेत बोलत होते. उदगीर नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर शेख आणि नगरसेवक पदाच्या अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केली गेली होती. यावेळी मंचावर माजी मंत्री जयंत पाटील, निरीक्षक जीवनराव गोरे, प्रदेश सरचिटणीस बस्वाराज पाटील नागराळकर, संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, कार्याध्यक्ष बबन भोसले, निरीक्षक पप्पू कुलकर्णी, अध्यक्षपदाचे उमेदवार समीर शेख, नगरसेवक पदाचे उमेदवार आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचावर सडकून टीका केली. ते म्हणाले की एक व्यक्ती देशातील १२५ कोटी जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकण्याचे खोटे स्वप्न जनतेला दाखवले. मोदी म्हणाले होते की नोटाबंदीचा निर्णय काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आहे पण काळा पैसा असलेला एकही माणूस बँकांच्या रांगांमध्ये दिसला नाही. या निर्णयामुळे सामान्य माणुसच अडचणीत सापडला आहे. या त्रासाचा वचपा काढण्यासाठी नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला संधी मिळाली आहे, तेव्हा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करत, आपल्या असंतोषाला वाचा फोडा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.