शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (22:51 IST)

पोलीस महासंचालक अ‍ॅक्शन मोडमध्ये; मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिला ‘हा’इशारा

dilip valse patil raj
राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला चार तारखेचा अल्टीमेटम दिला होता. तो उद्या संपत आहे. त्या अनुषंगाने आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांची बैठक घेतली. त्यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेला आवाहन केले आहे.
 
यावेळी बोलतांना पोलीस महासंचालक म्हणाले की, नुकतीच गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यात सक्षम आहे. या पूर्वी समाजकंटक व गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तसेच आमची पूर्ण तयारी असून कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यसाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली आहे.
 
पुढे बोलतांना पोलीस महासंचालक रजनीश शेठ म्हणाले की, सामाजिक एकोपा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणे पोलिसांची जबाबदारी आहे. कोणीही ते बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे मी राज्यातील जनतेला आवाहन करतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
 
तसेच राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “औरंगाबादचे पोलीस आयुक्तांनी भाषणाचा अभ्यास केला आहे. त्यासंबंधी आवश्यक ती कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. जी कारवाई करायची आहे ते ती करतील. पोलीस महासंचालक पुढे म्हणाले की, कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत, असे रजनीश शेठ यांनी सांगितले आहे. तसेच १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना १४९ ची नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती रजनीश शेठ यांनी दिली आहे.