शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (10:36 IST)

मी पुन्हा त्वेषाने उभा आहे, जिंकणार म्हणजे जिंकणारच - उद्धव ठाकरे

uddhav thackeray
मी पुन्हा त्वेषाने उभा राहिलो आहे, या लढाईत मी जिंकणार म्हणजे जिंकणारच, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून बुलडाणा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
 
एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, "काय झाडी, काय डोंगार सगळंच ओके म्हणत ते गुवाहाटीला गेले आहेत. त्यांना आशीर्वाद घेण्यासाठी तिथे जावं लागलं, मात्र मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी या शेतकरी मेळाव्याला बुलडाण्यात आलेलो आहे."
 
"मी पुन्हा नव्या दमाने, त्वेषाने उभा आहे. जिंकणार म्हणजे जिंकणारच. माझा आत्मविश्वास तुम्ही आहात," असाही विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
 
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
 
* दसऱ्याचा मेळावा आपला परंपरेप्रमाणे झाला. तेव्हाच मी ठरवलं होतं, मुंबईबाहेरची माझी पहिली सभा बुलढाण्यात जिजाऊंच्या जन्मस्थानी घेईन.

* मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचे आशीर्वाद घेऊनच पुढे जावं लागेल.

* आज शहीद दिन आणि संविधान दिनही आहे. संविधान दिनाच्या शुभेच्छा द्यायचं म्हटलं तर संविधान सुरक्षित आहे का, इथून सुरुवात होते.

* काही दिवसांपूर्वी मी आणि प्रकाश आंबेडकर एका व्यासपीठावर आलो होतो. लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत.

* 40 रेडे घेऊन ते गुवाहाटीला गेले होते. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवतीर्थावर शपथ घेऊन अयोध्येला गेलो होतो.

* आज ते नवस फेडायला तिथे गेले आहेत. गेल्या आठवड्यात ते हात दाखवायला गेले होते.

* ज्याला स्वतःचं भविष्य माहीत नाही, ते आपलं भविष्य ठरवणार. तुमची हात की सफाई संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे.

* तुमचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषीला विचारून उपयोग नाही. तुमचं भविष्य तुमच्या दिल्लीतील मायबापांना विचारा. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं.

* हिंदुत्व वाचवायला म्हणून शिवसेना सोडून हे निघाले आहेत. मी बुलडाण्याला आल्यानंतर मला काही जुने चेहरे दिसत नाहीत. पण जुने होते ते फसवे होते.

* इथे जमलेले मर्द मावळे हे अन्याय जाळायला निघालेल्या या मशाली आहेत.

* आपलं सरकार व्यवस्थित चाललं होतं. पण हे सरकार पाडलं गेलं.
 
* ही तुमची चालूगिरी आहे, ते लोक बघत नाहीयेत का? आपणही 25-30 वर्षांपासून भाजपसोबत होतो. आज तो आयात पक्ष झालेला आहे. विचार संपले, नेते संपले, आज तो भाकड पक्ष झालेला आहे.

* तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत यादी काढा, यांच्या पक्षात आयात केलेली किती लोक आहेत.

* आजसुद्धा एक धूड आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. स्वतः चंद्रकांत पाटील बोलले आहेत. आम्ही मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतलेला आहे. आयात पक्षाची चाललेली दादागिरी आपल्या मर्द मावळ्यांना मोडता येणार नाही का, हा पक्ष आहे की चोरबाजार आहे, असा सवाल ठाकरे यांनी विचारला.

* या गद्दार आमदार-खासदारांना मला एक प्रश्न विचारला आहे. त्यांच्यामध्ये अजूनही मर्दानगी शिल्लक असेल तर आम्ही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार नाही, असं त्यांना सांगावं.

* यांना नाव बाळासाहेबांचं पाहिजे, चेहरा बाळासाहेबांचा पाहिजे, शिवसेनेचं नावही पाहिजे. पण आशीर्वाद बाळासाहेबांचा पाहिजे आहे. मग तुमची मेहनत कुठे आहे, असं ते म्हणाले.

भावना गवळींवर टीका
शिंदे गटातील खासदार भावना गवळींवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आपल्या पलिकडच्या ताईंना आपण कितीवेळा खासदार केलं. इथल्या गद्दारांना तुम्हीच राबून आमदार खासदार केलं होतं. "ताईंना अनेक धमक्या देण्यात आल्या. खास मुंबईतून त्यांचे दलाल इथे पाठवण्यात आले होते. त्यांच्यावरचे आरोप वाचले गेले. ताईंच्या चेल्या-चपाट्यांना अटक झाली. पण ताई मोठ्या हुशार आहेत. ताईंनी जाऊन थेट पंतप्रधानांना राखी बांधली.
 
"तो फोटो छापून आणला. तो फोटो छापून आल्यानंतर ईडी-सीबीआय वाल्यांची ताईंना काही करण्याची हिंमत आहे का?"
 
Published By- Priya Dixit