रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जुलै 2018 (09:13 IST)

आंदोलकाच्या दुर्दैवी घटनेस पोलिस व प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा कारणीभूत - जयंत पाटील

"मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आगर कांनडगांव इथे काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात जलसमाधी घेतली. ही घटना दुर्दैवी असून या आंदोलना दरम्यान प्राण गमवावे लागलेल्या शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा भावना प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या.
 
या घटनेच्या निषेधार्थ प्रशासनावर आरोपांच्या फैरी झाडताना ते पुढे म्हणाले, "आषाढी एकादशीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेस पोलिस व प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा जबाबदार आहे, आंदोलनकर्त्या तरुणांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने काकासाहेब शिंदे या आंदोलकाचा बळी घेतला आहे."
 
याआधी मराठा समाजाने शांतपणे लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले, इतके दिवस उलटूनही सरकारने अद्यापही मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. मराठा क्रांती मोर्चामधील तरूणांनी निवेदन दिले असताना आणि अशी घटना घडू शकते याबाबतची माहिती असतानाही प्रशासनाने कोणतीही आवश्यक खबरदारी घेतली नाही वा घटना रोखण्यासाठी पावले उचलली नाहीत, त्यामुळे प्रशासनाची दिरंगाईच यासाठी कारणीभूत असल्याची टीका आ. पाटील यांनी केली आहे.
 
"या सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या, मुस्लिम आणि लिंगायत समाजाचे आरक्षण प्रलंबित आहे. ओबीसी समाजातील सर्व घटकांना सरकारने फसवी आश्वासने दिली, आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. दलित समाजातही असंतोष आहे. आरक्षणाबाबत पुनर्विचार करण्याची भाषा केंद्रीय मंत्री करतात. सरकारची पलायनवादी भूमिका याला कारणीभूत आहे. त्यामुळे सर्वच समाजांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे. एवढी अशांतता, अस्थिरता याआधी महाराष्ट्राने कधी अनुभवली नव्हती," असा उद्वेग आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
 
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणतेही राजकारण करायचे नाही. आपल्या देशात लोकशाही आहे. तुम्ही मतांच्या माध्यमातून आपली नाराजी प्रकट करा, असे आवाहन त्यांनी आंदोलकर्त्या तरूणांना केले. तसेच सरकारने जनतेचा अंत पाहू नये, आरक्षणाबाबत त्वरित भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन आ. जयंत पाटील यांनी केले.