दिल्लीतील शेतकऱ्या प्रमाणे आंदोलन चालवू; राजू शेट्टींची घोषणा
गेल्या दिडएक महीन्यांपासून सुरु असलेल्या उसदर आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज चौथी बैठक पार पडली. आम्ही एक नव्हे तीन पाऊले मागे आलो आहोत तरीही साखर कारखानदारांनी आपला हट्टीपणा सोडला नसल्याचा आरोप आंदोलनाचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या उपस्थितीत झालेली बैठक पुन्हा एकदा फिस्कटली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्याचं खापर साखर कारखानदारांवर फोडलं आहे.
बैठकीनंतर आक्रमक झालेल्या राजू शेट्टी यांनी आम्ही नरमाईची भुमिका घेतली असताना साखर कारखानदार संघटनेला जुमानत नसल्याचा आरोप केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आम्ही जी काही मागणी करत आहे ती जगावेगळी नाही. आम्ही गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला जादा पैसे मागतो आहोत. 400 ची जरी मागणी असली तरी त्यात मागेपुढे काहीतरी होईल. पण साखर कारखानदारांनी हे पैसे दिलेच पाहीजेत. 400 रूपयांची मागणी सोडून 100 रुपयांवर आलेलो आहोत आता यामध्ये 1 रूपया पण कमी होणार नाही. तेव्हडं द्यावच लागेल त्याशिवाय कारखाने सुरु होणार नाहीत.”असा इशारा त्यांनी दिला.