शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (15:25 IST)

गीते यांच्याविधानावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा पलटवार

शिवसेना नेते अनंत गीते यांनी शरद पवार आमचे गुरू होऊच शकत नाही, असं विधान केलं आहे. गीते यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पलटवार केला आहे. महाविकास आघाडी झाली तेव्हा अनंत गीतेंनी पवारांच्या पायाला हात लावला होता.पवारांच्या पाया पडले होते.आणि आघाडी केल्याबद्दल आभारही मानले होते,असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला आहे. 
 
अनंत गीते यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गीते यांच्या आरोपाचा समाचार घेतला. अनंत गीते दोन वर्षे अज्ञातवासात की विजनवासात होते हे माहीत नाही. परंतु, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होत असताना बांद्रा परिसरातील एका हॉटेलमध्ये अनंत गीते आले होते. त्यावेळी त्यांनी आदरणीय पवारसाहेबांना अतिशय वाकून नम्रपणे पायाला हात लावत केलेल्या आघाडीबद्दल आभार मानले. या घटनेचा मी साक्षीदार आहे, असं तटकरे यांनी सांगितलं.
 
अलीकडच्या काळात अनंत गीते यांची अवस्था राजकीयदृष्टया ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशापध्दतीची झाल्यामुळेच वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी वक्तव्य केल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली.अनंत गीते बोलल्याने काही फरक पडत नाही. परंतु सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. आघाडीचे जनक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वच्छपणाने राज्याचे काम करत आहेत.कोविडसारख्या महामारीचा मुकाबला महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करतोय याची प्रशंसा होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांना या सार्‍या कृतीचं भान राहिलेलं नाही, असाही टोला त्यांनी लगावला आहे.