डिजीटल इंडियाच्या नावाखाली कामाचा ताण वाढविण्याचा प्रकार सुरू आहे. ऑनलाईन माहिती भरणे, निकालासंबंधीची कामे, शालेय पोषण आहाराअंतर्गत धान्याचा साठा मोजणे, शासनाच्या योजनेंतर्गत शौचालय बांधकामाचा अहवाल देणे अशा एक ना अनेक गोष्टी शिक्षकांना कराव्या लागत आहेत. विद्यादानाचे काम बाजूला ठेवून ऑनलाईन माहितीचे तक्ते भरण्याची तारेवरची कसरत त्यांना करावी लागत आहे. ऑनलाईन पद्धतीत ग्रामीण भागात नेटवर्क तसेच अनेक मुलभूत सुविधांची वानवा आहे. सरकारने शिक्षकांवर लादलेल्या या अतिरिक्त ओझ्यामुळे शिक्षक वर्ग सध्या तणावाखाली जगत आहे. सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढा देण्यास सज्ज आहे. आमच्या शेतकऱ्यांना, अंगणवाडी सेविकांना आणि शिक्षकांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.