बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (21:13 IST)

पेट्रोल पंप चालकांकडून 31 मे रोजी खरेदी बंद आंदोलन

मुंबई महाराष्ट्रासह देशातील 19 राज्यामध्ये पेट्रोलपंप चालकांनी संप पुकारला असून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद अशा आंदोलनाची हाक दिली आहे. फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनकडून हे आंदोलन 31 तारखेला पूकारले आहे.
 
विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता म्हणाले, 31 मे रोजी सर्व शिल्लक साठ्याची विक्री करण्यात येणार असून फक्त खरेदी केली जाणार नाही. आमच्याकडील शिल्लक असलेले पेट्रोल व डिझेल विकले जाईल. साठा संपल्यावर 31 मे रोजी एक दिवस कोणताही डिलर कंपनीकडून पेट्रोल-डिझेल खरेदी करणार नाही.
फेडरेशनच्या मते, नोटाबंदीसारख्या निर्णयात आम्ही शासनाला पुर्ण सहकार्य केले असून करोनाकाळातही आम्ही जोखीम पत्करून सेवा दिली. पण गेल्या काही वर्षात त्यांच्या भांडवली गुंतवणुकीत दुपटीने वाढ झाली तरी उत्पन्न वाढले नाही. त्याच बरोबर तेलांच्या दरबदलाच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल पंपचालकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. तसेच इंधन दरबदल करताना डिलर्स संघटनांचे मत विचारात घेतले जात नाही. परिणामी दर कमी झाल्यावर डिलर्सचे प्रचंड नुकसान होते. यासाठी पेट्रोल पंप चालकांसाठी शासनाने एक धोरण तयार करण्याची गरज असल्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे असे या संघटनेने म्हटले आहे.