सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (10:12 IST)

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार,नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

Rains in Maharashtra
सध्या महाराष्ट्रात पावसाने उच्छाद मांडला आहे.सर्वत्र पाणीच पाणीच दिसत आहे.सदृश्य पूरस्थिती निर्माण झाली आहे.गुलाब चक्रीवादळाचा कहर सर्वत्र दिसून येत आहे.

मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत 35 जणांचे बळी गेले आहेत. नद्यांना पूर आल्याने जवळपास 4 हजार जनावरं वाहून गेली आहेत. 20 लाख हेक्टरवर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी सुरु असून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळं लोकांनी दोन दिवस सावधानता बाळगावी,असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आवश्यक असल्यास लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व जिल्हाधिका-यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उस्मानाबादमध्ये मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह नदी-नाले ओसंडून वाहतायत. पाणी अनेक गावांमध्ये शिरल्याने धोक्याची परिस्थिती निर्माण झालीय. बीडमधल्या केज, अंबेजोगाई, माजलगाव तालुक्यात पाऊस बरसला. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय.

धुवाधार पावसाने बीड जिल्ह्यात थैमान मांडला आहे. जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव तालुक्तयात परिस्थिती गंभीर दिसून येत आहे. यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुले वाहून गेली आहेत तर धरणे भरली आहे.
 
मध्यरात्रीपासून मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. केज तालुक्तयात बंधारे फुटले आहेत, शेती वाहून गेली आहे तसचे रस्ते बंद करावे लागले आहेत. प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे आणि नागरिकांना सर्तक राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

येथील स्थिती बघून एनडीआरएफ तैनात करण्यात आले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एनडीआरएफचे जवान बोटसहित दाखल झाले आहेत.