रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (09:27 IST)

राज ठाकरे यांचं सीमावादावर पत्रक

raj thackeray
बेळगाव प्रश्नावर सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रात नव्याने चर्चा-वाद सुरू असताना विविध पातळ्यांवर त्याचे पडसाद उमटत आहेत.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन आपली भूमिका प्रसिद्ध केली आहे.  
 
टाईम्स नाऊ मराठीने या पत्रकाची बातमी प्रसिद्ध केली आहे. 
 
या पत्रकात राज ठाकरे म्हणतात, "मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं.
 
"कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा." 
 
"हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका.
 
"येणाऱ्या 2023 च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं." 
 
ते पुढे लिहितात, "अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधं सोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं." 
 
"कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं. "