शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 मे 2022 (15:22 IST)

राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी

राज ठाकरेंची मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेली भूमिका सध्या राज्यात चांगलाच वाद निर्माण करत आहे. या आंदोलनामुळे पोलिसांनी अनेक मनसैनिकांची धरपकड केली असली तर या सगळ्या गोंधळात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेआणि नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या धमक्या देणारं पत्रही आपल्याकडे आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
 
या प्रकरणात नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आणि नंतर माध्यमांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची माहिती दिल्याचंही नांदगावकर यांनी सांगितलं. नांदगावकर यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचीही भेट घेतली होती. 
 
याबद्दल नांदगावकर म्हणाले की मला आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली असून या पत्राची प्रत मी काल पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिली आहे. गृहमंत्र्यांशीही बोलणं झालं आहे. हे पत्र कोणाकडून आलंय याबद्दल माहिती नाही. राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य आणि केंद्र सरकरानेही घ्यावी असे म्हटले.
 
धमकीचं हे पत्र हिंदीतून लिहिलेलं असून या पत्रात काही उर्दू शब्दही वापरण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आपण गृहमंत्र्यांशी बोललो आहे. ते चांगले गृहमंत्री आहे, ते नक्कीच कारवाई करतील, असंही नांदगावकर म्हणाले आहे. हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवं, अशी अपेक्षाही नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.