सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 11 मे 2022 (08:34 IST)

होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

army
मुंबई : नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची अत्यंत गरज असल्याने राज्यातील आपत्ती प्रवण ६ जिल्ह्यांमध्ये २०० होमगार्ड्सना पहिल्या टप्प्यात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती होमगार्डचे उप-महासमादेशक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
 
राज्यातील कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यात चक्रीवादळ, अतिवृष्टी पूरपरिस्थिती, भूस्खलन, इ. कारणाने मोठ्या प्रमाणावर जिवीत व वित्त हानी झाली होती. भविष्यात अशा स्वरूपाची आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास होमगार्ड व नागरी संरक्षण दल प्रशिक्षित व सुसज्य असणे आवश्यक आहे. त्यानुसार महासमादेशक होमगार्ड, डॉ. भुषणकुमार उपाध्याय, उप-महासमार्देशक ब्रिजेश सिंह, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात आपत्ती प्रवण ६ जिल्ह्यांमध्ये २०० होमगार्डना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रम ९  ते दि. २० मे २०२२ या  कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचेशी समन्वय ठेवून संबंधित जिल्हा होमगार्ड कार्यालयांमार्फत देण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन व समारोप प्रसंगी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,पालकमंत्री, आमदार, खासदार व अन्य प्रतिष्ठीत व्यक्ती यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
 
या प्रशिक्षणार्थीना राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (एसडीआरएफ) यांचे मार्फत उत्कृष्ठ दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून हे प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) यांच्याकडून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या धर्तीवर देण्याचा मानस आहे. या प्रशिक्षणामुळे जिल्ह्याच्या प्रशिक्षित मनुष्यबळामध्ये निश्चितच भर पडणार आहे.