राज ठाकरेंनी काढली ‘कोश्यारींची होशियारी’, म्हणाले…
मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या टीकेचे धनी ठरत आहेत. भाजप वगळता सर्वपक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मनसेही राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झाली आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरुद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे मराठी माणसाला डिवचू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रातून दिला आहे.
राज ठाकरेंनी पुढे आपल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?, उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो, अशा शब्दांत राज यांनी कोश्यारी यांना थेट आणि स्पष्ट इशारा दिला आहे.