शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (21:13 IST)

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी नाशिकात सारथी प्रशिक्षण केंद्र; राज्य सरकारची मान्यता

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता आहे. राज्यातील सर्वच महसूली शहरांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे कार्यालय साकारले जाणार आहे. हे केंद्र आता नाशिकमध्ये होणार असून त्यासाठी सहा हजार चौरस मीटर जागेस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या जागेवर अभ्यासिका, मुले व मुलींसाठी वेगवेगळे वसतीगृह तसेच विविध प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. तशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
 
मराठा समाजाच्या विविध मागण्या मंजुर व्हावेत यासाठी गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजातील नेते प्रयत्नशील आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास ( सारथी ) संस्थेचे केंद्र फक्त पुणे येथेच होते.या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका,वसतीगृह आणि इतर प्रशिक्षण दिले जात असते.यासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना पुणे येथील सारथी केंद्रात प्रवेश घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी कुचुंबन होत असे.सारथीचे केंद्र राज्यातील सहाही मुख्यालयी शहरांमध्ये व्हावे यासाठी वर्षभरापासून खा.गोडसे प्रयत्नशील होते.
 
मागील वर्षी खा.गोडसे यांनी तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत राज्यातील महसुली शहरांमध्ये सारथीचे केंद्र व्हावे यासाठी आग्रही मागणी केली होती.यासाठी खा. गोडसे यांनी सतत राज्याकडे पाठपुरावा केला होता.आता या पाठपुराव्याला यश आले आहे. खा.गोडसे यांच्या मागणीची शासनाने गंभीर दखल घेतली असून शासनाने नुकतेच जाहिर केलेल्या प्रसिद्ध पत्रकात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास पुणे या संस्थेचे नाशिक या महसुली शहरात केंद्र उभारणीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.
 
नाशिक शहरातील त्र्यंबकरोडवर असलेल्या पंचायत समिती कार्यालयाजवळील सव्हें १०५६, १०५७ एक मधील ०.६० हेक्टर म्हणजेच सहा हजार चौरस मीटर भोगवटादार दोन या शासकीय जागेवर सारथीचे केंद्र उभारण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता नाशिक विभागातील म्हणजेच नाशिक धुळे जळगाव अहमदनगर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील आदिवासी समाजातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिक्षण ,प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे येथील सारथी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.पुणे येथील सारथी केंद्राच्या धर्तीवरच नाशिक येथे सारथी केंद्र उभारण्यात येणार असून पुणे सारथी केंद्रात असलेल्या सर्व सोयी -सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.