शिवसेना गुंडांचा पक्ष :आ.गिरीश महाजन यांची बोचरी टीका
शिवसेना गुंडांचे समर्थन करणारा पक्ष असून शिवसेनेत गुंड असल्याचे खा.संजय राऊत यांनी मान्य केले आहे. सत्ताधारी पक्षाने गुंडांच्या समर्थनाची भाषा करणे हे राज्याचे मोठे दुर्दैव असल्याची बोचरी टीका माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी केली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे पूरग्रस्तांसाठी मदत रवाना करण्यात आली. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना माजी मंत्री आ.महाजन हे बोलत होते. दरम्यान, यावेळी पंकजा मुंडे यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेबाबतचा प्रश्न गिरीश महाजन यांनी हसत-हसत टाळला तर नितीन गडकरी यांच्या प्रश्नावर त्यांनी असे वक्तव्य मी ऐकून मग बोलेल असे सांगितले.
कोकणातील पूर परिस्थिती बाबत बोलताना महाजन म्हणाले की, कोकणातील परिस्थिती अतिशय भयावह असून दरड कोसळण्याच्या घटनेनंतरही अधिकारी त्याठिकाणी पोहोचण्यास तयार नव्हता. आम्ही मदत करण्यासाठी जात असताना विविध कारणे देत आम्हालाही अडविण्याचा प्रयत्न झाला होता. महाआघाडी सरकारने पूरग्रस्तांसाठी कोणती मदत पोहचवली नसून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा काम केले आहे. सरकारने अद्यापही कोणतीही मदत जाहीर केली नसून केवळ दौरे करण्याचे काम सुरू आहे. सरकार प्रचंड निर्ढावलेले असून त्यांच्याबद्दल बोलण्यास शब्दच नसल्याचे आ.महाजन यांनी सांगितले.