1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 मे 2023 (20:23 IST)

नाशिक शहरात शंभरहुन अधिक उंट का आले होते, याचा अखेर झाला उलगडा…

काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात मोठ्या संख्येने उंट दाखल झाले होते. हे उंट का व कशासाठी आले याचा कोणालाही ठाणपत्ता नसल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं होत. १०० हून अधिक उंट शहरात दाखल झाल्याने सर्वाना आश्चर्य वाटत होते. त्यातच अनेक उंटांची तब्येत खालावल्याने हे उंट कत्तलीसाठी जात असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये होत्या. मात्र हि सर्व अफवा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच या उंटाचे मालक नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.
 
नाशिक मध्ये उंटांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली होती. तसेच ह्या उंटांची संख्या १०० हुन अधिक असल्याने, हे उंट तस्करी साठी जात असल्याच्या चर्चेला नागरिकांमध्ये उधाण आलं होत. त्यात यातील काही उंट जखमी अवस्थेत होते. त्यामुळे नागरिकांचा संशय अधिक वाढल्याने प्राणिमित्रांनी हे उंट तस्करीसाठी हैद्राबादला जात असल्याचा दावा केला. मात्र पोलीस तपासात वेगळी माहिती समोर आली आहे. हे सर्व उंट व त्यांचे मालक नाशिकमधील असून गेल्या काही दिवसांपासून ते गुजरातला वास्तव्यास होते, त्यानंतर ते पुन्हा नाशिकला मार्गस्थ झाले होते. प्रवास करत असताना उंटाची अवस्था खराब होत गेली.
 
गुजरात, राजस्थान सीमा भागातून शेकडो किलोमीटर पायपीट करून आल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती आहे. सद्या या उंटाना नाशिकच्या पांजरापोळमध्ये ठेवण्यात आले आहे, तिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहे. उदरनिर्वाहासाठी या उंटाचे पालनपोषण करत असल्याचा दावा या उंटांच्या मालकांनी केला आहे.
 
नाशिक शहरात दाखल होण्यापूर्वी ही लोक, धुळे, सटाणा, दिंडोरी, मालेगाव भागातून नाशिक शहरात दाखल होत होते. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला या सर्वांची नोंद होत असल्याचे पोलिसांची म्हणणे आहे. त्यानुसार सटाणा पोलिसांनी नाशिककडे सोडताना सर्वांचे आधारकार्ड तपासून नाशिकच्या दिशेने सोडले. त्याचबरोबर गेल्या तीस वर्षांपासून ते नाशिकमध्ये उदरनिर्वाह करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र काम नसल्यावर त्यांनी गुजरात गाठले आणि आता पावसाळ्यापूर्वी पुन्हा नाशिकला प्रस्थान केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
मात्र आता प्रशासन काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले असून नाशिकच्या पांजरापोळमध्ये त्याचे संगोपन केले जाणार का हे बघणे महत्वाचे ठरेल.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor