शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. अष्टगणेश
Written By वेबदुनिया|

अष्टगणेश : लंबोदर

लंबोदरावतारो वै क्रोधासुरनिबर्हण:।
शक्तीब्रम्हाखुग: सद् यत् तस्य धारक उच्यते:।।

लंबोदराचा अवतार हा क्रोधासुराचा विनाश करणारा आहे. श्री विष्णूच्या अनुपम लावण्यसंपन्न रूपाला पाहून शंकर कामविव्हल झाले होते. विष्णूने मोहिनी रूपाचा त्याग करून पुरूष रूप धारण केले तेव्हा शंकर खिन्न झाले. परंतु त्यांचे वीर्यस्खलन झाले. त्यापासून एका असुराचा जन्म झाला. त्या असुराचा वर्ण श्याम होता. त्याचे डोळे तांबट रंगाचे होते. तो शुक्राचार्याकडे गेला आणि विनयपूर्वक प्रणाम करून आपणास शिष्य करून घेण्याची विनंती केली.

शुक्राचार्य थोडा वेळ ध्यानमग्न झाले. नंतर त्यांनी प्रसन्न होवून म्हटले, शिव क्रोधामुळे त्यांच्या शुक्राचे स्खलन झाले आणि त्यापासून तुझी उत्पत्ती झाली म्हणून तुझे नाव 'क्रोधासूर' असे आहे. शुक्राचार्याने शंबराची अत्यंत लावण्यवती मुलगी प्रीतीबरोबर क्रोधासुराचा विवाह लावून दिला. यामुळे अत्यंत प्रसन्न होऊन आचार्यांच्या चरणी प्रणाम करून क्रोधासुराने सांगितले, की मी आपल्या आज्ञेनुसार ब्राह्मणांवर विजय प्राप्त करू इच्छितो.

आपण मला यश प्रदान करणारा मंत्र देण्याची कृपा करावी. शुक्राचार्यांनी त्याला विधीपूर्वक सूर्य मंत्र प्रदान केला. गुरूला प्रणाम करून तो अरण्यात निघून गेला. तेथे एका पायावर उभा राहून सूर्य मंत्राचा जप करू लागला. सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी निरंकार, उन पाऊस, थंडीचे दु:ख सहन करत कठोर तप करत होता. असुराचे दिव्य तप पाहून सूर्यदेव प्रसन्न झाले. क्रोधासुराने त्यांच्याकडे संपूर्ण ब्रम्हांडावर विजय प्राप्त करण्याचे आणि अमरत्वाचे वरदान मागितले.

सूर्यदेवांनी तथास्तू म्हटले. मनोरथ सफल झाल्याचे पाहून क्रोधासुराला आनंद झाला. त्याला हर्ष आणि शोक अशी दोन मुले होते. त्याने शुक्राचार्यांना आदरपूर्वक बोलावून त्यांची पूजा केली. आचार्यांनी त्याला आवेशपुरीमध्ये दैत्याधिपतीच्या पदावर प्रतिष्ठित केले. काही दिवसानंतर त्याने ब्रह्मांडावर राज्य करण्याची इच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे त्याची विजय यात्रा सुरू झाली. हळूहळू पृथ्वी, कैलास आणि वैकुंठावरही त्याचे राज्य स्थापित झाले.
WD
नंतर त्याने आपला मोर्चा सूर्यदेवाकडे वळविला. सूर्यदेवानेच अमरत्वाचा वर दिल्याने त्यांनी अत्यंत दु:खी अंतःकरणाने सूर्यलोकाचा त्याग केला. तेथे क्रोधासुराने आपले राज्य स्थापन केले. तेव्हा सर्व देवतांनी गणेशाची आराधना करण्यास सुरवात केली. हे पाहून लंबोदर प्रकट झाले. लंबोदराने क्रोधासुराचा अहंकार मोडून त्याला नष्ट करण्याचे आश्वासन देवतांना दिले. आकाशवाणीने हा संवाद क्रोधासुराच्या कानावर गेला.

तेव्हा तो भयभीत होवून मूर्च्छित झाला. सैनिकांनी त्याला धीर दिला. संपूर्ण ब्रह्मांड आपल्या ताब्यात आहे. तेव्हा आपण आज्ञा करा.

आम्ही कोणत्याही प्रकारच्या शत्रूशी लढण्यास समर्थ आहोत, असे त्यांनी सांगितले. आपल्या सैनिकांची वीरवृत्ती पाहून क्रोधासुर अत्यंत प्रसन्न झाला आणि आपले अजेय सैन्य घेऊन समरांगणावर पोहचला. तेथे त्याने मूषकारूढ गजमुख, त्रिनयन, लंबोदराला पाहिले. त्यांच्या बेंबीत
नाग गुंडाळलेला होता.

लंबोदराचे हे विचित्र रूप पाहून तो अत्यंत क्रोधित झाला. दोघांत घनघोर लढाई झाली. लंबोदराबरोबर देवांनीही असुरांचा नाश करण्यास सुरवात केली. बळी, रावण, माल्यवान, कुंभकर्ण आणि राहू आदी महाबलवान योद्धे मृत झाल्याचे पाहून क्रोधासुर अत्यंत व्याकूळ झाला. तो लंबोदराला समोर पाहून त्याच्या वधाच्या वल्गना करू लागला. तेव्हा लंबोदर त्याला म्हणाले 'अरे दैत्य! तु व्यर्थ बडबड का करतो? मी तुझ्यासारख्या दुष्टाचा वध करण्यासाठीच आलो आहे.

तू सूर्यदेवाच्या वराचा प्रभाव पाडून मोठा अधर्म केला आहे. पण तुझ्या पापामुळे ते सर्व शुभ कार्य निष्फळ झाले आहे. आता मी तुझा आणि तुझ्या अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करणार आहे. तुला जिवंत राहायचे असेल तर मला शरण ये. माझ्याविषयी जाणून घ्यायचे असेल तर शुक्राचार्यांना विचार. ते मला जाणतात. क्रोधासुराच्या सर्व शंकाचे निवारण झाल्यानंतर तो लंबोदर चरणी लीन झाला. त्यांची भक्तीभावाने पूजा केली.

लंबोदराने त्याला क्षमा करून त्याला आपला भक्त मानले. नंतर त्यांची आज्ञा प्राप्त करून शांत जीवन व्यतीत करण्यासाठी पाताळात गेला. अशा प्रकारचा लंबोदराचा अवतार आहे.