इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू? मी ह्या गावाच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला. तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा उदरांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्या दिवशी तिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणन मला हे दिवस आले.
ती दरवर्षी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरीं आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय? म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करु लागली. जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो! साठा जन्माची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.