बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

पिठोरीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याच्या घरीं श्रावणांतल्या अवसेच्या दिवशीं बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई? ज्या दिवशी श्राद्ध, त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखूं लागे, व ब्राह्मण जेवायला बसण्याचें वेळेवर बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं सहा वर्षं झालं. सातव्या वर्षीही असंच झालं, तेव्हा सासरा रागावला. मेलेलं पोर तिच्या ओटींत घातलं, तिला रानांत हाकून लावलं. पुढं जातां जातां ती एका मोठ्या अरण्यांत गेली.
तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, “बाई, बाई, तूं कोणाची कोण? इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा; नाहींतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील.”तेव्हां ब्राह्मणाची सून म्हणाली, “तेवढ्याकरितां मी इथं आलें आहे.” तशी झोटिंगाची बायको म्हणाली “बाई बाई, तूं इतकी जिवावर उदार कां ?” “मी एका ब्राह्माणाची सून, दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशीं बाळंत होई व मूल मरून जाई.
 
त्याच दिवशीं आमच्या घरीं माझ्या आजेसासर्‍याचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्नाण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणें माझी झाली, सातव्या खेपेलाहि असंच झालं. तेव्हां मामंजींना राग आला. ते मला म्हणाले, “माझा बाप तुझ्या बाळतपणामुळं सात वर्षं उपाशी राहीला. तर तूं घरांतून चालती हो.” असं म्हणून हें मेलेलं मूल माझ्या ओटींत घातलं, आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आलें. आतां मला जगून तरी काय करायचं आहे?” असं म्हणून ती रडूं लागली.
 
तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, “बाई, बाई, तूं भिऊं नको, घाबरूं नको. अशीच थोडीशी पुढं जा. तिथं तुला एक शिवाचं लिंग दॄष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून रहा. रात्रीं नागकन्या, देवकन्या साती आसरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि ‘अतिथी कोण आहे’ म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण, त्या तुला पाहतील. कोण कुठची म्हणून चौकशी करतील, तेव्हां तूं सगळी हकीगत त्यांना सांग.”
 
ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली, तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहूं लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यांत रात्र झाली, तशा नागकन्या, देवकन्या, आसरांच्या स्वार्‍यासुद्धां आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि ‘अतिथी कोण आहे’ म्हणूनं विचारलं. त्याबरोबर ती खालीं उतरली. ‘मी आहे’ म्हणून म्हणाली. तेव्हां सगळ्यांनीं मागं पाहिलं, त्यांचा आश्चर्य वाटलं, तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली.
 
नागकन्या देवकन्यांनीं तिच्या मुलांची चौकशी केली, तेव्हां आसरांनीं तीं दाखवलीं. पुढं त्यांनी तिच्या सातही मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हें व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली. आणि मृत्युलोकीं हें व्रत प्रगट करायला सांगितलं; तसं तिनं विचारलं, “ह्यानं काय होतं?” असरांनी सांगितलं. “ हें व्रत केलं म्हणजे मुलंबाळ दगावत नाहींत, सुखासमाधानांत राहतात.” पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गांवांत आली.
 
लोकांनी तिला पाहिलें. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, “भटजी, भटजी, तुमची सून घरीं येत आहे.” त्याला तें खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहूं लागला तों मुलंबाळं दृष्टीस पडूं लागलीं. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरांत गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरांत आला. सर्व हकीकत सुनेला विचारली, तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलांबाळांसुद्धा सुखाने ती नांदू लागली. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.