शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (19:43 IST)

विश्वनाथन आनंद : जेव्हा बीबीसीनं आनंदचा पहिलाच इंटरव्ह्यू घेतला होता

Viswanathan Anand
बुद्धिबळाचा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदचा आज वाढदिवस. भारतीय खेळांच्या जगात आपली वेगळी छाप पाडणारा आणि भारतीय बुद्धिबळाला जागतिक पातळीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा म्हणून आनंद ओळखला जातो. त्याच्या आजवरच्या वाटचालीविषयी लिहित आहेत ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे :
 
मी आनंदला पहिल्यांदा पाहिले ते मे 1983 मध्ये. तेव्हा मुंबईतल्या आय.आय.टीमध्ये राष्ट्रीय सांघिक बुद्धिबळ स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या आणि आनंद तेव्हा पहिल्यांदाच सीनियर गटात राष्ट्रीय स्पर्धा खेळत होता.
 
भारतातील सर्व दिग्गज खेळाडू तेव्हा खेळत असल्यानं लहानग्या आनंदची कोणी दखलही घेतली नव्हती.
 
माझे थोरले बंधू आणि राष्ट्रीय खेळाडू अभय ठिपसे, या स्पर्धेचे आयोजक आणि संचालक होते. एके दिवशी घरी आल्यावर त्यांनी सांगितले की मद्रासचा एक लहान मुलगा एकेका सेकंदात अत्यंत दर्जेदार खेळ्या करत होता. त्या मुलाचा वेगवान आणि संयुक्तिक खेळ बघून ते थक्क झाले होते.
 
दुसर्‍या दिवशी कुतुहलाने मी आणि माझे धाकटे बंधू सतीश (माजी राष्ट्रीय सब-ज्युनियर विजेता) त्या मुलाचा डाव पाहायला गेलो.
 
बघतो तर काय, मुंबईच्या उन्हाळ्यात घोंगडी ओढून, तापाने फणफणलेला एक लहानगा मुलगा माजी राष्ट्रीय विजेते मॅन्युएल एरन यांच्याशी खेळत होता. मुलाची आई काळजीने जवळ बसली होती.
 
हा आजारी मुलगा बलाढ्य एरन यांच्यासमोर काय टिकणार असे आम्हा सर्वांना वाटत होते. परंतु बघता बघता त्या मुलाने एरन यांना झटपट पराभूत केले. डाव संपला तेव्हा एरन यांनी दोन तासापेक्षा जास्त वेळ घेतला होता; आणि त्या मुलाने फक्त 20 मिनिटे! हा मुलगा म्हणजेच विश्वनाथन आनंद!
 
सोव्हिएत वर्चस्वाला धक्का
खरंतर 1960 आणि 1970 च्या दशकात आशियाई खेळाडू आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले. तेव्हा आशियात फिलिपीन्स आणि इराण यांचं वर्चस्व होतं.
 
एकूणच आशियाई स्तरावर भारतीय बुद्धिबळपटूंनी आपले नाव कोरायला सुरूवात केली होती. पण जागतिक स्तरावर मात्र सोविएत यूनियन आणि पूर्व युरोपियन खेळाडूंचेच वर्चस्व होते.
 
हे वर्चस्व मोडून काढले ते केवळ विश्वनाथन आनंद यानेच.
 
इतर खेळाडूंच्या तुलनेमध्ये आनंदची बुद्धिबळातील प्रगती विस्मयकारक होती. उदाहरणार्थ, मला जेव्हा आंतरराष्ट्रीय मास्टर ही पदवी मिळाली तेव्हा मी स्पर्धांमध्ये सुमारे 700 डाव खेळलो होतो. परंतु आनंदने 200 पेक्षा कमी डावातच ही पदवी मिळविली.
 
1984 हे वर्ष आनंदच्या दृष्टीने एक महत्वाचा टप्पा ठरलं. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याची भारताच्या (सिनियर) संघात निवड झाली, तेव्हा आनंद 14 वर्षांचाच होता.
 
एप्रिल 1984 मध्ये फ्रांसमध्ये जागतिक कॅडेट् स्पर्धेसाठी आनंदची निवड झाली आणि राष्ट्रीय विजेता या नात्यानं मला त्या स्पर्धेसाठी आनंदचा प्रशिक्षक बनण्याची संधी मिळाली. ते पंधरा दिवस माझा दृष्टीने अविस्मरणीय ठरले.
 
सोविएत यूनियन चे दोन प्रतिभावंत खेळाडू, अलेक्सी ड्रीव्ह आणि वासिली इव्हानचुकही त्या स्पर्धेत खेळले. आनंद एकापाठोपाठ एक खेळाडूंचा पराभव करत दोन्ही सोविएत खेळाडूंच्या बरोबरीने आघाडीवर होता. ड्रीव्ह आणि इव्हानचुकविरुद्ध त्याचे डाव बरोबरीत सुटले.
 
आनंदशी खेळण्यापूर्वी सोविएत प्रशिक्षकांनी इव्हानचुकची उत्तम तयारी करून घेतली होती, तरी देखील त्याला आनंदची व्यूहरचना तोडता आली नाही.
 
त्यावेळी आनंद आणि मी, दोघेही, 'राजाचा भारतीय बचाव' खेळायचो. सोविएत खेळाडू ह्या बचावाविरुद्ध जबरदस्त हल्ला करतात परंतु आनंदने त्या हल्ल्याला ‘जशास तसे’ उत्तर दिले.
 
डाव संपल्यावर दोन्ही सोविएत प्रशिक्षक माझ्याजवळ आले आणि आनंदचे कौतुक करू लागले. झटपट खेळणारा हा मुलगा इतके अचूक खेळू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.
 
या स्पर्धेत आनंद अपराजित राहिला आणि कांस्यपदक मिळवून जागतिक पदक मिळवणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला.
 
त्याच वर्षी (1984) ग्रीस मध्ये आयोजित 'बुद्धिबळ ऑलिम्पियाड' मध्ये आनंदने अत्यंत दर्जेदार खेळ केला. जरी राष्ट्रीय विजेता या नात्याने मी संघाचा कर्णधार असलो तरी आम्हा सर्वांमध्ये आनंदच सर्वाधिक चमकला.
 
जेव्हा बीबीसीनं आनंदचा पहिला इंटरव्ह्यू घेतला...
1985 साली फेब्रुवारीत लंडन येथे झालेल्या 'राष्ट्रकुल बुद्धिबळ' स्पर्धेत मला संयुक्तरित्या सुवर्ण पदक मिळाले. त्यानंतर दोन महिन्यांनी झालेल्या राष्ट्रीय 'अ' स्पर्धेत मी पुन्हा विजेतेपद मिळविले आणि आनंद चौथा आला होता. परंतु आनंदची प्रगती इतकी भरभर होत होती की एकाच महिन्याने त्याने दुसर्‍या एका स्पर्धेमध्ये माझा लीलया पराभव केला.
 
राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या सहात आल्यानं आनंदला लॉईड्स् बॅंक मास्टर्स स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.ऑगस्ट 1985 मध्ये लंडनमध्ये झालेली ती स्पर्धा बुद्धिबळ विश्वाच्या दृष्टीने खळबळजनक ठरली.
 
एका महत्वाच्या डावात आनंदचा मुकाबला दिग्गज ब्रिटीश खेळाडू जोनाथन मेस्तेल बरोबर होता.
 
मेस्तेल त्यावेळी नावाजलेला खेळाडू होता, पण आनंदने केवळ 22 चालींमध्ये मेस्तेलवर विजय मिळविला. मेस्तेलने 2 तास आणि 29 मिनिटे घेतली होती तर आनंद ने फक्त 10 मिनिटे.
 
डाव सुरू असताना बघता बघता प्रेक्षकांची गर्दी वाढत गेली. बीबीसीचे वार्ताहर तत्काळ तेथे येऊन पोहोचले आणि त्यांनी आनंदची अर्धा तास मुलाखत घेतली.
 
आनंदची दूरचित्रवाणीवरील ती पहिलीच मुलाखत होती. या मुलाखतीमध्ये बीबीसीने आनंदला 'द लाईटनिंग किड' असे नाव दिले.
 
त्या ऐतिहासिक विजयानंतर आनंदने जी भरारी घेतली ती थेट सर्वोच्च शिखरापर्यंत.
 
फिलिपिन्स मध्ये 1987 साली जागतिक ज्युनियर स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकून तो जगज्जेतेपद मिळविणारा पहिला आशियाई खेळाडू बनला. त्याच वर्षी त्याने 'आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर' हा किताब देखील मिळविला.
 
पाच जागतिक विजेतेपदं
1986 मध्ये आनंदने तुकमकोव्ह या मातब्बर खेळाडूचा सहज पराभव केला. त्यावेळी 'आनंद विश्वविजेता होईल का?' या प्रश्नावर तुकमकोव्हनं 'जोपर्यंत सोविएत यूनियन अस्तित्वात आहे ,तोपर्यंत हे अशक्य आहे' असे उर्मट उत्तर दिले.
 
परंतु नियतीचा खेळ बघा, केवळ पाच वर्षातच सोविएत यूनियन संपले आणि त्यापूर्वी आनंद जागतिक पातळीवर पोहोचलासुद्धा.
 
जून 1990 मध्ये, वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी, जागतिक विजेतेपदाच्या आंतरविभागीय स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवून आनंद ने 'कॅन्डीडेट्स्' स्पर्धेत प्रवेश मिळविला. 'कॅन्डीडेट्स्' स्पर्धा ही जगज्जेतेपदाचा आव्हानवीर निवडण्यासाठी घेतली जाते. संपूर्ण जगातून केवळ आठ खेळाडू कँडिडेट्स स्पर्धेसाठी निवडले जातात.
 
1991 मध्ये पहिल्या फेरीत अलेक्सी ड्रीव्हचा पराभव केल्यामुळे आनंदचा जगातील पहिल्या पाच अव्वल खेळाडूंमध्ये समावेश झाला. त्याची तुलना बॉबी फिशर बरोबर केली जाऊ लागली.
 
पण ड्रीव्हला पराभूत केल्यावर त्याचा सामना पडला अनेकदा जगज्जेता राहिलेल्या अनातोली कारपोव्हबरोबर. केवळ गॅरी कस्पारोव्हकडून पराभूत झालेला कारपोव्ह जगातील इतर खेळाडूंपेक्षा पुढेच होता. आनंदने शर्थीने झुंज़ दिली परंतु कारपोव्ह समोर त्याचा पाड लागला नाही..
 
पण पराभावामुळे आनंद नाउमेद झाला नाही. त्याने आपले प्रयत्न चालू ठेवले.
 
1992 मध्ये आनंदला मॉस्को येथे इव्हानचुकसोबत खेळण्याचे आव्हान देण्यात आले. इव्हानचुककडे तेव्हा भावी जगज्जेता म्हणून बघितले जायचे. 'आनंद ही मॅच सहज जिंकेल' असे मी वर्तमानपत्रांना सांगितले तेव्हा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात माझ्यावर टीका झाली. परंतु ही मॅच जिंकून आनंद ने आपणच जगज्जेतेपदचे दावेदार होऊ शकतो हे न बोलता स्पष्ट केले.
 
1992 मध्येच फिलिपिन्सच्या मनिला इथे बुद्धिबळ ऑलिम्पीयाड मध्ये आनंदच्या नेतृत्वाखाली एक खेळाडू म्हणून खेळायची मला संधी मिळाली.
 
आनंद एक आदर्श कर्णधार आहे. सर्व खेळाडूंचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी तो सदा प्रयत्नशील असे.
1992-1993 मध्ये गॅरी कस्पारोव्हने जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या (FIDE) विरोधात पाउल उचलले आणि व्यावसायिक बुद्धिबळ संघटनेची (PCA) स्थापना केली. या संघटनेने समांतर विश्वविजेतेपद स्पर्धा सुरू केली. पाश्चिमात्य जगात या संघटनेला खूप प्रतिसाद मिळाला.
 
आनंद ने दोन्ही संघटनांच्या विश्वविजेतेपदच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. FIDE च्या स्पर्धेमध्ये आनंदला अमेरिकेच्या काम्स्की कडून पराभव स्वीकारावा लागला पण PCA च्या स्पर्धेत आनंद विजयी झाला आणि 1995 मध्ये विश्विजेतेपदच्या स्पर्धेत गॅरी कस्पारोव्हचा आव्हानवीर म्हणून निवडला गेला.
 
1995 मध्ये कस्पारोव्हकडून आणि 1997-1998 मध्ये FIDE च्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत कारपोव्हकडून आनंदला पराभूत व्हावे लागले.
 
वारंवार पराभवानं एखादा कोणीही खचून गेला असता. परंतु आनंद ने हार मानली नाही. अखेर 2000 मध्ये जगज्जेतेपदच्या स्पर्धेत अलेक्सी शिरोव्हचा धुव्वा उडवून आनंद जगज्जेता बनला.
 
या विजयाबद्दल लिहिताना 'न्यू इन चेस' या आंतरराष्ट्रीय मासिकात 'सर्वात लोकप्रिय खेळाडू' हा मथळा दिला होता. आजदेखील आनंद 'अजातशत्रू' मानला जातो.
 
मजेदार गोष्ट अशी की सर्व खेळाडूंनी 'आनंद जगज्जेता होण्याची सर्वाधिक शक्यता आहे' असे मुलाखतींमध्ये कबूलही केले. प्रतिस्पर्ध्यांकडून एवढा सन्मान त्यापूर्वी केवळ फिशर, कारपोव्ह आणि कस्पारोव्हलाच मिळायचा.
आनंदचा पुढचा यशस्वी प्रवास सर्व जगाला ठाउक आहेच. 2000 मध्ये विश्व ब्लिट्झ (झटपट) स्पर्धेत अजिंक्‍यपद, 2003 मध्ये विश्व जलद (रॅपिड) स्पर्धेत विजेतेपद अशी आनंदची वाटचाल सुरू राहिली.
 
पण 2003च्या जागतिक अजिंक्‍यपदाच्या स्पर्धेच्या निवड प्रक्रियेत त्याचा समावेश करण्यात आला नाही आणि FIDEच्या या अनाकलनीय निर्णयावर खूप टीकाही झाली. .
 
दरम्यान, कस्पारोव्हच्या निवृत्ती नंतर व्यावसायिक बुद्धिबळ संघटनेतील हवा संपली आणि 2007मध्ये बुद्धिबळ क्षेत्रातल्या दोन्ही संघटनांचं एकत्रीकरण झाल्यावर एक सर्वसमावेशक जगज्जेतेपद स्पर्धा घेण्यात आली.
 
या स्पर्धेत आनंदने अपराजीत राहून पहिले स्थान पटकावले. त्यावेळी 2000 मध्ये कस्पारोव्हला हरविल्यानं 'अजरामर' झालेल्या व्लादिमीर क्रामनिकने मात्र आनंदला सर्वोत्कृष्ट खेळाडू मानण्यास नकार दिला.
 
पण 2008 मध्ये क्रामनिक आणि आनंदमध्ये जगज्जेतेपदसाठी सामना झाला, तेव्हा आनंदनं क्रामनिकचा लीलया पराभव केला आणि आपले संपूर्ण वर्चस्व सिद्ध केले.
 
आनंदने मग 2010 साली वासेलिन टोपोलोव्ह आणि 2012 मध्ये बोरिस गेलफाण्डला हरवून आपले जगज्जेतेपद राखले आणि 5 वेळा जगज्जेता बनणार्‍या काही मोजक्या खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.
 
2013 साली च्या जगज्जेतेपदच्या लढतीत मात्र आनंदला मॅग्नस कार्लसन कडून पराभव स्वीकारावा लागला. 2014 मध्ये झालेल्या 'रिटर्न मॅच' मध्येही कार्लसनने आनंदचा पराभव केला.
 
अशा प्रकारे 1991 ते 2012 अशी बावीस वर्षे बुद्धिबळ गाजवणार्‍या एका युगपुरुषाच्या कारकिर्दीचा अस्त झाला.
 
त्यानंतर आनंद ने 2017 मध्ये जागतिक जलद स्पर्धेत विजेतेपद मिळवून सर्वांना सुखद धक्का दिला. परंतु 2014 नंतर 'पारंपरिक' बुद्धिबळ जगज्जेतेपदच्या स्पर्धेत भाग न घेण्याचा त्याचा निर्णय कायम राहिला.
 
मिष्किल आणि निरागस व्यक्तीमत्व
बुद्धिबळ म्हणजे बुद्धीचा खेळ आणि तो खेळणारे म्हणजे बुद्धिमान आणि गंभीर व्यक्तीमत्व असा समज झाला आहे. पण तसं नसतं आणि विश्वनाथन आनंद त्याचं उत्तम उदाहरण आहे.
आनंद मिष्किल आहे, चेष्ठेखोर आहेत आणि तितकाच मनमिळावू आहे. कुठेही गेला तरी तो लोकांना पाच मिनिटांत आपलंस करून घेतो.
 
1980 च्या दशकात बुद्धिबळ खेळाडूऐवजी एखाद्या राज्याच्या बुद्धिबळ संघटनेताला पदाधिकारी मॅनेजर म्हणून यायचा. त्यांची आम्ही कधी खिल्ली उडवायचो, त्यातही आनंद मागे नसायचा.
 
लहानपणी तो हसू लागला तर त्याला हसणं थांबवता येतच नसे. तो मनात काही कपटीपणा ठेवत नाही. एखाद्या गोष्टीवर आनंदच्या प्रतिक्रिया निरागस असतात. त्याला अजूनही खोटं बोलता येत नाही.
 
कोणी काही विचित्र विधान केलं तर तो अगदी मार्मिकपणे त्या माणसाला आपला मूर्खपणा लक्षात आणून देतो. तो टीका केल्याशिवाय राहात नाही, पण त्याची टीका कधी बोचरी नसते आणि समोरच्या माणसाला आपलं काय चुकलं हे बरोबर कळतं.
 
दुसरं म्हणजे तो स्वतःवरच्या टीकेचाही सकारात्मक विचार करतो. म्हणजे त्याची एखादी मूव्ह चुकली आहे, असं सांगितलं तर तो त्यावर विचार करायचा.
 
आनंदला टीव्हीवर सिनेमा पाहायचाही शौक आहे, हे मला त्याचा रूम पार्टनर असताना कळलं होतं. चाळीस वर्षांपूर्वी आम्ही जसे होतो तसं आमचं नातं आजही आहे.
 
अलीकडेच तो म्हणाला, ‘आम्ही भेटलो की मी 18 वर्षांचा असल्यासारखा वागतो आणि प्रवीण 28 वर्षांचा असल्यासारखा वागतो. ’
 
घरच्यांची साथ
रेल्वेत जनरल मॅनेजर असलेले त्याचे वडील विश्वनाथ यांना काही काळ फिलिपिन्स रेल्वेमध्ये कामाची संधी मिळाली होती. तेव्हा आनंद मनिलामध्ये राहायला गेला होता. आनंदची मोठी बहीण अमेरिकेत राहायची.
 
असं जगाच्या वेगळ्या भागातलं एक्सपोजर मिळाल्यामुळे असेल किंवा त्याचं शिक्षण डॉन बॉस्को शाळेत झाल्यामुळे असेल, पण आनंद कुणाला सर वगैरे म्हणत नसे. नावानं किंवा आडनावानं हाक मारण्याचा मोकळेपणा त्याच्या स्वभावातही होता.
 
तीन भावंडांमधला धाकटा लाडका मुलगा म्हणून आनंदला खूप प्रेम मिळालं. तो बुद्धीबळ खेळायला परदेशात जायचा, तेव्हा त्याची आई कायम सोबत असायची, ती त्याची काळजी घ्यायची आणि गरज पडल्यावर जेवणही करायची.
 
पुढे तशीच साथ त्याला पत्नी अरुणाकडूनही मिळाली. अरुणा अगदी हसरी आहे आणि आनंदला साजेशी आहे. आनंदसाठी तिनं स्वतःचं करियर बाजूला ठेवलं. आई आणि पत्नी या दोन स्त्रिया पाठीशी उभ्या राहिल्या, त्यांचाही वाटा आहे.
 
आनंदनं भारतीय बुद्धीबळ कसं बदललं?
आनंद आता 'वेस्टब्रीज आनंद चेस अकॅडमी' द्वारा भारताच्या सर्व आघाडीच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचं काम करतो आहे. भारताचा दुसरा जगज्जेता तयार करण्यासाठी मदत करतो आहे.
 
पण त्याआधीच स्वतःच्या कामगिरीनं भारतीय बुद्धिबळ व्यवस्थेत बदल घडवून आणले आहेत. अप्रत्यक्ष असलं तरी हे मोठं योगदान आहे.
 
बुद्धिबळात किंवा कुठल्याही खेळात आता अमॅच्युअर म्हणजे हौशी खेळाडू ही संकल्पना राहिलेली नाही. व्यावसायिक पद्धतीनं तासंतास खेळाला वेळ देऊन मुलं सराव करताना दिसतात.
आज भारतातल्या लहान खेळाडूंनाही अमेरिकन किंवा रशियन खेळाडू समोर आले तर माझं कसं होणार असं वाटत नाही. आपण काहीही करू शकतो, वर्ल्ड चॅम्पियन होऊ शकतो हा आत्मविश्वास आनंदनं दिला आहे.
 
2022 साली भारतात बुद्धिबळ ऑलिंपियाडचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हा यजमान या नात्यानं भारताला तीन संघ उतरवण्याची संधी मिळाली. तेव्हा भारताच्या ‘ब’ संघातल्या दोन गुकेश आणि निहाल सरीननं सुवर्णपदकं तर प्रज्ञानंदनं कांस्यपदक मिळवलं.
 
2023 च्या चेस वर्ल्ड कपमध्ये तर शेवटच्या आठमध्ये चार भारतीय होते. तीन चार दशकांपूर्वी बुद्धिबळात जसे सोविएत यूनियनचे संपूर्ण वर्चस्व होते तसे वर्चस्व आज भारताचे आहे. याची सुरुवात, तीस पस्तीस वर्षांपूर्वी आनंदनंच केली होती.
 
मला वाटतं, मी आनंदपेक्षा दहा वर्षांनी मोठा असण्याऐवजी दहा वर्षांनी लहान असतो तर कदाचित त्याच्या ज्ञानाचा मला आणखी फायदा घेता आला असता.
 
Published By- Priya Dixit