गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्री स्वामी समर्थ
Written By

श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवार व्रत संपूर्ण माहिती (व्रताचे नियम, पूजाविधी, व्रतकथा)

श्री स्वामी समर्थांचे भक्त नऊ गुरुवारचे व्रत करत असतात. स्वामींचे हे नऊ गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे हे व्रत करीत असतात.
 
श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत
या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते. नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करुन व्रताला आरंभ करावा. पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा.
 
व्रतासाठी लागणारे साहित्य : हळद कुंकु, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची दोन वस्रे, स्वामींना पाघरायला भगवे वस्र, गुळखोबर, ताम्हन, तांब्या, पळी, अष्टंगंध, जानवं, हिना, अत्तर, चंदन, विविध फुले (जास्वंद, चाफा, गुलाब, दूर्वा, बेल, 1 जुडी तुळस, इतर फुले). 
 
पूजा विधी 
व्रताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सुर्योदयाच्या वेळेस स्नान करुन शुचिर्भुत व्हावे.
स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. 
नित्याची देवपूजा करावी.
घरातील देवासमोर एक नारळ, विडा ठेवून (त्यावर नाणं आणि सुपारी) नमस्कार करावा. 
वडील मंडळीनाही नमस्कार करावा. 
पूजेला प्रारंभ करावा.
फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा.
जमिनीवर चौरंग ठेवुन सभोवती रांगोळी काढावी. मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी, लाल अथवा पिवळे वस्र अंथरुन मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंधाक्षता, तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा.
(वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा) आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजना करीता सुपारी ठेवावी.
उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे.
चौरंगाच्या शेजारी समई लावावी. सुंगधी अगरबत्ती धूप लावावा. 
चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा.
 
संकल्प : मम आत्मनः श्रृतिस्मृतिपुरानोक्तफल प्रात्यर्थम, मम सकल कुंटुंबिनाम, क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्यभीवृध्दार्थम, पुत्रपौत्र, संततिवृध्दी, अप्राप्तलक्ष्मीप्राप्त्यर्थम, प्राप्तलक्ष्मीचिरकाल संरक्षणार्थम्, अदित्यादि सकल ग्रहपीडाशांतर्थम् एवं सकल कामनासिध्दिद्वारा धर्मार्थम् मोक्षफल प्राप्त्यर्थम् श्रीस्वामी समर्थ देवता पूजनं एवं व्रतकथा श्रवणं च करिष्ये ।
 
असे म्हणून हातातील पाणी ताम्हानात सोडावे. गणपतीचे ध्यान करुन ॐ गं गणपतये नमः। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धिमही, तंन्नो दंती प्रचोदयात।। असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरीता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रीत जल अर्पण करुन सुपारीला चंदन लावावे. हळद कुंकु वाहून दूर्वा, लाल फुलं, बेल, कापसाची दोन वस्रे, जानवे, अक्षता अर्पण करुन नमस्कार करावा.
धूप दीप अगरबत्ती दाखवावी. 
तुपाचा दिवा ओवाळावा. 
गुळ खोबर्याचा नैवेद्य दाखवावा.
 
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा ।। असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा. 
घंटा वाजवावी. घंटेला हळद कुंकु अक्षता, गंध ,फुल अर्पण करुन अगरबत्ती, धूप दाखवावा. दीप ओवाळून घंटा वाजवावी. नमस्कार करावा.
 
श्री स्वामी समर्थ पंचोपचार पूजा-
!! ॐ नमो श्री स्वामी समर्थाय आवाहनार्थे एवं आसनार्थे अक्षतान समर्पयामि ।
असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात.
 
!! ॐ नमो श्री स्वामी समर्थाय विलेपनार्थे चंदन, अलंकारार्थे अक्षतान् एवं सौभाग्यद्रव्यम् हरिद्रांकुंकुमम् समर्पयामि। 
असे म्हणून मूर्तीला चंदन, हळद कुंकु लावुन अक्षता अर्पण करुन नमस्कार करावा.
 
!! ॐ नमो श्री स्वामी समर्थाय यज्ञपवीतम् एव् वस्त्रम् समर्पयामी ।
असे म्हटत स्वामींना जानवे व भगवे वस्त्र अर्पण करीन नमस्कार करावा.
 
!! ॐ नमो श्री समर्थाय रुतुकालोभ्दवपुष्पाणि एवं सुंगधिद्रव्यंम् समर्पयामी ।
असे म्हणून स्वामींना गुलाब, मोगरा, जास्वंद, सोनचाफा अशी फुले अर्पण करुन हिना अपत्तर लावून नमस्कार करावा.
 
!! ॐ नमो स्वामी समर्थाय धूप, दीप समर्पयामी । 
असे म्हणून स्वामींना सुगंधी धूप दाखवून, तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा.
 
!! ॐ नमो स्वामी समर्थाय मुखवासार्थे पुगीफलतांबूल, नारीकेलमहाफलम् एवं महादक्षिणाम् समर्पयामि ।
असे म्हणून विड्यावर, नारळावर आणि फळांवर पळीभर पाणी सोडावे. हळद कुंकु, चंदन, फुले अर्पण करुन दक्षिणेवर पाणी सोडून नमस्कार करावा.
 
श्रीगुरु स्वामी समर्थ अष्टोत्तरशतनामावली
स्वामींच्या पुढील प्रत्येक नामाबरोबर एक एक तुळशीपत्र मूर्तीला अर्पण करावे.
अष्टोत्तरशत नामावली प्रारंभ करिष्ये...
ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री महाविष्णवे नमः
ॐ विश्र्वपालकाय नमः ॐ महादेवाय नमः
ॐ विश्र्वमूर्तये नमः ॐ परमेश्र्वराय नमः
ॐ कामधेनुरुपाय नमः ॐ दीनानाथाय नमः
ॐ करुणासागराय नमः ॐ अवधूताय नमः
ॐ भरतखंडनिवासिने नमः ॐ सुखधामवासिने नमः
ॐ मूळपुरुषाय नमः ॐ वटवृषाय नमः
ॐ देवाधिदेवाय नमः ॐ भक्तिप्रियाय नमः
ॐ शुध्द ब्रम्हचैतन्याय नमः ॐ समर्थाय नमः
ॐ करुणाकंदाय नमः ॐ त्रैलोक्याधिपतये नमः
ॐ अनंताय नमः ॐ दत्तनगरवासिने नमः
ॐ अक्कलकोटवासिने नमः ॐ त्राताय नमः
ॐ कलियुगे इच्छितदातये नमः ॐ संसार श्रमनाशकाय नमः
ॐ विश्वविराटस्वरुपाय नमः ॐ भक्तवत्सलाय नमः
ॐ मृत्युंजयाय नमः ॐ कल्पवृक्षरुपाय नमः
ॐ दयासागराय नमः ॐ पतितपावनाय नमः
ॐ त्रिविधतापनाशकाय नमः ॐ चतुरधामवासिने नमः
ॐ योगक्षेमवाहिने नमः ॐ दाताय नमः
ॐमोक्षदाताय नमः ॐ श्रीपतये नमः
ॐ शिवविष्णूरुपाय नमः ॐ ब्रम्हज्योतीरुपाय नमः
ॐ पुराणपुरुषाय नमः ॐ दिगंबराय नमः
ॐ सत्यज्ञानरुपाय नमः ॐ श्रीगुरु स्वयंदत्ताय नमः
ॐ शेषनारायणाय नमः ॐ सदाशिवाय नमः
ॐ त्रैमूर्तिरुपाय नमः ॐ विश्वात्माय नमः
ॐ मंगलमूर्तये नमः ॐ त्रिकालज्ञानाय नमः
ॐ अयोनिसंभवे नमः ॐ मुलाधाराय नमः
ॐ विश्र्वसुत्रधाराय नमः ॐ जगन्नाथाय नमः
ॐ अच्युतानंदाय नमः ॐ क्षमामूर्तये नमः
ॐ आआदिनारायणाय नमः ॐ सघगुणनिर्गुणाय नमः
ॐ विश्र्वव्यापकाय नमः ॐ प्रकृतिपुरुषाय नमः
ॐ सर्वसाक्षीभूताय नमः ॐ देवरुपाय नमः
ॐ सर्वसौख्यदायकाय नमः ॐ वरदमूर्तये नमः
ॐ कर्मफलदातये नमः ॐ आजानुबाहवे नमः
ॐ अनंतसिध्दिदायकाय नमः ॐ कोटीब्रम्हांडनायकाय नमः
ॐ नृसिंहभानाय नमः ॐ क्षिरसागरवासिने नमः
ॐ प्रपंच परमार्थरुपाय नमः ॐ सर्वेश्र्वराय नमः
ॐ स्वयंसिध्दीदायकाय नमः ॐ विश्र्वकुटुंबवत्सलाय नमः
ॐ त्रैलोक्यनाथाय नमः ॐ त्रैगुण्यरहिताय नमः
ॐ दशअवताराय नमः ॐ ॐकाररुपाय नमः
ॐ चतुरयुगे अवताराय नमः ॐ यज्ञरुपाय नमः
ॐ अनंतशिर्षाय नमः ॐ अनंतभूजाय नमः
ॐ पुण्यस्मरणाय नमः ॐ पूर्णब्रम्हरुपाय नमः
ॐ भवसागर तारकाय नमः ॐ पूर्णधामाय नमः
ॐ शांतिसागराय नमः ॐ द्वादशआदित्य जननीये नमः
ॐ वटपत्रशयनी नारायणाय नमः ॐ विश्र्वसंसार प्रतिबिंबरुपाय नमः
ॐ संकल्प दिक्षादायकाय नमः ॐ विश्वकालचक्र पूर्णविरामाय नमः
ॐ सकलतीर्थरुपाय नमः ॐ सर्वैश्वराय नमः
ॐ अधर्मनाशकाय नमः ॐ त्रिभूव तारकाय नमः
ॐ विश्र्वंभराय नमः ॐ रुद्ररुपाय नमः
ॐ सदासर्वदा चिंनमूर्तये नमः विश्र्वकल्याणअवताराय नमः
ॐ कलियुगे लीला अवताराय नमः ॐ जराजन्मव्याधि विनाशाय नमः
ॐ विश्वगुरव्रै नमः ॐ ईश्र्वराय नमः
ॐ पुरुषोत्तम क्षेत्रवासिने नमः ॐ विश्र्वपिताय नमः
ॐ श्रीहरि स्वामीराजाय नमः ॐ आद्यपुरुषाय नमः
 
॥इति श्रीगुरु स्वामी समर्थ अष्टोत्तरशतनामावली विश्र्वगुरु भगवत श्रीस्वामी समर्थार्पणमस्तु॥
 
 
॥ श्री स्वामी समर्थ व्रतकथा ॥
श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथीला अष्टगंध,फुलं, हळदी कुंकु ,तुळशीपत्र अर्पण करुन धूप दीप दाखवून नमस्कार करावा.
श्री गणेशाय नमः ।श्री गुरु स्वामी समर्थायं नमः। 
असे स्मरण करुन व्रतकथेला सुरुवात करावी.
मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजूरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दांपत्य आयुष्यभर काबाडकष्ट करुन अत्यंत हालाखीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालनपोषण करुन त्याला शिक्षण दिले.
 
मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होवुन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती.
 
परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी, पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी, छंद, व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला.
 
मुलाची अशा प्रकारची वस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचारात्यांच्या मनात वारंवार येत होता. त्यांची ईश्र्वरावर पूर्णपणे श्रध्दा होती. ईश्र्वर आपल्याला एकना एक दिवस सुखाचे दिवस दाखविल अशी त्यांना आशा होती.
 
म्हणून ते दांपत्य वेगवेगळी व्रतवैकल्य करु लागले. याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला. पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळेघरात लक्ष्मी टिकेनाशी झाली, कर्ज फेडता फेडता नाकी नअयेऊ लागले. घरही गहाण पडले होते.
 
म्हणतात ना नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरीपटीने दारिद्र जीवनजगत असताना दुःख यातना होत असतात. अशा दारीद्र अवस्थेतहीत्यांनी मुलाच्या विवाहाचा विचार केला कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजाळेल अशी त्यांना शेवटची आशा होती.
 
मुलाचा विवाह झाला. सून घरात आली परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसाने सुनेने आपले खरे रुप प्रकट केले. सासु सूनेची कडाक्याची भांडणे कलह, सर्वाचीच दुभंगलेली मने, त्यात आजारपण, दुःख, दारीद्र, कर्ज, उपासमार, चिंता यांनी जीवन व्याकुळ होवू लागले.
 
एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परम् पूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहीलेलं सुखी संसाराचे रहस्य, सुखी जीवनाची गुरुकील्ली, यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पहायला मिळाली.
 
त्यांनी मालकीणीकडे एक पुस्तक वाचावयास नेऊ का ? असे विचारले. मालकीणीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले.
 
पुस्तकाचे वाचन सुरू केले. वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले. जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिससू लागला. गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी मार्गदर्शन घेण्याची ईच्छा निर्माण झाली, म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला.
 
त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले. गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. आणि आपली जीवन व्यथा सांगताना दोघही ओक्साबोक्शी रडले.
 
त्यांची व्यथा ऐकुन घेतली आणि त्यांना स्वहस्तलिखित श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारची व्रतकथा पोथी हातात देऊन 9 गुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले.
 
त्यांनी भावभक्तीने श्रध्दापूर्वक 9 गुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पुजन करुन वाचन केले. 9 व्या गुरुवारी उद्यापनही केले. वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागले. परिस्थितीत सुधारणा होऊ लागली.
 
श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त झाले.
 
आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत. घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रध्दापूर्वक भक्तिभावनेने केले पाहीजे.
 
पूर्वी कर्नाटक प्रातांतील खेडमणूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्यभावे सेवा केली होती. म्हणून त्याच्या घरी पूर्वपुण्याईने प्रत्यक्ष ब्रम्हांडनायक श्री स्वामी महाराज स्तःहुन येऊन त्यांची परमपावन चरणकमलं त्याच्या घरी विसावली होती.
 
चोळप्पा खरोखरच भाग्यवान होता.कारण देवाधिकानासुध्दा ज्यांच्या चरणांचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते.
 
ज्या ब्रम्हांडनायक मूळ पुरुषाच्या केवळ चरणस्पर्शाने दर्शनाने अनेक कमलपुष्पे फुलतात, बध्दजड जीवांचा उध्दार होतो, जीवाला मोक्षप्राप्ती होते, अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी, योगी निराहार राहुन, मौन धरुन कोणी एका पायावर उभे राहून, कोणी आकाशाकडे पाहून त्याच्या बिंदूरुपाचे ध्यान करुन, होमहवन करुन, भजन कीर्तन, अन्नदान, तीर्थयात्रा तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो.
 
असे पराकोटीचे स्वरुप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज अठराविश्र्वे दारिद्र्य नांदत असलेल्या चोळप्पाचा भाग्योदय करण्यासाठी त्याच्या घरी जणू काय कामधेनूरुपाने आले होते.
 
॥श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण ॥
 
ॐ नमो श्री स्वामी समर्थांय आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् । 
असे म्हणून पुरणपोळी, खिचडी, बेसनचे लाडू, कडबोळी अथवा आपल्या घरात शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा.
 
नैवेद्याकरिता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौकोन करुन त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणत तीन वेळा तुळशीपत्राने नैवेद्यासभोवती पाणी फिरवावे व ते तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे.
 
ॐ प्राणाय स्वाहा। ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा। ॐॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा। ॐ उत्तरापोशनम् समर्पयामि । हस्तप्रक्षालनम् समर्पयामि । मुखप्रक्षालनम् समर्पयामी । करोद्वर्तनार्थे चंदनम् समर्पयामी ।
श्री स्वामींच्या मूर्तीला चंदन लावून एक पळी पाणी ताम्हनात सोडून नमस्कार करावा.
 
श्री स्वामी समर्थांची आरती
 
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्थ
आरती ओवाळुं चरणी ठेऊनिया माथा ॥ धृ . ॥
छेली - ग्रामी , तूं अवतरलासी । जगदुध्दारासाठी राया तूं फिरशी । भक्त वत्सल खरा , तूं एक होसी । म्हणूनि शरण आलो , तुझे चरणासी । जयदेव ॥ १ ॥
त्रैगुण - परब्रह्म , तुझा अवतार । त्याची काय वर्णु , लीला पामर । शेषादिक शिणले , नलगे त्या पार । तेथे जडमूढ कैसा करु मी विस्तार । जयदेव ॥ २ ॥
देवादि देवा तू स्वामी राया । निर्जर मुनिजन ध्याती . भावें तव पाया । तुजसी अर्पण केली आपुली ही काया । शरणगता तारी तु स्वामी राया ॥ जयदेव जयदेव ॥ ३ ॥
अघटित लिला करुनी जडमुढ उध्दरिले । कीर्ति ऐकून कानी , चरणी मी लोळे । चरणप्रसाद मोठा , मज हे अनुभवले । तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे ॥
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्थ आरती ओवालळुं चरणी ठेऊनिया माथा ॥ ४ ॥
॥ श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु ॥
 
उत्तरपूजा: व्रताच्या दुसय्र्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा. स्वामींच्या मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहीत्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षता घालाव्यात.
 
मंत्रः यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् । इष्टकामप्रसिध्दयर्थ पुनरागमनायच ॥
निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे. अथवा वड, पिंपळ अशा मोठ्या झाडांच्या बुंध्याशी ठेवावे. पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी. घरच्या देवापुढे ठेवलेला नारळ फोडून प्रसाद करावा.
प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात, मंदीरात दान पेटीत टाकावी.
 
व्रताचे नियम : सुर्योदयाच्या वेळेस स्नान करुन शुचिर्भूत व्हावे. दिवसभर उपवास करावा. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा.
 
स्रियांचा मासिक धर्म तसेच सोयर सुतक आल्यास व्रताचरण करु नये. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करुन 9 गुरुवारची संख्या पूर्ण करुन त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे.
 
काही महत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे. 
 
व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार एक गुरुवार अधिक करुन त्यानंर उद्यापन करावे.
 
व्रत करताना शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरिता बोलवावे. 
 
हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते. सपत्निक केल्यास अधिक उत्तम. 
 
रात्री भजन, गायन, किर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे. 
 
व्रताचे दिवशी तसेच उद्यापनाचे दिवशी दर्शनार्थ येणार्‍या प्रत्येक स्रीपुरुषांना या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी.
 
9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीभात ठेवावा. मुंग्यांना चिमूठभर साखर ठेवावी. गाईला चारा घालावा. कुत्र्याला पोळी द्यावी. गरीबाला शिजलेले अन्न द्यावे. 
 
कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. येथे देत असलेला लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नये.