रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. टी-20 विश्वचषक 2024
Written By
Last Modified: रविवार, 30 जून 2024 (11:05 IST)

विराट कोहली : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या जगातील एकमेव खेळाडूचा प्रवास

भारतानं विश्वचषक जिंकल्याचा जल्लोष सगळीकडं सुरू असतानाच विराट कोहलीनं मात्र चाहत्यांना काहीशी निराश करणारी बातमी दिली. मॅचनंतर बोलताना विराटनं हा त्याचा अखेरचा टी-20 सामना होता असं सांगत एकप्रकारे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

यावेळी बोलताना विराट म्हणाला की, आता तरुणांना संधी देण्याची वेळ आली आहे.संघाला आणखी पुढं नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची असल्याचं विराट कोहली म्हणाला.
विराट कोहलीनं जून 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर जवळपास 14 वर्षे टी-20 खेळल्यानंतर त्यानं निवृत्ती जाहीर केली आहे. टी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना जिंकल्यानंतर विराट कोहली म्हणाला, "हा माझा शेवटचा टी-20 वर्ल्डकप होता. आम्हाला हेच मिळवायचं होतं."
 
विराट पुढे म्हणाला की, "एखाद्या मालिकेत तुम्हाला धावा मिळत नसतात आणि अचानक सगळं काही तुमच्या बाजूने घडू लागलं, ही देवाची कृपा आहे. हा माझा शेवटचा टी-20 सामना होता. आम्हाला आयसीसी स्पर्धा जिंकायची होती आणि ते स्वप्न पूर्ण झालं. आता तरुणांना संधी देण्याची वेळ आली आहे. आता त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्याची वेळ आली आहे. हा आमच्यासाठी फार मोठा प्रतीक्षेचा काळ होता. मला, रोहित आम्हाला सर्वांनाच सगळं काही मिळालं अशी भावना आहे.
 
जेव्हा साक्षात सचिनचा रेकॉर्ड मोडला...
विराट...विराट आणि केवळ विराट. स्वतः सचिननं विराट आपला वारसदार ठरेल असं भाकित मार्च 2012 मध्येच केलं होतं आणि विराटने केवळ सचिनचा वारसाच पुढे चालवला नाही, तर नोव्हेंबर 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा रेकॉर्डही मोडला.
यासोबतच एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचा विक्रमही विराटने त्याच्या नावे केला.भारतीय क्रिकेटमध्ये विराटचं स्थान किती खास आहे, याचा अंदाज येण्यासाठी एवढीच गोष्ट पुरेशी ठरावी.
 
क्रिकेटच्या विश्वात एवढं प्रेम सगळ्यांनाच मिळत नाही. याआधी सचिन तेंडुलकरविषयी लोकांना अशी क्रेझ वाटायची. विराटनं त्याच सचिनचा वारसा पुढे चालवला आहे. त्यावेळी सचिनच्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या निमित्तानं मुकेश अंबानींनी आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमात, तुझे विक्रम कोण मोडेल असा प्रश्न अभिनेता सलमान खाननं सचिनला विचारला होता.
 
त्यावर उत्तर देताना सचिननं विराट कोहली आणि रोहित शर्माचं नाव घेतलं होतं, तेव्हा अनेकांना ती अतिशयोक्ती वाटली होती. पण दशकभरानंतर विराटने सचिनचा 49 वन डे शतकांचा विक्रम मोडला आहे.ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकाच्या सामन्यात शतक साजरं करून विराटनं त्या विक्रमाची बरोबरी केली होती.
एकेकाळी ‘बिगडा हुआ बेटा’ म्हणून हिणवला गेलेला विराट, भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईत आहेच, पण जगभरातही त्याचे चाहते विखुरले आहेत.इतकंच नाही, तर विराट जागतिक क्रिकेटचाही एक चेहरा बनला आहे.
 
क्रिकेटचा अँबेसेडर
मुंबईत अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बैठकीत क्रिकेटचा 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, तेव्हा विराटचं उदाहरण देण्यात आलं.माजी ऑलिंपियन नेमबाज आणि 2028च्या ऑलिंपिक-पॅरालिंपिक स्पर्धांचे क्रीडा संचालक निकोलो कांप्रियानी तेव्हा क्रिकेटच्या लोकप्रियतेविषयी बोलताना म्हणाले होते,
 
“आजच्या घडीला विराट कोहली सोशल मीडियावरचा तिसरा सर्वांत लोकप्रिय अ‍ॅथलीट आहे. त्याचे फॉलॉओर्स जवळपास 34 कोटींहून जास्त आहे. सोशल मीडियावर लब्रॉन जेम्स, टायगर वूड्स आणि टॉम ब्रॅडी या अमेरिकेतल्या तीन सुपरस्टार्सच्या फॉलोअर्सना एकत्र केलं, तरी विराटच्या फॉलोअर्सची संख्या त्यापेक्षा मोठी आहे.”
हा ‘ब्रँड कोहली’ असा क्रिकेटसाठीही फायद्याचा ठरला आहे. पण हे यश मिळवण्याची वाट अर्थातच तेवढी सोपी नव्हती. त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.त्यात कष्ट आहेत, अपेक्षांचं ओझं आहे, टीका आहे, ताणतणाव आहेत आणि मानसिक कणखरताही आहे.
 
वडिलांचं निधन आणि खेळावरची निष्ठा
विराट कोहलीच्या मानसिक कणखरतेची प्रचिती 2006 मध्येच आली होती.विराटचे वडील प्रेम कोहली यांना स्ट्रोक (पक्षाघात) झाला. ते बिछान्यावरच पडून होते. त्यावेळी विराट 17 वर्षांचा होता आणि रणजी क्रिकेटमध्ये दिल्लीसाठी खेळायचा.
 
फिरोजशाह कोटला स्टेडियमवर कर्नाटकविरुद्ध रणजी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर विराट नाबाद राहिला होता. रात्री प्रेम कोहली यांना त्रास होऊ लागला आणि दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचं अचानक निधन झालं. अवघ्या काही तासात विराटचं पितृछत्र हरपलं.विराटसाठी तो मोठा धक्का होता, कारण त्याच्या क्रिकेटच्या प्रवासात वडिलाचंही मोलाचं योगदान होतं. वडिल अचानक गेलेले, घरी नातेवाईक येत होते आणि विराट रडलाही नाही.
 
सकाळी त्यानं दिल्लीचे प्रशिक्षक चेतन शर्मांना फोन केला, घडलेल्या गोष्टीची कल्पना दिली आणि आपण इनिंग पूर्ण करणार असल्याचं सांगितलं.तो स्टेडियममध्ये गेला. आपल्या सहकाऱ्यांसमोर विराटनं अश्रूंना वाट करून दिली आणि मैदानात उतरला. त्यानं 90 रन्सची खेळी केली. विराटच्या अतुलनीय धैर्य आणि कर्तव्याप्रती निष्ठेचं प्रतिस्पर्ध्यांनीही कौतुक केलं.
 
आपली खेळू पूर्ण करूनच विराट वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी रवाना झाला. घराची सगळी जबाबदारी त्यानंतर विराट आणि त्याचा मोठा भाऊ विकास यांच्यावर आली.वडिलांच्या मृत्यूनं विराट एका रात्रीत प्रौढ झाला, असं त्याची आई सरोज म्हणाल्या होत्या. क्रिकेटच्या मैदानातही तो आणखी जिद्दीनं उतरू लागला, खेळावर त्यानं लक्ष केंद्रीत केलं आणि मागे वळून पाहिलंच नाही.
 
विराटला 'चीकू' नाव कसं पडलं
एकदा भारत-इंग्लंड मॅचदरम्यान विकेटकीपिंग करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं भर मैदानात विराट कोहलीला 'चीकू' अशी हाक मारली आणि मैदानावरच्या या 'अँग्री यंग मॅन'चं मैदानाबाहेरचं टोपणनाव जगजाहीर झालं.
पण हे नाव विराटला कधी आणि कसं मिळालं? त्याविषयी विराटनंच केविन पीटरसनसोबतच्या इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये एकदा माहिती दिली होती.विराट दिल्लीसाठी रणजी क्रिकेट खेळू लागला, तेव्हा केस अगदी बारीक ठेवायचा. त्याचे गाल तेव्हा गोबरे गोबरे होते आणि ते लहान केसांमुळे आणखीनच उठून दिसायचे.
 
ते पाहून दिल्ली टीमच्या एका कोचना ‘चंपक’ या लहान मुलांच्या मासिकातल्या चीकू सशाची आठवण व्हायची. त्यांनीच विराटला चीकू नावानं हाक मारायला सुरूवात केली.आपला 31वा वाढदिवस साजरा करताना विराट कोहलीने त्या 15 वर्षांच्या या चिकूला एक पत्र लिहिलं होतं.
 
अंडर-19 विश्वविजय आणि टीम इंडियात पदार्पण
फेब्रुवारी 2008 मध्ये भारतानं मलेशियातील क्वालालंपूरमध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं, तेव्हा विराटनं त्या टीमचं नेतृत्त्व केलं होतं.
एक फलंदाज म्हणूनही विराटनं तेव्हा भरीव कामगिरी केली होती. सहा महिन्यांतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं दारही त्याच्यासाठी उघडलं.
 
2008 च्या श्रीलंका दौऱ्यासाठी विराटचा भारतीय संघात समावेश झाला. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सहवाग हे दोघंही दुखापतग्रस्त झाल्यानं वन डे मालिकेत विराटला पदार्पणाची संधी मिळाली. त्या मालिकेत विराटनं एक अर्धशतकाही साजरं केलं.
 
मग 2010 साली झिम्बाब्वेविरुद्ध हरारेमध्ये त्यानं ट्वेन्टी20त पदार्पण केलं तर 2011 साली वेस्ट इंडीज दौऱ्यावर कसोटीत पाऊल ठेवलं. आयपीएलमध्येही पहिल्या मोसमापासून विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी जोडला गेला.
धावा करण्यातलं सातत्य आणि धावा करण्याची भूक यामुळे विराटची सातत्याने सचिन तेंडुलकरशी तुलना केली गेली. कोहली सचिनचे विक्रम मोडेल, तो पुढचा सचिन आहे अशाही चर्चा रंगत.
 
त्याचं दडपण न घेता विराटनं धावा करण्यावर भर दिला. त्याला सचिनचं मार्गदर्शनही लाभलं. 2011 च्या विश्वचषक विजयानंतर सचिनला खांद्यावर उचलून मैदानाची फेरी मारण्यात विराटचाच पुढाकार होता.
2011-12मध्ये ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत भारतीय संघ चारीमुंड्या चीत झाला. पण विराटसाठी ही सीरिज खास होती कारण याच सीरिजमध्ये विराटने टेस्ट करिअरमधलं पहिलंवहिलं शतक झळकावलं.
 
सहकारी एकापाठोपाठ एक बाद होत असताना विराटने ठेवणीतल्या फटक्यांसह शतक साजरं केलं. तेंडुलकर-द्रविड-गंभीर असे मोठे प्लेयर लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. मात्र विराटने या शतकासह आगमनाची वर्दी दिली.
 
नव्या जमान्याचा आक्रमक क्रिकेटर
2011-12च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराटच्या शेरेबाजीचीही चर्चा झाली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या आणि चाहत्यांच्या स्लेजिंगलाही तो प्रत्युत्तर द्यायला घाबरला नाही.
बलाढ्य खेळाडूंनाही थेट आव्हान द्यायला घाबरत नसे.ऑस्ट्रेलियातल्या पुढच्या अनेक मालिकांमध्येही तेच चित्र दिसून आलं. 2014-15च्या दौऱ्यावर विराट आणि मिचेल जॉन्सनमध्ये मैदानावर खटका उडाला, तेव्हा पंचांना मध्यस्थी करावी लागली होती.
 
भारतीय क्रिकेटरचं हे इतकं आक्रमक रूप अनेकांसाठी नवं होतं.खरंतर विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा बदलाचे वारे वाहात होते. आयपीएल आणि ट्वेन्टी20 मुळे क्रिकेट कात टाकत होतं.
 
अशात विराट केवळ केवळ भारतीय क्रिकेटमधल्याच नाही, तर देशातल्या नव्या पिढीचा प्रतिनिधी बनला आणि त्या पिढीला साजेसा आत्मविश्वासही त्याच्यात होता. साहजिकच त्या दिवसांत विराटच्या आक्रमक आणि काहीशा उद्धट स्वभावाचीही चर्चा रंगायची. त्याची अरेला कारे करण्याची वृत्ती सगळ्यांच्या पचनी पडत नसे.पण प्रत्यक्षात विराट अगदी मेहनती आणि नम्र मुलगा असल्याचं कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि इतर टीममेट्स सांगायचे. हळूहळू जगालाही ते दिसून आलं.
 
'प्ले हार्ड' ही लढवय्या विराटची वृत्ती ऑस्ट्रेलियन चाहत्यांनाही आवडू लागली, तशी तिथेही त्याच्या चाहत्यांची संख्या वाढू लागली.अगदी पाकिस्तानातही विराटचे चाहते आहेत. कुणाला आपल्या मुलानं विराटसारखं व्हावंसं वाटतं.
वेस्ट इंडीजचा विकेटकीपर जोशुआ डी सिल्वाच्या आईचा हा व्हिडियो आठवतोय? जुलै 2023 मध्ये टीम इंडिया त्रिनिदादमध्ये गेली, तेव्हा जोशुआच्या आईनं प्रेमानं विराटची भेट घेतली होती.
 
'चेस मास्टर' विराट
विराटला ऐन भरात फलंदाजी करताना पाहणं, खास करून त्याचे लाडके कव्हर ड्राईव्ह शॉट्स खेळताना पाहणं, ही चाहत्यांसाठी पर्वणी असते. उंचावरून चेंडू टोलवत राहण्यापेक्षा ग्राऊंड स्ट्रोक्सवरही तो भर देतो.
आऊटस्विंगिंग, ऑफस्टंपबाहेर जाणाऱ्या बॉल्सवर तो अनेकदा ढेपाळताना दिसतो. पण रंगात आला की विराटला मोठी खेळी करण्यापासून रोखणं कठीण जातं.
 
वन डे क्रिकेटमध्ये रन चेस म्हणजे धावांचा पाठलाग करताना तर विराटची बॅट आणखीनंच तळपते. संघाला सामने जिंकून देण्याचं आव्हान त्यानं सातत्यानं पेललं आहे. त्यामुळेच विराटला चेस मास्टर हे बिरूद मिळालं.
जगभरात जिथे जिथे तो खेळला, तिथे विराटनं धावांची टांकसाळ उघडली.
 
इतकंच नाही, तर 2010-2020 या दशकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आयसीसीनं विराट कोहलीला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने सन्मानित केलं होतं.वन डेत 13 हजार रन्सचा टप्पा ओलांडणारा विराट सचिननंतरचा दुसराच भारतीय फलंदाज आहे.
 
कोणते फटके कधी खेळायचे याचं शास्त्र, भागीदारी रचत स्कोअरबोर्ड हलता ठेवण्याची रणनीती, प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा सखोल अभ्यास, मैदानं आणि खेळपट्टीचं चोख आकलन, तंत्रात काय बदल करायला हवेत याची स्पष्ट जाणीव ही विराटच्या खेळाची वैशिष्ट्यं आहेत.
 
आपल्या फिटनेसच्या बाबतीतही तो तेवढाच जागरूक आहे. 2018 साली आरोग्याच्या समस्या पाहता विराटनं मांसाहार आणि अगदी दूधही बंद करण्याचा, म्हणजे व्हेगन आहार घेण्याचा निर्णय घेतला होता. आहार आणि व्यायामाविषयीची शिस्त तो अगदी कटाक्षानं पाळतो.
आत्मविश्वास, खेळाप्रती समर्पण, एकाग्रता, निष्ठा आणि शिस्त ही विराटच्या यशामागची कारणं म्हणता येतील.
या गुणांनीच विराटला भारतीय संघात अढळ स्थान मिळवून दिलं आणि यथावकाश धोनीच्या निवृत्तीनंतर कर्णधारपदाची धुराही त्याच्या खांद्यावर विसावली.
 
कर्णधारपदाचा काटेरी मुकुट
2014 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असताना अचानकच विराट कोहलीकडे कसोटी संघाच्या कप्तानपदाची धुरा आली.अ‍ॅडलेडमधील सामन्यापूर्वी तत्कालीन कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या अंगठ्याला झालेली जखम पूर्णतः भरून निघाली नाही, त्यामुळे कोहलीला पहिल्यांदाच कसोटी संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली.कर्णधार म्हणून आपण कशी कामगिरी बजावू शकतो, हे कोहलीने पहिल्याच सामन्यात दाखवून दिलं.
 
2022 साली कर्णधारपदावरून दूर होईपर्यंत त्यानं 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्त्व केलं होतं. त्यातल्या 40 मॅचेस भारतानं जिंकल्या तर 17 वेळा टीमला पराभव स्वीकारावा लागला. कसोटीत कर्णधार म्हणून विराटचा विन रेट आहे 58.82 टक्के.
 
तर वन डेत त्यानं 95 सामन्यांत भारताचं नेतृत्त्व केलं. त्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं भारतात 24 आणि भारताबाहेर 41 अशा 65 मॅचेस जिंकल्या. वन डेत कोहलीचा विन रेट 68.42 टक्के आहे.
 
ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये विराटनं नेतृत्त्व केलेल्या 50 सामन्यांत केवळ 16 सामने भारतानं गमावले आहेत आणि त्याचा विन रेट 64.58 आहे.
 
कर्णधार म्हणून विराटला आयसीसी स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवता आलं नाही, पण ही आकडेवारी त्याला भारतीय क्रिकेटच्या महानतम कर्णधारांच्या पंक्तीत नेऊन ठेवते.
 
पण एवढं यश मिळवूनही आयसीसी स्पर्धांमध्ये मात्र विराटला कर्णधार म्हणून विजेतेपद मिळवता आलं नाही, ही गोष्ट अनेकांसाठी चुपपूट लावणारी आहे. आयपीएलमध्येही त्याला अजून विजेतेपद साजरं करता आलेलं नाही.कर्णधारपदाचा मुकुट काटेरी असतो, आणि विराटलाही त्याचा अनुभव आला.
 
2019 पासून कोहलीचा बॅट्समन म्हणून फॉर्म घसरणीला लागला होता. तेव्हा त्यानं कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा आणि फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. आधी ट्वेन्टी20, मग वन डे आणि त्यानंतर कसोटीचं कर्णधारपदही त्यानं सोडलं आणि त्या जागी रोहित शर्माची नेमणूक झाली.
 
एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत, अशी नेहमी चर्चा होते. विराट आणि रोहितच्या बाबतीतही तशी चर्चा अनेकदा झाली.दोघांनी आपल्यात कुठलाही बेबनाव नसल्याचं अनेकदा स्पष्ट केलं आहे. तरीही विराट आणि रोहितचं पटत नसल्याच्या चर्चा वारंवार होत राहतात.
 
विराटची सेकंड इनिंग
2021-22 हे वर्ष विराटसाठी कठीण काळ घेऊन आलं होतं. त्याच्या बॅटमधून म्हणाव्या तशा रन्स वाहात नव्हत्या. ट्वेन्टी20 च्या कर्णधारपदावरून तो पायउतार झाला होता.
 
सतत खेळून दमल्यामुळे त्यानं 2022 साली महिनाभर विश्रांतीही घेतली होती. 2008 पासून सातत्याने टेस्ट, वनडे, ट्वेन्टी20 तसंच आयपीएल खेळणाऱ्या कोहलीने तेव्हा पहिल्यांदाच महिनाभर बॅटला हातदेखील लावला नाही.
 
पण आशिया चषकात त्यानं अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकलं आणि मग 2022च्या ट्वेन्टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 रन्सची तडाखेबंद खेळी करून संघाच्या विजयाचा पाया घातला.
तेव्हापासून विराट नव्या जोशात खेळताना दिसतो आहे. संघात एका सीनियर खेळाडूची भूमिका बजावताना दिसतो आहे.
 
पण हे पुनरागमन करणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्यामागे कोणता मानसिक संघर्ष होता, याविषयी विराटनं 2022 मध्ये स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं,
 
"त्या महिनाभरात मी माझ्या बॅटला हातचं लावला नाही. मागच्या दहा वर्षांत असं कधी घडलं नव्हतं. हा सगळा दिखाऊपणा आहे, असं मला वाटायला लागलं. तुझ्यात ते कॅलिबर आहे तुझ्यात ती इन्टेसिटी आहे, हे मी स्वतःलाच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तेच माझं शरीर म्हणत होतं की आता थोडं थांब, माझं मन म्हणत होत की, तुला विश्रांतीची गरज आहे, थोडा ब्रेक घे.
 
"मी मानसिकदृष्ट्या खंबीर आहे, असं लोकांना वाटायचं. पण प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात. तुम्हाला ती मर्यादा माहीत असायला हवी नाहीतर गोष्टी अनहेल्दी होऊन जातात. मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो हे सांगायला मला आता काहीच वाटत नाही. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात असं ढोंग करणं कधीही वाईट."
 
मानसिक आरोग्याविषयी बोलण्याचा खुलेपणा दाखवल्याबद्दल विराटचे अनेकांनी आभारही मानले होते.
 
अनुष्कासोबतची पार्टनरशिप
विराट आणि अनुष्काची पहिली भेट 2013 साली एक शाम्पूच्या जाहिरातीच्या निमित्तानं झाली होती. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि मग प्रेमाचं नातंही जुळलं.
 
2014 मध्ये टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यावर अनुष्काला गर्ल फ्रेंड म्हणून विराटसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आणि एक प्रकारे या नात्यावर शिक्कामोर्तब झालं.एक क्रिकेटर आणि अभिनेत्री अशा या स्टार कपलमधल्या नात्याची चर्चा झाली नसती तरच नवल.
 
दुर्दैवानं त्या दौऱ्यावर कसोटी मालिकेत विराटला सूर सापडला नाही आणि त्याचं खापर काहींनी अनुष्कावर फोडलं. बाकी कशापेक्षाही विराटने खेळाकडे लक्ष द्यावं असे सल्लेही अप्रत्यक्षपणे देण्यात आले.
 
दोघांनी अर्थातच अशा अनाहूत सल्ल्यांकडे दुर्लक्ष केलं. पण 2016 सालीही पुन्हा एकदा असं घडलं, तेव्हा विराट अनुष्काच्या बाजूनं उभा राहिला.
 
वर्षभरानं, म्हणजे 2017 साली दोघांनी मीडिया आणि चाहत्यांना चकवून इटलीत विवाह केला. मुलगी वामिकाच्या जन्माच्या वेळी विराटनं पॅटर्निटी लीव्ह घेतली, तेव्हा त्याचीही मग चर्चा झाली होती.
प्रसिद्धीत राहूनही आपली करियर्स तसंच व्यावसायिक आयुष्य आणि खासगी आयुष्य यात अंतर कसं राखायचं विराट आणि अनुष्कानं दाखवून दिलं आहे.
 
Published By- Priya Dixit