शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. अष्टविनायक
Written By

श्री वरदविनायक

अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते. यासंदर्भात पौराणिक अख्यायिका सांगितली जाते. वचकनवी नावाचे ऋषी होते. एकदा त्याच्या आश्रमाला राजा रूक्मांगदाने भेट दिली. त्यावेळी ऋषीपत्नी त्याच्या रूपावर मोहित झाली. तिने त्याला आपल्या आश्रमात बोलावले मात्र त्याने तिकडे जायला नकार दिला. 

हे देवांचा राजा इंद्राला कळाले तेव्हा त्याने रूक्मांगदाचे रूप घेऊन तिचा उपभोग घेतला. यातून तिला गृटसामंड नावाचा मुलगा झाला. त्याला मोठेपणी आपल्या जन्माची कथा समजल्यानंतर आईला शाप देऊन बोराचे झाड बनविले.

तिनेही त्याला तुझा मुलगा राक्षस होईल असा शाप दिला. शापित गृटसामंड नंतर पुष्पक जंगलात गेला व गणेशाची पूजा करू लागला. त्याला तेथे देऊळ सापडले तेच हे वरदविनायक देऊळ.

असे म्हणतात की गणेश येथे वरदविनायक (समृध्दी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात 1690 साली सापडली.

1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो.

असे म्हणतात की हा दिवा 1892 पासून पेटता आहे. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. 8 फूट बाय 8 फूट असलेल्या या देवळाला 25 फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे.

जाण्याचा मार्ग :

पुणे-मुंबई महामार्गावर खोपोलीजवळ हा गणपती आहे. पुण्यापासून अंदाजे 80 किलो‍मीटरवर हे देऊळ आहे. मंदिराच्या आजूबाजूस निसर्गसौदर्य असल्यामुळे आपण कोणत्याही हंगामात या ठिकाणी जाऊ शकतो.