1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. एशिया कप 2022
Written By
Last Updated : सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (08:23 IST)

Ind Vs Pak : भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय, हार्दिक-जाडेजा चमकले

संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवण्यात येत असलेल्या आशिया कप टी-20 स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजयी सुरुवात केली आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस पाचारण केल्यानंतर भारतीय संघाने त्यांना 19.5 षटकांत 147 धावांवर रोखलं होतं. पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत भारताने 19.4 षटकांत 5 गडी राखून विजय मिळवला.
 
अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने टिच्चून गोलंदाजी करत पाकिस्तानचे 3 गडी 25 धावांच्या मोबदल्यात बाद केले. त्यासोबतच फलंदाजीतही पाकिस्तानला धक्का देत केवळ 17 चेंडूंमध्ये वेगवान 33 धावा केल्या. हार्दिकच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
 
फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या रविंद्र जाडेजानेही आपल्या बॅटची चमक दाखवत शेवटपर्यंत लढत दिली. त्याने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या गड्यासाठी केलेल्या मजबूत भागिदारीमुळे भारताचा विजय दृष्टिपथात आला. जाडेजाने 28 चेंडूंमध्ये 35 धावा केल्या. तसेच विराट कोहलीनेही 34 चेंडूंमध्ये 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
 
तत्पूर्वी, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांच्या अचून गोलंदाजीच्या बळावर भारताने पाकिस्तानला 147 धावांवर रोखण्यात यश मिळवलं.
 
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात झाली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला.
 
पाकिस्तानला एकामागून एक धक्के देत भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व राखलं. भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर अखेर पाकिस्तान संघ 19.5 षटकांत 147 धावांत गारद झाला.
 
पाकिस्तानकडून सलामीवर मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 4 षटकांत 26 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. त्याला हार्दिक पांड्याने 25 धावांत 3 तर अर्शदीप सिंगने 33 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद करून साथ दिली.
 
वर्षभरानंतर भारत-पाकिस्तान आमनेसामने
गेल्या वर्षी टी-20 क्रिकेट विश्वचषक सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध पुन्हा उभे ठाकले आहेत.
 
या सामन्यातील भारताची संघनिवड हा चर्चेचा विषय ठरली. कर्णधार रोहित शर्माने यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतला खेळवण्याऐवजी दिनेश कार्तिकला या सामन्यात संधी दिल्याने क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.
 
तसंच युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यालाही भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
 
विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीलाच रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांना बाद करून खळबळ उडवून देणारा शाहिन आफ्रिदी दुखापतीमुळे या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजीची मदार हारिस रौफ या गोलंदाजावर अवलंबून आहे.
 
उभय संघ खालीलप्रमाणे -
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर झमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हारिस रौफ, शाहनवाज दहानी.