गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By
Last Modified: शनिवार, 9 नोव्हेंबर 2019 (09:23 IST)

अयोध्या प्रकरण : देशातील सर्वात मोठा निकाल थोड्याच वेळात होणार स्पष्ट

देशातील सर्वात जुना खटला असलेल्या अयोध्या प्रकरणावर आज दि.९ सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्ट निकाल सुनावणार आहे. यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती, त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.या अनुषंगाने देशात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली व मुंबईत अतिदक्षता बाळगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही पोलीस, धडक कृती दले, रेल्वे पोलीस, गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव दल यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होत असल्याने तत्पूर्वी हा निकाल येणे निश्चित होते. त्यानुसार, आता उद्या यावर अंतिम निकाल येणार आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्ट हा निकाल देणार आहे. १३४ वर्षांचा हा जुना खटला असून त्यावर येणारा उद्याचा अंतिम निकाल हा ऐतिहासिक निकाल असणार आहे.
 
दरम्यान, कालच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्याकडील सर्व महत्वाच्या तत्काळ सुनावणीचे खटले नियोजित सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याकडे सोपवले होते. त्यावरुनच लवकरच अयोध्येवर निकाल येऊ शकतो याची चर्चा सुरु होती. सरन्यायाधीश गोगोई यांच्या निवृत्तीसाठी केवळ चारच कामकाजाचे दिवस शिल्लक राहिले असल्याने उद्याचाच दिवस हा निकालाचा दिवस निवडला गेला असावा असे राजकीय विश्लेषकांकडून स्पष्ट केले गेले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवाड्यात वादातील दोन तृतीयांश जमीन मिळालेल्या हिंदू पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयातील आपला युक्तिवाद संपविला आहे.  ७० वर्षे जुन्या अयोध्या खटल्यात २.७७ एकर जागेचा वाद आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवाड्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात ६ ऑगस्ट रोजी सुनावणी सुरू झाली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर ही सुनावणी सुरू होती. न्या. एस. ए. बोबडे, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा न्यायपीठात समावेश आहे. रामलल्ला, निर्मोही आखाडा, अखिल भारतीय रामजन्मस्थान पुनरुत्थान समिती, हिंदू महासभेचे दोन गट, शिया वक्फ बोर्ड आणि गोपाल सिंग विशारद यांचे कायदेशीर वारस हे या खटल्यातील पक्षकार आहेत.