आंबेडकर- एक निष्णात वकील
बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार म्हणून सर्व जग ओळखते. अमेरिकेतील कोंलबिया विद्यापीठात बाबासाहेबांचे विचारशिल्प आहे. बॅ. बाबासाहेब हे एक उत्तम वकील होते. तसेच त्यांनी उलटतपासात अनेकांची भंबेरी उडवली व खटल्यातील सत्य न्यायालयामसोर उघड करून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला, याची फार कमी लोकांना माहिती असेल. बॅ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने माढा तालुका न्यायालय व सोलापूर जिल्हा न्यायालय पावन झालेले आहे. बॅ. बाबासाहेब जे खटले लढले ते गोरगरिबांसाठी व समाजातील वंचित वर्गाकडून सामाजिक भावनेने लढले. इंग्लंडमध्ये बॅरिस्टरचे शिक्षण घेताना त्यांना अतोनात त्रास झाला. बॅरिस्टर होऊन ते ज्यावेळी भारतात आले व मुंबई उच्च न्यायालयात वकिली चालू केली तेव्हा त्यंना अस्पृश्तेचा कटू अनुभव आला. बार लायब्ररीमध्ये ते ज्या टेबलावर बसत होते त्या टेबलाकडे उच्चभ्रू समाजातील वकील फिरकत नव्हते.
खरे म्हणजे तो प्रसंगच त्यांचे पुढील अस्पृश्तेविरूद्धच्या लढय़ाचे स्फुलिंल्ग ठरला व त्यांनी अस्पृश्तेविरूद्ध लढा देण्याचे ठरविले. बॅ. बाबासाहेबांचा उलट तपास अत्यंत भेदक होता. ज्येष्ठ स्वातंत्र्सेनानी शंकरराव मोरे व शंकरराव जेधे यांनी पुणे येथे केलेल्या भाषणात थोर विचारवंत अण्णासाहेब भोपटकर यच्यावर कडक शब्दात टीका केलेली होती. भोपटकरांनी याबाबत पुणे न्यायालयात मोरे व जेधे यच्याविरूद्ध खटला दाखल केला होता. बॅ. बाबासाहेब व शंकरराव मोरे, शंकरराव जेधे यांच्यात तीव्र राजकीय वैमनस्य होते. तरीही त्यांनी आपले वकीलपत्र बॅ. आंबेडकरांना दिले. या खटल्याच्य सुनावणीच्यावेळी बॅ. आंबेडकरांनी अण्णासाहेब भोपटकरांची भेदक उलटतपासणी केली व उत्तरे देताना भोपटकरांची दमछाक झाली. त्यांच्या उलटतपास अपूर्ण राहिला व त्यांनी पुढील तारीख घेतली. आण्णासाहेब भोपटकर महाराष्ट्रातील नामवंत ज्येष्ठ विचारवंत, त्यांची एवढी दमछाक झाली की, त्यांनी पुढील तारखेस खटलाच काढून घेतला. बॅ. बाबासाहेब यांची कुशाग्र बुद्धी व इंग्रजीवरील असामान्य प्रभुत्व यामुळे न्यायाधीश सुद्धा त्यांचा युक्तिवाद ऐकताना दंग होऊन जायचे.
पुढे समाजसेवेमुळे त्यांनी वकिली व्यवसाय कमी केला. ते घटनेचे शिल्पकार झाले. ज्या उच्च न्यायालयात त्यांना अस्पृश्यतेचा कटू अनुभव आला त्या उच्च न्यायालयाचे कामकाज आज बॅ. आंबेडकरांनी तयार केलेल घटनेनुसार चालते, हा एक न्यायच आहे. घटनेच्या या थोर शिल्पकाराचे शिल्प उच्च न्यायालयात नसावे, याची फार मोठी खंत मनाला वाटते. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी याबाबत सत्वर पाऊल उचलून घटनेच्या या शिल्पकाराचे शिल्प मुंबई उच्च न्यायालयात साकार करणे, हीच या घटनेच्या थोर शिल्पकारास आदरांजली ठरेल.
अॅड. धनंजय माने