मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

चिपळूणजवळचं तिवरे धरण फुटलं आणि 4 वर्षांच्या रुद्रने सर्वस्व गमावलं

- मुश्ताक खान
रुद्रला पाहून कोणाचंही हृदय द्रवेल इतका गोड मुलगा आज आई-वडिलांविना पोरका झाला आहे. आपल्या घरात एवढे लोक का येत आहेत? सुट्ट्या संपल्यानंतरही अचानक लांबचे नातेवाईक आत्याच्या घरी का येत आहेत? हे त्याला कळत नाहीये.
 
"आई-बाबांची अजून त्याने आठवण काढली नाही. पण दर दोन दिवसांनी बाबांना फोन लावा असं तो सांगते. आता त्याने फोन लावायला सांगितलं तर मी काय करू," असा प्रश्न त्याच्या आत्या मनाली संतोष माने यांना पडला आहे.
 
२ जुलै २०१९ च्या रात्री ९.३० वाजता तिवरे धरण फुटलं आणि गावातली १४ घरं भुईसपाट झाली. रुद्रचं संपूर्ण कुटुंब तिवरे भेंदवाडीत राहत होतं. या दुर्घटनेत कुटुंबीयांसमवेत रुद्रचं घरंही वाहून गेलं आहे. सुदैवानं रुद्र आत्याकडे असल्यानं तो बचावला आहे.
 
चार वर्षांचा रुद्र आपल्या आत्याच्या घरी भावंडांसह खेळत होता, तेव्हा मी त्याला भेटलो. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे, आपली सतत काळजी करणारे आईबाबा आपल्याला यापुढे भेटणार नाही याची पुसटशीही कल्पना नसलेला रुद्र खेळण्यात दंग होता.
 
ती काळरात्र
आजूबाजूला उपस्थित असेल्या नातेवाईकांमध्ये मात्र भयाण शांतता होती.
 
"रुद्रला आम्ही काहीच सांगितलेलं नाही. एवढ्यात त्याला आम्ही काही सांगणारही नाही. रुद्रच्या आई-वडिलांनी त्याला माझ्याकडे सोपवलं आहे. मीच आता त्याची आई आहे" असं मनाली सांगत गहिवरल्या.
 
रुद्रच्या वडिलांचं दादरमध्ये सलून आहे. व्यवसाय बरा चालला होता. रुद्रनं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. एवढ्यासाठीच त्यांनी आपल्या मनावर दगड ठेवत चार वर्षांच्या मुलाला आपल्यापासून ४० किलोमीटर लांब चिपळूणमध्ये ठेवलं होतं.
 
रुद्रच्या आई-वडिलांनी मोठ्या हौसेनं चिपळूणच्या भेंडीनाका इथल्या परांजपे मोतीवाले शाळेत त्यानं नाव घातलं. जून महिन्याच्या १७ तारखेपासून तो ज्यूनिअर के. जी. मध्ये जाऊही लागला आहे.
 
त्याचे आई-वडील, आजी-आजोबाही खूश होते. रुद्रला शाळेत जायला रिक्षाही ठरवण्यात आली होती. सर्व काही ठरल्याप्रमाणे आनंदी वातावरणात सुरू होतं.
 
आता त्याचं शिक्षण पूर्ण करून त्याला मोठा माणूस बनवण्याची जबाबदारी माझी आहे. त्याला मी कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असं आत्या मनाली भावूकपणे सांगत होत्या.
 
या घटनेत रुद्रचे बाबा रणजित अनंद चव्हाण (वय - २८), आई ऋतुजा रणजीत चव्हाण (वय -२४), आजोबा आनंद हरिभाऊ चव्हाण (वय - ६३) याचे मृतदेह सापडले आहेत. तर आजी अनिता अनंत चव्हाण (वय - ५८) आणि त्याची दीड वर्षांची बहीण दुर्वा रणजीत चव्हाण अजूनही बेपत्ता आहेत.
 
रुद्रच्या भविष्याची चिंता
"आमचं व्यवस्थित सुरू होतं. आमच्या सुखी कुटुंबाला कोणाची दृष्ट लागली हेच कळत नाही. १ जूनला सर्व नातेवाईकांच्या उपस्थिती माझ्या बाबांचे म्हणजे रुद्रच्या आजोबांचा ६२वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
 
गावातली मंडळी या सोहळ्यात सहभागी झाली होती. पण पुढच्या एक महिन्यात असं काही होईल याचा कणभरही विचार कोणाच्या मनाला शिवला देखील नव्हता. हे आमच्या बरोबर काय झालं हेच आम्हाला कळत नाही," मनाली पुढे सांगतात.
 
रुद्रच्या भविष्याची चिंता त्याच्या इतर नातेवाईकांनीही व्यक्त केली. रुद्रला सरकारी मदत मिळणार आहे का? अशी विचारणा त्यांच्याकडून केली गेली.
 
त्यांच्या मनातला हा प्रश्न आम्ही स्थानिक खासदार विनायक राऊत यांना विचारला.
 
त्यावर, "शिवसेना रुद्रला दत्तक घेणार आहे. आतापासून त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही घेणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्याला कशाचीही कमतर राहणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत," असं त्यांनी सांगितलं.