शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (09:17 IST)

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील 6 अनुत्तरीत प्रश्न

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डिला क्रूझवर छापा टाकला. एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक (IRS) समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
 
या छाप्यात हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचं नाव समोर आलं. त्यामुळे या छाप्याचं प्रसारमाध्यमांमधील महत्त्व वाढलं.
 
गेल्या महिन्याभरापासून या प्रकरणात सातत्यानं नवीन वळणं घेणाऱ्या घडामोडी घडताना दिसतायेत. कॉर्डिला क्रूझवरील छाप्याबाबत साक्षीदार म्हणून नोंद असलेल्या प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडेंवरच खंडणीचे आरोप केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं आहे.
 
त्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
1) आर्यननं ड्रग्ज सेवन केलं होतं की नाही?
कॉर्डिला क्रूझवर छाप्यानंतर आर्यन खानला NDPS कायद्यातील 8C, 20B, 27 आणि 35 या कलमांअंतर्गत अटक करण्यात आली.
 
एनसीबीनं आर्यन खानला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं. मात्र, आर्यनच्या रक्ताचे, लघवीचे आणि हेअर फॉलिकल्सचे नमुने घेण्यात आले नाहीत.
 
ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपीच्या रक्त आणि लघवीच्या नमुन्यांसह हेअर फॉलिकल टेस्टद्वारे केसांचे नमुने घेऊन अंमली पदार्थांच्या सेवनाची माहिती मिळवली जाते.
 
मग आर्यन खानला अटक का करण्यात आलीय, तर तज्ज्ञांच्या मते एनसीबीचा संपूर्ण खटला हा आर्यन खानच्या ड्रग्जच्या तस्करी आणि संपू्र्ण कटात सहभागी होता यावर आधारित आहे. या आरोपांमुळं न्यायालयाकडून त्याला जामीन मिळणं कठीण ठरणार आहे.
प्रसिद्ध वकील आशिमा मंडला या बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, सरकारी पक्षाच्या खटल्यात अनेक कमतरता आहेत.
 
"आरोपींवर लावलेली कलमं, ड्रग्ज बाळगणे आणि वापराशी संबंधित आहेत. मात्र हे आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाला ठोस पुरावे सादर करता आलेले नाहीत," असं त्या म्हणाल्या.
 
एनसीबीनं आधी आर्यन खानकडे ड्रग्ज आढळल्याचं म्हटलं आणि नंतर त्याला नकार दिला, असं मंडला म्हणाल्या.
 
नंतर असं सांगण्यात आलं की, तो ड्रग्जचा वापर करत होता, मात्र ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही वैद्यकीय पुरावे नाहीत.
 
पण सरतेशेवटी प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे, आर्यन खाननं अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं की नाही, हे सिद्ध होईल यासाठी आवश्यक वैद्यकीय चाचण्या का घेण्यात आल्या नाहीत?
2) आर्यन खानला अद्याप जामीन का मिळत नाहीय?
मुंबईच्या एका विशेष न्यायालयानं 20 ऑक्टोबरला आर्यन खान आणि इतर दोन आरोपींना जामीन देण्यास नकार दिला.
 
या प्रकरणातही आर्यन खानला जामीन नाकारण्याचं कारण हे, व्हाट्सअॅप चॅटच असल्याचं सांगण्यात आलं. त्यात आर्यन खान अज्ञात लोकांशी ड्रग्जबाबत चॅटिंग करत असल्याचं सांगण्यात आलं.
म्हणजे केवळ व्हाट्सअॅप चॅटच्या आधारे आर्यन खानचा जामीन अर्ज नामंजूर होऊ शकतो का?
 
द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातील 15 जुलैच्या एका वृत्तानुसार सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठानं एका प्रकरणाच्या सुनावणीत, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मॅसेजला काहीही महत्त्वं नसल्याचं म्हटलं होतं.
 
या वृत्तानुसार सोशल मीडियावर सध्या काहीही तयार केलं किंवा हटवलं जाऊ शकतं. न्यायालय व्हाट्सअॅप मॅसेजला महत्त्व देत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.
 
आशिमा मंडला यांच्या मते, जर एनसीबीकडे व्हाट्सअॅप चॅटमध्ये आरोपींच्या विरोधात पुरावे असतील, तर त्यांनी नावं जाहीर न करता न्यायालयासमोर ती सादर करून, स्पष्टपणे आरोप लावावा.
 
3) किरण गोसावी कोण आहे आणि आता ते कुठे आहेत?
एनसीबीने कॉर्डिला क्रुझवर छापा टाकल्यानंतर एका व्यक्तीनं आर्यन खानसोबत सेल्फी घेतला. तो सेल्फी सर्वत्र व्हायरल झाला. आर्यन खानसोबत छाप्यानंतर सेल्फी घेणारी व्यक्ती कोण, असा प्रश्न सर्वत्र विचारला जाऊ लागला.
 
त्यानंतर एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, क्रूझवरील कारवाईवेळी एनसीबीच्या टीमसोबत नऊ पंच होते. त्यात किरण गोसावी हेही होते.
 
मात्र, नंतर किरण गोसावींचा वादग्रस्त इतिहास समोर येत गेला.
 
किरण गोसावींच्या विरोधात 29 मे 2018 ला पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण गोसावींच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी कोर्टात चार्जशिट देखील दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून गोसावी फरार होते.
 
पुणे पोलिसांनी आता त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस काढली असल्याची माहिती पुण्यातील झोन एकच्या उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी बीबीसी मराठीला दिली होती.
याप्रकरणी सोमवारी (25 ऑक्टोबर) बीबीसी मराठीनं पुण्याच्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्याशी पुन्हा संपर्क साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, "किरण गोसावी यांनी अजून सरेंडर केलेलं नाही. आम्ही अलर्ट आहोत. पोलीस स्टेशन आणि कोर्टातही अलर्ट आहोत. त्यांनी काही माध्यमांना मुलाखत दिली आहे. आम्ही सर्च करतोय. लूक आऊट नोटीस काढली आहे."
 
तसंच, याच प्रकरणातील साक्षीदर असलेल्या प्रभाकर साईल यांनी व्हीडिओ जारी करत समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप केलेत. या व्हीडिओमध्ये त्यांनी सांगितलं की, ते किरण गोसावीचे बॉडीगार्ड होते. त्यानंतर त्यांनी किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. ते आरोप तुम्हाला इथं सविस्तर वाचता येतील.
 
मात्र, आता प्रश्न उरतो, तो म्हणजे, किरण गोसावी नेमके आहेत कुठे? कारण सुरुवातीला त्यांच नाव समोर आल्यानंतर त्यांनी काही माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. मात्र, नंतर ते कुठेच दिसले नाहीत.
 
बीबीसी मराठीच्या मयांक भागवत आणि नीलेश धोत्रे यांच्याशी सोमवारी बोलताना किरण गोसावी यांनी प्रभाकर साईल यांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत.
 
4) सॅम डिसूझा कोण आहेत आणि त्यांची यात भूमिका काय?
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सॅम डिसूझा हे नाव अधून-मधून समोर येत असतानाच, या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी आपल्या व्हीडिओत सॅम डिसूझा यांचं नाव घेतलं.
 
प्रभाकर साईल यांनी खंडणीचे आरोप केले आणि त्याबाबत जी माहिती दिली, त्यात सॅम डिसूझा हे नाव वारंवर येतं. किंबहुना, शाहरूख खानची मॅनेजर पूजा या जेव्हा भेटायला आल्या, तेव्हा किरण गोसावी, सॅम डिसूझा आणि पूजा हे एकाच गाडीत बसले होते, असंही प्रभाकर साईल यांनी व्हीडिओत म्हटलंय.
 
या सगळ्यांत सॅम डिसूझा नावाबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात असतानाच, सोमवारी (25 ऑक्टोबर) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सॅम डिसूझांच्या नावाचा उल्लेख केला.
संजय राऊत म्हणाले, "सॅम डिसूझा हा मुंबई आणि भारतातला सर्वांत मोठा मनी-लाँडरिंग प्लेयर आहे. हा मोठा खेळ आहे आणि तो आता कुठे सुरू झालाय. जे सत्य उजेडात येतंय, ते धक्कादायक आहेत. देशभक्तीच्या नावाखाली खंडणी वसूल केली जातेय, खोट्या केसेस टाकल्या जातायत."
आता प्रश्न उपस्थित होतो की, सॅम डिसूझा नेमके कोण आहेत, त्यांची या संपूर्ण प्रक्रियेत नेमकी भूमिका काय आहे?
 
5) मुंद्रा पोर्ट प्रकरणात आतापर्यंत काय काय कारवाई झालीय?
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील अदानी समूहाच्या मुद्रा पोर्टवर काही दिवसांपूर्वी दोन कंटेनरमधून तब्बल 3,000 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. महसूल गुप्तचर संचलनालय (DRI) ने ही कारवाई 16 सप्टेंबर 2021 रोजी केली होती. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या 15 दिवस आधी.
 
मुंद्रा पोर्टवर जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची जागतिक बाजारातील किंमत जवळपास 21 हजार कोटी इतकी असल्याची सांगितली जातेय.
 
काँग्रेससह इतर काही विरोधी पक्षांनी आरोप केला की, क्रूझवरील एनसीबीची छापेमारी ही मुद्रा पोर्टवरील कारवाईवरून लक्ष हटवण्यासाठीचा प्रयत्न आहे.
 
दरम्यान, गृह मंत्रालयाच्या परवानगीनंतर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मुंद्रा पोर्टवरील ड्रग्ज जप्तीचं प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडे सोपवण्यात आलं.
 
मात्र, या प्रकरणात पुढे काय कारवाई झाली, तपास कुठवर आलाय, याबाबत कुठलीच माहिती अद्याप समोर आली नाही.
 
6) ड्रग्जप्रकरणी बॉलीवुड कलाकारांच्या चौकशा, पण पुढे काय?
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर ड्रग्ज सेवनाच्या अंगानं एनसीबीने मुंबईत काही कलाकारांच्या चौकशा केल्या. त्यात प्रामुख्यानं अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचं नाव सर्वत्र चर्चिलं गेलं. रियाला गेल्यावर्षी म्हणजे 2020 साली सप्टेंबर महिन्यात अटकही झाली होती.
मात्र, 28 दिवस कोठडीत राहिल्यानंतर मुंबई हायकोर्टानं रियाला जामीन दिला आणि तिची सुटका झाली. मात्र, तिच्यावरील आरोपांबाबत पुढे काय झालं किंवा ती कारवाई कुठवर आलीय, हे एनसीबी किंवा संबंधित यंत्रणेनं स्पष्ट केलं नाही.
 
तसंच, एनसीबीनं ड्रग्जप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना गेल्यावर्षी 22 नोव्हेंबर 2020 यांना ड्रग्ज प्रकरणातच न्यायालयीन कोठडी सुनावली होती. एनसीबीने 21 नोव्हेंबर 2020 रोजी भारती सिंहच्या प्रॉडक्शन हाऊस आणि घरावर छापा टाकला होता आणि त्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला होता.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया या दोघांनीही गांजा सेवन करत असल्याची कबुली दिल्याचं वृत्त एएनआयनं दिलं होतं.
 
दीपीका पादुकोण, सारा अली खान, रकूलप्रित सिंह आणि श्रद्धा कपूरची एनसीबीने कसून चौकशी केली होती. बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीने चौकशी केली. तर टीव्ही सिरीयलची अभिनेत्री प्रतिका चौहानवर कारवाई करण्यात आली.
 
मात्र, या सर्व प्रकरणात पुढे काय झालं, हे कळू शकलं नाही.