सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (16:55 IST)

काश्मीरमध्ये महिनाभर मोबाईल बंद झाल्यामुळे कंपन्यांचे 90 कोटी रूपयांचे नुकसान

रियाज मसरूर
जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख प्रदेशात 1 कोटी 25 लाख लोक राहतात. यातील 1 कोटी 13 लाख लोक मोबाईल वापरतात, ते विविध कंपन्यांचे ग्राहक आहेत, अशी माहिती ट्रायने सादर केली आहे.
 
1 कोटी 13 लाख लोकांपैकी तब्बल 60 लाख सबस्क्रायबर काश्मीर प्रदेशातील आहेत. ट्रायने गेल्या 45 दिवसांतील आकडेवारी सादर केली आहे, यामध्ये मोबाईल कंपन्यांना साधारण 90 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. काश्मीर खोऱ्यात मोबाईल जेव्हा बंद होतात तेव्हा या कंपन्यांना साधारणपणे दोन कोटी रुपयांचे नुकसान होते. 2016 मध्ये तीन महिने मोबाईल कंपन्यांच्या सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या, तेव्हा त्यांना 180 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
 
अशाप्रकारे नुकसान झाले, तर काही मोबाईल कंपन्या काश्मीरमधून आपला सर्व कारभार जम्मूमध्ये नेतात. या कंपन्यांमध्ये कितीतरी काश्मिरी तरूण काम करतात. या कंपन्यांचे नुकसान झाले, तर त्याचा थेट परिणाम या तरूणांच्या नोकऱ्यांवर होतो. सध्याच्या घडीला तरुण याच परिस्थितीला तोंड देत आहेत. इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे संपर्क साधणे अवघड झाले आहे, इतकेच नाही तर मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
प्रशासकीय पुढाकार केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्यांचे अनेक अधिकारी खोऱ्यांमध्ये सक्रिय आहेत. ते खोऱ्यांमध्ये दररोज परिस्थितीचा अंदाज घ्यायला जातात. याशिवाय विविध विभागांमधूनही गुंतवणूक करण्याविषयीही चर्चा सुरू आहे. वीज विभागात 10 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे, त्याप्रमाणेच शिक्षण आणि पायाभूत सुविधांसाठी 900 कोटी रुपये वेगळे ठेवण्यात आले आहेत.
 
जम्मू आणि काश्मीरमध्ये 4 नवीन पदवी महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी 4 हजार प्राध्यापकांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. पंचायतींना 800 कोटी रुपये खर्च करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. हे पैसे त्यांना थेट देण्यात आलेले आहेत.
 
जम्मू आणि काश्मीरमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे प्रमाण सर्व देशाच्या तुलनेत सगळ्यात उत्तम असल्याचा निर्वाळा विरोधी पक्षांनीही दिलेला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये 16 विद्यार्थ्यांसाठी 1 प्राध्यापक असल्याचंही ते सांगतात, हेच प्रमाण इतर राज्यांमध्ये 25 ते 60 विद्यार्थ्यांसाठी एक प्राध्यापक असे आहे. युनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्लीकडून अपेक्षा अमेरिकेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट झाली. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आज ट्रंप यांची भेट घेतील. यानंतर मोदी आणि इम्रान खान युनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्लीत बोलतील. काश्मिरी जनतेला या भेटी आणि भाषणांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
 
पुढील काही दिवसांत काही मोठ्या घोषणा होतील, असे येथील लोकांना वाटते. परंतु असे काही खास होणार नाही असे काही तज्ज्ञ सांगतात. मोदी आणि इम्रान यावेळी काश्मीरसंदर्भातील आपापली मते मांडतील. असे असले तरीही सामान्य लोकं आणि व्यापाऱ्यांना या युनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्लीकडून बऱ्याच आशा आहेत. या महासभेत काहीच घडले नाही, तर मात्र काश्मिरी जनता फारच निराश होईल.