सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (12:19 IST)

अमिताभ बच्चन यांचा राजकीय प्रवास : राजीव गांधीचे मित्र ते नरेंद्र मोदी सरकारचे जाहिरातकर्ते

नामदेव अंजना
MMRDAनं मुंबई मेट्रोच्या प्रसिद्धीसाठी 'मुंबई काही मिनिटांत' या मथळ्याखाली एक जाहिरात बनवलीय. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हेही दिसतात.
 
अमिताभ बच्चन हे 'मुंबई कुछ मिनिटों में' असं म्हणत मुंबईत होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांना समर्थन देताना दिसतात.
 
त्याआधी अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या बाजूने भूमिका मांडत ट्वीटही केलंय.
 
"माझ्या एका मित्राला मेडिकल इमर्जन्सीचा सामना करावा लागला. त्याने गाडीऐवजी मेट्रो पकडून जाण्याचा निर्णय घेतला. तो मेट्रो प्रकल्पाने खूपच प्रभावित झाला होता. मेट्रो अत्यंत वेगवान, प्रवाशांच्या सोयीची आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याचं त्याने सांगितलं. प्रदूषणाला मेट्रो उत्तम पर्याय आहे. अधिक झाडं लावा. मी माझ्या घरच्या बागेत लावली आहेत. तुम्ही वृक्षारोपण केलंत का?" असं अमिताभ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मुंबई मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीत उभारण्यावरून सध्या वाद सुरू आहे. राज्याच्या सत्तेतील वाटेकरी असलेल्या शिवसेनेसह विविध पक्षांनी आणि 'वनशक्ती'सह काही सामाजिक संघटनांनी आरेतल्या प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध केलाय.
 
या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांचं एमएमआरडीएच्या जाहिरातीतलं आवाहन आणि ट्वीट वादाच्या भोवऱ्यात सापडलंय.
 
एरव्ही चाहत्यांचं प्रेम अनुभवणाऱ्या बिग बींना या ट्वीटवरून चांगलंच ट्रोल कोलं जात आहे. अमिताभ नेहमी सत्ताधाऱ्यांची बाजू घेतात असा आरोप केला जात आहे.
 
मेट्रोच्या समर्थनावरून 10 वर्षांत अमिताभ बच्चन यांचा यूटर्न?
अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याला इतिहासातील एक गोष्ट कारणीभूत आहे. 2010 साली अमिताभ बच्चन यांनी मेट्रोला विरोध केला होता.
 
2010 साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना मानखुर्द-अंधेरी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित होता. या मार्गात अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील 'प्रतिक्षा' बंगला येत होता.
 
त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी 28 ऑगस्ट 2010 रोजी 'बच्चन बोल' या ब्लॉगवरून या मेट्रो मार्गाबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
प्रायव्हसीला धोका निर्माण होणार असल्याचा दावा करत ब्लॉगवरून मेट्रोबद्दल अमिताभ बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली होती.
 
त्यावेळी सर्वस्तरातून टीका झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्पष्टीकरण देत 'मुंबईतल्या बदलांचं स्वागत करतो' असं म्हटलं होतं. मात्र, एमएमआरडीएनं अंधेरी-मानखुर्दला जोडणाऱ्या मेट्रोचा रस्ता एनएस रोड नंबर 10 ऐवजी गुलमोहर रोडवरून नेण्याचं ठरवलं. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या 'प्रतिक्षा' बंगल्याला काहीच झालं नाही.
 
2010 साली आपल्या बंगल्यावर परिणाम होत असल्यानं मेट्रो मार्गाला विरोध करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी आता म्हणजे 2019 साली मुंबईतील मेट्रो मार्गांसाठी ट्वीट आणि जाहिरातही केली आहे. त्यामुळे ते टीकेचं लक्ष होत आहेत.
 
अमिताभ बच्चन यांच्या राजकीय संबंधांचीही आजवर नेहमीच चर्चा होत राहिलीय. मेट्रोवरील यूटर्नच्या निमित्तानं अमिताभ बच्चन यांच्या राजकीय पक्ष, नेते आणि एकूणच राजकारणाशी असलेल्या संबंधांचीही चर्चा सुरू झाली.
 
अमिताभ यांचा नेमका कधी राजकारणाशी संबंध आला, याचा बीबीसी मराठीनं धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला.
 
नेहरू-गांधी आणि बच्चन कुटुंबाचे संबंध
नेहरू-गांधी आणि बच्चन कुटुंबाचे संबंध फार जुने आणि जवळचे मानले जातात. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांचे नेहरू-गांधी कुटुंबाशी संबंध होते.
 
सिनेसमीक्षक मुर्तझा अली खान हाफिंग्टन पोस्टवरील एका लेखात सांगतात, "सरोजिनी नायडू यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात इंदिरा गांधी आणि तेजी बच्चन यांची भेट झाली आणि पुढे त्या मैत्रिणी झाल्या. दुसरीकडे, जवाहरलाल नेहरू यांनी 1955 साली कवी हरिवंशराय बच्चन यांना परराष्ट्र मंत्रालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून नियुक्त केलं होतं."
 
आधीच्या पिढीपासूनच नेहरू-गांधी आणि बच्चन कुटुंबीयांचा परिचय असल्यानं अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांचीही लहानपणापासूनच ओळख होती. पुढे राजीव गांधी इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेले, मात्र दोघांमध्ये पत्रव्यवहार होत असे.
 
"राजीव गांधी यांच्या लग्नानंतर सोनिया गांधींना भारतीय रितीरिवाज कळावं, म्हणून इंदिरा गांधी यांनी तेजी बच्चन यांच्यासोबत राहण्याचाही सल्ला दिला होता,." असंही मुर्तझा अली खान सांगतात.
 
थेट राजकारणाशी नसला, तरी नेहरू-गांधी कुटुंबाच्या निमित्तानं अमिताभ यांचा राजकारणाशी जवळचा संबंध आला होता. पुढे जाऊन सक्रिय राजकारणातही याच कुटुंबांच्या सोबतीनं अमिताभ बच्चन उतरले.
 
1984 साली राजकीय एन्ट्री आणि तीही थेट निवडणुकीच्या मैदानात
अमिताभ बच्चन हे 1969 सालापासून सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. आजही ते सिनेमे करतात. वयाची पंच्याहत्तरी पार केली असतानाही, अमिताभ यांच्यातील ऊर्जा कमालीची भासते.
 
गेली सुमारे चार ते पाच दशकं भारतीय सिनेसृष्टीत सलगपणे सक्रिय राहिलेल्या अमिताभ यांनी 1984 साली काही काळ ब्रेक घेतला होता.
1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात काँग्रेसप्रती सहानुभूतीची लाट होती. त्याचवेळी राजीव गांधी यांच्या आग्रहाखातर अमिताभ बच्चन हे राजकारणात आले आणि थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
1984 सालच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून अमिताभ बच्चन हे काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवार म्हणून उभे राहिले.
 
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा या दिग्गज नेत्याचा अमिताभ बच्चन यांनी तब्बल 1 लाख 87 हजार मतांनी पराभव केला होता. या पराभवामुळे हेमवतीनंदन बहुगुणा यांनी राजकारणातूनच संन्यास घेतला होता. बहुगुणा हे 1973 ते 1975 या कालावधीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
 
मात्र सिनेमाचं काम आणि राजकारण यांचा ताळमेळ साधता आला नाही. त्यामुळे मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ लागलं आणि त्यामुळं तीनच वर्षांत अमिताभ बच्चन यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.
 
याच काळात राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स घोटाळ्याचा आरोप झाला होता. अमिताभ यांच नाव त्यात घेण्यात आलं. मात्र, हे आरोप कुठेही सिद्ध झाले नाहीत. या आरोपांमुळे अमिताभ बच्चन यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं.
 
मात्र, 'द प्रिंट' आयोजित 'ऑफ द कफ' या कार्यक्रमात बोलत असताना अमिताभ बच्चन यांनी खासदारकीचा राजीनामा देण्यामागचं कारण सांगितलं होतं. ते म्हणाले होते, "अलाहाबादच्या जनतेला मतं मागताना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात मी असमर्थ ठरलो. मी खूप आश्वासनं दिली होती, मात्र ती पूर्ण करू शकलो नाही."
 
"1984 साली राजकारणात येण्याचा निर्णय पूर्णपणे भावनिक होता. मित्राल (राजीव गांधी) मदत करायला हवं, असं वाटलं आणि राजकारणात आलो. मात्र, राजकारणात भावनिकतेला स्थान नाही, हे कळलं आणि बाहेर पडलो," असंही अमिताभ बच्चन या कार्यक्रमात म्हणाले होते.
 
अमरसिंह आणि समाजवादी पक्षाशी संबंध
अमिताभ बच्चन यांनी 1987 साली काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा दिला, तरी ते अपरिहार्यपणे राजकारणाशी जोडले गेलेच. सक्रिय राजकारणात उतरले नसले, तरी त्यांच्या खडतर काळात राजकीय व्यक्तींची गरज भासल्याचं दिसून येतं.
 
अमिताभ बच्चन यांनी 1995 साली 'अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड' नावाची इव्हेंट मॅनेजमेंट आणि फिल्म प्रॉडक्शनसाठीची कंपनी स्थापन केली होती. मात्र, ही कंपनी दिवाळखोरीत निघाली.
 
पुढे अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या तिकिटावर राज्यसभेतही गेल्या. शिवाय, जया बच्चन यांनी 2004 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा प्रचारही केला. समाजवादी पार्टीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर किंवा इतर कार्यक्रमात अमिताभही सहभागी होत असत.
 
नरेंद्र मोदींशी संपर्क
विविध राजकीय पक्षांशी संबंध येत असला, तरी अमिताभ बच्चन हे कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने राजकीय व्यक्ती, पक्षांच्या जवळ गेल्याचे दिसून आले आहे.
भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमिताभ बच्चन यांचा संपर्क 'गुजरात टुरिझम'च्या सदिच्छादूत बनल्यानं आला. गुजरातमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारनं अमिताभ बच्चन यांना सदिच्छादूत बनवलं होतं.
 
आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारच्या अनेक जाहिरातींमध्ये अमिताभ बच्चन दिसत असतात.
 
अमिताभ बच्चन यांनी टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "नरेंद्र मोदींनी मला गुजरातच्या पर्यटनाचं सदिच्छादूत बनण्याची विनंती केली. जर माझ्या चेहरा आणि आवाज यामुळे गुजरातच्या पर्यटनाला फायदा होत असेल तर का करू नये, असा विचार केला. कारण गुजरात खरंच पर्यटनासाठी त्या योग्यतेचा आहे. पण याचा अर्थ राजकीयदृष्टी मी त्यांच्याशी जोडला, असा अर्थ होत नाही."
 
मी नरेंद्र मोदींसाठी राजकीय रॅली किंवा प्रचार केला नाही. फक्त गुजरातच्या पर्यटनासाठी काम केलं, असंही अमिताभ या मुलाखतीत म्हणाले होते.
 
'गुजरातच्या पर्यटना विभागाचे सदिच्छादूत' हा अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयात 'बिझनेस प्रपोजल' म्हणूनच नोंदवलेला आहे, असं वरिष्ठ सिनेसमीक्षक पराग चाफेकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
'बाळासाहेब ठाकरे नसते, तर आज जिवंत नसतो'
अभिनेते अमिताभ बच्चन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कौटुंबिक संबंधांची नेहमीच चर्चा होते. अमिताभ बच्चन हे अनेकदा बाळासाहेब ठाकरेंसोबत व्यासपीठावर एकत्र दिसले.
 
ठाकरे कुटुंबीयांशी अमिताभ बच्चन यांचे संबंध फार जुने असल्याचं स्वत: अमितभा बच्चन यांनीच एकदा सांगितलं होतं.
 
'ठाकरे' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी अमिताभ बच्चन हे प्रमुख पाहुणे होते. त्यावेळी त्यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ म्हणाले, "जेव्हा मला सर्वाधिक गरज होती, तेव्हा बाळासाहेबांनी मला मदत केली. ते नसते, तर आज मी जिवंत नसतो. मी त्यांचा प्रचंड आदर करतो."
 
1983 साली 'कूली' सिनेमाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता आणि गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी रुग्णवाहिका उलब्ध नव्हती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची रुग्णवाहिका अमिताभ बच्चन यांच्यासाठी उपलब्ध करून दिली होती. हाही अनुभव अमिताभ यांनी 'ठाकरे'च्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी सांगितला होता.
 
बाळासाहेबांनी जया बच्चन यांना सूनेसारखं प्रेम दिल्याचंही अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.
 
राज ठाकरे आणि बच्चन कुटुंबीयांचा शाब्दिक संघर्ष
बाळासाहेबांशी जरी अमिताभ बच्चन यांचे घरगुती संबंध होते, तरी राज ठाकरे यांच्याशी त्यांचा झालेला वाद सर्वश्रुत आहे.
 
मराठी भाषा आणि भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे सभा गाजवत असताना, एका सभेत राज ठाकरेंनी बच्चन कुटुंबीयांवर टीका केली होती.
 
"अमिताभ बच्चन मुंबईत राहतात, मात्र उत्तर प्रदेशचा अभिमान बाळगतात. ऐश्वर्या रॉयच्या नावानं उत्तर प्रदेशात शाळा काढलीय," असं राज ठाकरे म्हणाले होते.
 
या टीकेला उत्तर देताना जया बच्चन म्हणाल्या होत्या, "मी त्यांना (राज ठाकरे) ओळखत नाही." शिवाय, पुढे 2013 साली जया बच्चन यांनी 'मी हिंदीतच बोलणार' असं म्हणत पुन्हा एकदा राज ठाकरे आणि मनसेशी पंगा घेतला होता.
 
पुढे राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन हे एका कार्यक्रमातही दिसले. राज ठाकरे अमिताभ यांच्या पायाही पडले होते.
 
दोन वर्षांपूर्वी अमिताभ यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त राज ठाकरेंनी सहा व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
 
तेव्हा राज म्हणाले होते, "काही वर्षांपूर्वी माझा अमिताभ बच्चन यांच्याशी वाद झाला. त्याचं स्पष्टीकरण मी दिलंय. माझी भूमिका मराठी भाषेच्या संदर्भात होती. आजसुद्धा ती कायम आहे. त्यांच्या समक्ष मी ती मांडली आहे हेही आवर्जून सांगतो."
 
तसंच, "मतभेद असले तरीही अमिताभ यांच्या वैभवशाली कलाकिर्दीबद्दल, श्रेष्ठत्वाबद्दल माझ्या मनात शंका नव्हती, आजही नाही. अमिताभ बच्चन हे सिनेमा संस्कृतीचे राजदूत आहेत यावरून वाद होऊ शकत नाही," असंही राज ठाकरे म्हणाले होते.
 
एकूणच राजकीय पातळीवर विरोधी विचारांचे असलेल्या पक्षांशी वेळोवेळी अमिताभ बच्चन यांचा संबंध आल्याचा दिसून येतो.
 
मात्र, वरिष्ठ सिनेसमीक्षक पराग चाफेकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "अमिताभ बच्चन हे सोयीस्कर भूमिका घेतात, असं मला वाटत नाही. जेव्हापासून ते राजकारणातून बाहेर झाले, तेव्हापासून त्यांनी राजकारण सोडलंच. त्यानंतर राजकारणाशी त्यांचा तसा काही संबंध राहिला नाहीय."