5G नेटवर्क कसं आहे? चीनमध्ये वेगवान डेटा सेवा सुरू
चीनच्या टेलिकॉम कंपन्यांनी देशातील ग्राहकांसाठी 5G सेवा सुरू केली आहे. या सोबतच चीनने जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे.
चीनची सरकारी टेलिकॉम कंपनी चायना मोबाईल, चायना युनिकॉम आणि चायना टेलिकॉम यांनी गुरुवारी आपल्या 5G डेटा प्लॅनची घोषणा केली.
चीन आणि अमेरिकेत व्यापारी आणि तंत्रज्ञानाबाबतचं वेगळंच युद्ध सुरू असताना ही घोषणा करण्यात आली आहे, हे विशेष.
चीनपूर्वी दक्षिण कोरिया, अमेरिका आणि इंग्लंडने यावर्षी 5G सेवा सुरू केली आहे. 5G अर्थातच पाचव्या पिढीचं मोबाईल नेटवर्क आहे. साहजिकच आपण अनुभवतो त्यापैक्षाही अधिक वेगवान इंटरनेट स्पीड 5G मध्ये लोकाना अनुभवता येणार आहे.
डेटा प्लॅनची किंमत
आधी चीनने 5G सेवेची सुरुवात पुढच्या वर्षी करण्याचं ठरवलं होतं. पण त्यांनी या प्रक्रियेला वेग दिला आणि याच वर्षी 5G सेवा सुरू केली आहे.
राजधानी बीजिंग आणि प्रमुख शहर शांघाय यांच्यासह चीनच्या 50 शहरांमध्ये ही सुपरफास्ट सेवा सुरू झाली आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार 5G डेटा प्लॅनची किंमत 128 युआन (सुमारे 1,300 रुपये) ते 599 युआन (सुमारे 6,000 रुपये) आहे.
चीनमध्ये 5G सेवा सुरू करण्यासाठी नेटवर्कसंबंधित उपकरणांचा सर्वाधिक पुरवठा ख्वावे (Huawei) कंपनीने केला आहे. ही कंपनी इतर अनेक देशांत 5G नेटवर्क निर्माण करण्यासाठी महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
विशेष म्हणजे ख्वावे ही कंपनी अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचं म्हणत अमेरिकेने या कंपनीला काळ्या यादीत टाकलेलं आहे.
ख्वावेने त्यांच्यावरील सगळे आरोप फेटाळले आहेत. अमेरिकेचं हे पाऊल म्हणजे त्यांच्या व्यापारी युद्धाचा एक भाग असल्याचं चीनला वाटतं.