1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मोहसीन अख्तर मीर : उर्मिला मातोंडकर यांच्या पतीविषयी हे माहीत आहे?

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांना पक्षाने उत्तर मुंबई मतदार संघातून उमेदवारी घोषित केली आहे. त्यांचं नाव गेल्या एका आठवड्यापासून चर्चेत आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर त्यांचे पती मोहसीन अख्तर मीर यांच्याविषयी चर्चेला ऊत आला आहे.
 
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी 3 मार्च 2016ला मोहसीन अख्तर मीर यांच्याशी लग्न केलं. मोहसीन काश्मीरचे असून ते व्यावसायिक आणि मॉडेल आहेत. ते उर्मिला यांच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहेत. लग्नानंतर उर्मिला यांनी DNAला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं, "आम्ही आमच्या लग्नात फक्त कुटुंबीय आणि मित्रांना बोलावलं होतं. कारण लग्न साध्या पद्धतीनं व्हावं अशी आमच्या कुटुंबीयांची इच्छा होती. त्यामुळे ते अत्यंत खासगी पद्धतीनं झालं."
 
या दोघांचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीनं झालं होतं. त्यांच्या लग्नाला प्रसिद्ध व्यक्तींपैकी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा उपस्थित होते. बातम्यांनुसार, उर्मिला आणि मोहसीन लग्न यांचं लग्न सर्वप्रथम हिंदू परंपरेनुसार झालं होतं. त्यानंतर त्यांचा निकाहसुद्धा वाचण्यात आला होता.
 
मोहसीन अख्तर मीर कोण आहेत?
मोहसीन हे एका व्यावसायिक कुटुंबातून येतात. 21व्या वर्षी त्यांनी घर सोडलं होतं. यानंतर त्यांनी मुंबईत येऊन मॉडेल विश्वात करिअरला सुरुवात केली. ते 2007च्या मिस्टर इंडिया स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. मोहसीन यांनी तरुण कुमार, मनीष मल्होत्रा, विक्रम फडणिस, रन्ना गिल्ल यांचे ड्रेस परिधान करून रँपवॉक केला आहे. तसंच चित्रपटांतही त्यांनी नशीब आजमावून पाहिलं आहे. त्यांनी 'लक बाय चान्स' आणि ' मुंबई मस्त कलंदर' या चित्रपटांत काम केलं आहे. मोहसीन यांना 1 भाऊ आणि 3 बहिणी आहेत.
 
मोहसीन आणि उर्मिला यांची पहिली भेट मनीष मल्होत्रा यांची भाची रिद्धी मल्होत्रा यांच्या लग्नात 2014मध्ये झाली होती. यानंतरच या दोघांमधील प्रेमाला सुरुवात झाली.
 
"माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या ऊर्मिला मातोंडकर यांच्या लग्नाची बातमी ऐकून मला आनंद झाला आहे. त्यांचं जीवन नेहमीच रंगीला राहावं, ही माझी मनापासून इच्छा आहे," असं चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी उर्मिला यांच्या लग्नानंतर ट्वीट केलं होतं.
 
रामगोपाल वर्मा यांनी उर्मिला यांना 'रंगीला' चित्रपटात काम दिलं होतं. या दोघांनी 'रंगीला', 'कौन' आणि 'भूत' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.