मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 29 जून 2020 (13:32 IST)

अमित शाह: राहुल गांधी यांची वक्तव्यं चीन आणि पाकिस्तानला आवडत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत की संकटकाळातही राहुल गांधी हे संकुचित राजकारण करत आहेत.
 
ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले मत व्यक्त केलं.

1962 च्या युद्धापासून आजपर्यंत झालेल्या सर्व घडामोडींबदद्ल आपण संसदेत चर्चेला तयार आहोत. मात्र 'सरेंडर मोदी' या हॅशटॅगवर राहुल गांधी यांनी आत्मचिंतन करायला हवं. या टॅगला चीन आणि पाकिस्ताननेही पाठबळ दिलं आहे, त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असं शाह या मुलाखतीत म्हणाले.
 
काँग्रेसने शाहांच्या या टीकेवर पलटवार करत, काँग्रेस नव्हे तर भाजप आणि स्वतः नरेंद्र मोदींचे चीनशी सर्वांत जास्त घनिष्ठ संबंध आहेत, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
 
अमित शाह काय म्हणाले?
भारतविरोधी कारवाईला निपटून काढण्यात सरकार पूर्णपणे सक्षम आहे, मात्र अशा काळातही इतक्या मोठ्या पक्षाचा माजी अध्यक्ष असं उथळ राजकारण करताना पाहून वेदना होतात असे शाह यांनी या स्पष्ट केले.
 
"हो, भारतविरोधी कारवाईविरोधात लढण्यासाठी आम्ही पूर्णतः सक्षण आहोत. परंतु संकटकाळातही इतक्या मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष करत असलेल्या राजकारणामुळे वेदना होतात. काँग्रेसच्या नेत्याने केलेला हॅशटॅगला चीन आणि पाकिस्तान उचलून धरत असतील तर मी नाही काँग्रेसने काळजी करण्याची गरज आहे."
 
चीनची सैन्यदलं भारतीय सीमेत आली होती का, असा प्रश्न विचारल्यावर शाह यांनी आता प्रत्यक्ष ताबा रेषेच्या स्थितीबाबत काहीही बोलणं योग्य ठरणार नाही, असं सांगितलं.
 
"संसदेचं अधिवेशन होईल, चर्चा करायची असेल तर या. 1962 पासून आजपर्यंत चर्चा होऊन जाऊ दे. चर्चेला कोणीही घाबरत नाहीये. जेव्हा जवान संघर्ष करत होते, सरकार ठोस पावलं उचलत होतं तेव्हा पाकिस्तान आणि चीनला आनंद होईल अशी वक्तव्य करू नयेत." अशा शब्दांमध्ये त्यांनी राहुल यांना फटकारलं.
 
भाजपाने काँग्रेसवर आणीबाणीवरुन टीका केल्यानंतर काँग्रेसने भाजपावरच तुमच्या पक्षात लोकशाही नसल्याचे सांगून प्रत्युत्तर दिले होते.
 
याबद्दल बोलताना अमित शाह म्हणाले, " लोकशाही ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. शिस्त आणि स्वातंत्र्य यांनाही स्वतःचं असं मूल्य आहे. अडवाणी यांच्यानंतर राजनाथजी, नितिनजी, पुन्हा राजनाथजी मग मी आणि माझ्यानंतर नड्डाजी अध्यक्ष झाले. हे सगळे एकाच कुटुंबातले आहेत काय? इंदिरा गांधीनंतर गांधी कुटुंबाबाहेरील एकतरी व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदावर आला आहे काय? ते कोणत्या लोकशाहीबद्दल बोलत आहेत?"ते पुढे म्हणाले, "मी कोरोनाच्या काळात राजकारण करत नाहीये. तुम्ही माझे गेल्या दहा वर्षातले ट्वीट्स पाहिले असतील. मी प्रत्येक 25 जून रोजी एक वक्तव्य प्रसिद्ध करतो. लोकशाहीच्या मुळावरच आणीबाणीने घाला घातला. लोकांनी त्याचे स्मरण ठेवलं पाहिजे. कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याने किंवा लोकांनी ते विसरता कामा नये. त्याबद्दल जागृती केली पाहिजे. हे एखाद्या पक्षाबद्दल नाही. तर देशाच्या लोकशाहीवर झालेल्या हल्ल्याबद्दल आहे. संदर्भानुसार भाषा आणणि तिचा अर्थ बदलत असतो."
 
काँग्रेसचा फलटवार
अमित शाह यांना प्रत्युत्तर देत काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं, "गेल्या 10 ते 12 वर्षांत चीनसोबत भापजच्या अध्यक्षांचा जितका संपर्क होत आहे, तितका देशातल्या कोणत्याच पक्षानं संपर्क केलेला नाही.
 
"पंतप्रधानपदी आणि मुख्यमंत्रिपदी असताना नरेंद्र मोदी यांनी चीनसोबत जितका संपर्क ठेवला, तितका दुसऱ्या कुणीच ठेवला नसेल. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 4 वेळा आणि पंतप्रधान असल्यापासून 5 वेळा चीनचा दौरा केला, हे सगळ्यांना माहिती आहे." "अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसोबत खेळणार असतील आणि जबाबदारी झटकत असतील आणि काँग्रेस प्रश्न का विचारत आहे, असं म्हणत असतील, तर आम्ही प्रश्न विचारणं चालूच ठेवू," असंही सिंघवी यांनी म्हटलंय.