सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (19:27 IST)

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये अमरावती दुसऱ्या क्रमांकावर

नितेश राऊत
बीबीसी मराठी, अमरावती
महाराष्ट्रात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोव्हिड- 19 मुळे मृतांच्या संख्येत अमरावती दुसऱ्या क्रमांकावर आहे.  कोव्हिड-19 मुळे मृत्यूचा दर 1.62 वर पोहोचलाय, त्यात जानेवारी पासून दिवसाला एका रुग्णांचा बळी गेलाय.
 
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 7227 नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 28 हजार 648 झाली आहे.
 
अमरावती जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत  453 जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते फेब्रुवारी या दोनच महिन्यात 57 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
आकडेवारीनुसार 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत मृत्यूचा दर हा 1 होता. फेब्रुवारी 5 ते 11 दरम्यान कमी होऊन तो 0.85 वर आला होता. त्यानंतर फेब्रुवारी 12 ते 18 पर्यंत मृत्यू दर 1.62 ने अचानक वाढला. तर 12 फेब्रुवारी पासून दररोज 3 ते 6 लोकांचा मृत्यू होत असल्याचं दिसत आहे.
 
कोव्हिड रुग्णांची संख्या वाढल्यामुळ मृत्यूदरात वाढ झाल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.
 
ते म्हणाले "कोव्हिड चाचणी करण्यासाठी लोक उशिरा येऊ लागलेत. सामान्य नागरिक वेळेपूर्वी कोव्हिड चाचणी करून घेत नाहीत. त्यामुळं मृत्यूदर वाढलाय. वयस्कर आणि पूर्वीचे आजार असणारे ज्यांना रक्तदाब, मधुमेह, किडनीच्या व्याधीने ग्रस्त असणाऱ्यांना मृत्यूची शक्यता अधिक असते.
 
त्यात रुग्ण संख्या वाढली तर मृत्यूदर वाढणारच आहे. कारण यापूर्वी कुटुंबातील एकच कोरोना बाधित व्हायचा पण आता एका कुटुंबातले अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत ही वस्तुस्थिती आहे" निकम म्हणाले.
 
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात बेडची पुरेशी व्यवस्था असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलय. यात खासगी हॉस्पिटलचाही समावेश करण्यात आला आहे.
 
तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटरवरील कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावण्यात आले आहे. तालुक्याच्या ठिकाणाचे वाढीव कोव्हिड सेंटर येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे.
 
तालुका स्तरावर लक्षणे नसणाऱ्या कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णावर तालुक्याच्या ठिकाणी उपचार होईल, त्याला अमरावती येण्याची गरज पडणार नाही. गंभीर रुग्णांना अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचाराठी आणले जाणार आहे. दोन मोठे कोरेंटीन सेंटर जिल्ह्यात आहे त्यात वलगाव हे एक मोठं क्वारंटाइन सेंटर आहे.
 
शासकीय रुग्णालय, पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज म्हणजेच पीडीएमसी या दोन हॉस्पिटल मिळून बेड संख्या 500 च्या वर आहे. वलगाव आणि व्हिएमव्ही शिवाय अनेक खासगी हॉस्पिटल कोव्हिड सेंटर म्हणून घेण्यात आले आहे.
 
त्याचप्रमाणे, अमरावती शहरात मनपा शाळा क्र. 17 विलासनगर, मनपा शाळा नागपुरी गेट, बडनेरा पोलीस ठाण्यामागील मनपा शाळा व विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयात चाचणी केंद्रे सुरू करण्यात येत आहे. तसेच, कोव्हिड उपचारासाठी दोन नवी रुग्णालये वाढविण्याबाबतही लवकरच निर्णय होईल. खासगी निदान केंद्रातील अँटिजेन चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत अस जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
 
यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्यू, 145 जणांना लागण
गेल्या 24 तासांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युंसह 145 जण नव्याने कोरोना लागण झाली आहे.
 
तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 81 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.