मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

'जय श्रीराम'च्या नावानं होणारं लिंचिंग थांबवा, पंतप्रधानांना पत्र

मॉब लिंचिंगच्या घटनांचा उल्लेख करत वेगवेगळ्या क्षेत्रातील 49 जणांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
 
चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल, अनुराग कश्यप, मनी रत्नम, अदूर गोपालकृष्णन, अपर्णा सेन, इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यासह 49 जणांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
 
पत्रात काय लिहिलंय?
आपल्या राज्यघटनेनं देशातल्या सर्व नागरिकांना समान मानलं आहे. त्यामुळे मुस्लिम, दलित आणि इतर अल्पसंख्याकांची जमावाकडून होणारी हत्या लगेच थांबायला हवी.
 
2016मध्ये दलितांविरुद्ध अॅट्रोसिटीच्या 840 घटना घडल्याचं NCRBच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. आम्हाला यामुळे धक्का बसला आहे. गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण कमी झालं आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.
 
1 जानेवारी 2009 ते 29 ऑक्टोबर 2018 दरम्यान धार्मिक द्वेषामुळे घडलेल्या गुन्ह्यांची संख्या 254 इतकी होती. यामध्ये जवळपास 91 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 579 जण जखमी झाले होते. यांतील 62 टक्के घटनांचे बळी मुस्लिम ठरले होते, असंही या पत्रात नमूद केलं आहे.
 
पंतप्रधान मोदी, तुम्ही मॉब लिंचिंगवर संसदेत टीका केली आहे. पण ते पुरेसं नाही. प्रत्यक्षात काय कारवाई केली? असा प्रश्न या सर्वांनी विचारला आहे.
 
देशात 'जय श्रीराम' ही घोषणा आता वादाचं मूळ बनली आहे. 'जय श्रीराम'च्या नावानं अनेक लिंचिंग होत आहे. धर्माच्या नावाखाली अशी हिंसा बघणं धक्कादायक असल्याचं पत्रात म्हटलं आहे.
 
सरकारविरोधात मत मांडल्यामुळे लोकांना देशद्रोही समजण्यात येऊ नये. मतभेदांशिवाय कोणतीही लोकशाही अस्तित्वात राहू शकत नाही, हा मुद्दा पत्रात अधोरेखित करण्यात आला आहे.