बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (18:00 IST)

भव्या लाल यांची नासाच्या कार्यकारी प्रमुखपदी नियुक्ती

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागिरक भव्या लाल यांची अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संशोधन संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (1 फेब्रुवारी) नासाने याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
 
भव्या लाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या नासासाठी परिवर्तन संबंधित समीक्षा दलाच्या सदस्य आहेत. बायडन सरकारच्या अंतर्गत प्रशासनातील बदलाशी संबंधित कामांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.
 
"नासा संस्थेत उच्च पदावरील नियुक्ती केल्या आहेत. भव्या लाल या संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी नियुक्त करण्यात येत आहेत. फिलीप थॉम्पसन व्हाईट हाऊसचे समन्वयक, मार्क एटकिंड संस्थेच्या ऑफिस ऑफ कम्युनिकेशनमध्ये सहायक प्रशासक आणि जॅक मॅकगिनस यांना प्रेस सचिव या पदांवर नियुक्त करण्यात आलं आहे. त्याशिवाय एलिसिया ब्राऊन आणि रिगन हंटर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे," अशी माहिती नासाकडून देण्यात आली आहे.
 
अॅटॉमिक इंजिनिअरिंगची पदवी

भव्या लाल यांच्याकडे इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापन विषयाचा व्यापक अनुभव आहे. त्या 2005 ते 2020 पर्यंत इंस्टीट्यूट फॉर डिफेन्स अॅनालिसिस सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी इन्स्टीट्यूट (STPI) मध्ये रिसर्च स्टाफ सदस्य पदावर कार्यरत होत्या.
 
भव्या लाल यांनी अॅटॉमिक इंजिनिअरिंग विषयात बी. एससी. आणि एम. एससीची पदवी प्राप्त केली आहे.
 
तसंच मॅसाच्यूसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी व्यवस्थापन विषयातही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
 
त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतून सार्वजनिक धोरण आणि सार्वजनिक प्रशासन विषयात पीएचडीसुद्धा केलेली आहे. सध्या त्या अॅटॉमिक इंजिनिअरिंग आणि सार्वजनिक धोरण सन्मान सोसायटीच्या सदस्यसुद्धा आहेत.
 
भव्या लाल यांनी व्हाईट हाऊस कार्यालयातील ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी, नॅशनल स्पेस काऊंसिल, नासा, संरक्षण मंत्रालय आणि इंटेलिजन्स कम्युनिटीसाठी अंतराळ तंत्रज्ञान, धोरण विश्लेषण या विषयांचं नेतृत्व केलं आहे.
 
इतर वैशिष्ट्ये

भव्या यांनी व्यावसायिक रिमोट सेंसिंगवर नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन फेडरल अॅडव्हायझरी कमिटीमध्ये सलग दोनवेळा प्रतिनिधीत्व केलं आहे.
 
तसंच त्यांनी नासाच्या इनोव्हेटिव अॅडव्हान्स्ड कन्सेप्ट्स प्रोग्रॅम आणि नासा अॅडव्हायझरी काऊंसिलच्या व्यवस्थापनात काम केलं आहे.
 
भव्या लाल नासाच्या बजेट आणि आर्थिक सल्लागारसुद्धा राहिल्या आहेत.
 
न्यूक्लियर अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी इन स्पेसमध्ये अमेरिकन न्यूक्लिअर सोसायटीच्या वार्षिक संमेलनात पॉलिसी ट्रॅकच्या सह-संस्थापक आणि सह-अध्यक्ष आहेत. त्या स्मिथ सोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्यूझियम आणि अंतराळ इतिहास आणि धोरणावर एका कार्यक्रमाचं आयोजनही करत असतात.
 
अंतराळ क्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल भव्या लाल यांना इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅस्ट्रोनॉटिक्सकडून गौरवण्यात आलं होतं, अशी माहिती नासाने दिली आहे.