रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (17:41 IST)

जमुना बोरोसाठी किती खडतर होता देशाची अव्वल बॉक्सर बनण्यापर्यंतचा प्रवास?

जमुना बोरो जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. 54 किलो वजनी गटात ती भारताची अव्वल क्रमांकाची खेळाडू आहे. अर्थात, हा प्रवास तितका सोपा नव्हता.
 
आसाममधल्या बेलसिरी या छोट्याशा गावात राहणाऱ्या बोरोला लहानपणापासूनच आजूबाजूच्या गोष्टींबद्दल कुतूहल होतं. एकेदिवशी शाळेतून परत येत असताना एका तरुणांच्या घोळक्याकडे तिचं लक्ष गेलं. तिनं लगेचच या खेळ खेळून पहायचं ठरवलं. जमुनानं पाहिलेला खेळ वुशू होता.
 
अर्थात, आपण एखाद्या खेळात देशाचं प्रतिनिधीत्व करू असं कधीही जमुनाला वाटलं नव्हतं. पण तरीही वुशु तिच्या क्रीडा क्षेत्रातील करिअरमधला 'टर्निंग पॉइंट' होता. नंतर तिनं आपलं सगळं लक्ष बॉक्सिंगवर केंद्रीत केलं. कारण या खेळात चांगलं भविष्य आहे, असं तिला वाटलं.
 
पण तरीही एखाद्या छोट्या ठिकाणाहून येऊन खेळात करिअर करताना अनेक अडचणी येऊ शकतात...विशेषतः संसाधनांच्या बाबतीत. जमुना बोरोला सुरुवातीच्या काळात औपचारिक प्रशिक्षण मिळालंच नाही. ज्यांना बॉक्सिंग आवडायचं, असे काही जण कोणत्याही व्यावसायिक मार्गदर्शनाशिवाय सराव करायचे. लहानगी जमुना त्यांच्यासोबत खेळायला जायची.
 
वैयक्तिक संघर्षासोबत बॉक्सिंगचा सराव

वैयक्तिक पातळीवर तिचा संघर्ष अजूनच खडतर होतात. लहान असतानाच तिचे वडील वारले होते. त्यामुळे मुलांना वाढविण्यासाठी आईला एकटीलाच त्यांची जमीन कसावी लागत होती. जमुनालाही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चहा आणि भाजीपाला विकावा लागत होता.
 
खेळाविषयीच्या सुविधांचा अभाव हे एकमेव आव्हान नव्हतं. खेळ सुरू ठेवण्यासाठी तिला बॉक्सिंग रिंगच्या बाहेरही लढावं लागत होतं. नातेवाईक, शेजारचे लोक तिला खेळापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते. 'हा खेळ बायकांसाठी नाहीये. तुला काही दुखापत झाली, चेहरा बिघडला तर लग्न कसं होणार?' असं सांगून नातेवाईक तिला बॉक्सिंगची भीतीच दाखवत होते.
 
अशावेळी कुटुंबाकडून मिळणारा आधार महत्त्वाचा ठरतो. एखाद्याचं करिअर याच मानसिक आधाराच्या सहाय्याने घडू शकतं किंवा बिघडू शकतं. याबाबत जमुना बोरो खूपच नशीबवान ठरली, कारण तिचं कुटुंब कायम तिच्या पाठिशी उभं होतं. तिला सराव करण्यासाठी प्रोत्साहन देत होतं. त्यांनी कधीच तिचा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेलं यश

जमुनाची गुणवत्ता, कठोर परिश्रम आणि कुटुंबाकडून मिळणारं प्रोत्साहन या सगळ्याचं सार्थक 2010 साली झालं. याचवर्षी तिनं तामिळनाडूमध्ये झालेल्या सब ज्युनिअर महिला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. तो जमुनाच्या आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा दिवस होता.
 
राष्ट्रीय पातळीवर मिळालेलं एक्सपोजर म्हणजे चांगलं प्रशिक्षण आणि अधिक कठोर स्पर्धा...जमुना बोरोसाठी अनेक बॉक्सिंग स्पर्धांचे दरवाजे खुले झाले. राष्ट्रीय कॅम्पचीही संधी तिला मिळाली.
 
2015 सालंही जमुना बोरोच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरलं. तैपेई इथं झालेल्या वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिनं ब्राँझ पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यांमध्ये खेळताना येणारा दबाव कसा हाताळावं याचा अनुभवही तिच्यासाठी खूप मोलाचा ठरला.
 
2018 साली बेलग्रेड इथं झालेल्या इंटरनॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 54 किलो वजनी गटात जमुना बोरोनं रौप्य पदक जिंकलं. पुढच्याच वर्षी 2019 साली रशियात झालेल्या AIBA जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत तिनं कांस्य पदक जिंकलं.
 
एका सामान्य परिस्थितीतल्या मुलींनं आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली भरारी पाहून आसाममध्ये जमुनाचं कौतुक व्हायला लागलं.
 
2019 साली आसाममधील आघाडीचा माध्यम समूह असलेल्या सादिन-प्रतिदिननं क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन जमुना बोरोचा सन्मान केला. हा पुरस्कार आपल्यासाठी अतिशय खास आहे, असं ती सांगते.
 
देशासाठी ऑलिंपिक्स जिंकण्याचं जमुना बोरो हिचं स्वप्न होतं. ती म्हणते की, बायका खेळू शकत नाहीत, असं मानणाऱ्या लोकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे.
 
ग्रामीण आणि दुर्गम भागात सुविधांचा अभाव आहे, असं जमुना बोरो तिच्या स्वतःच्या अनुभवातून सांगते. मात्र अशा ठिकाणी अनेक गुणवान खेळाडू आहेत. अशा गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी देशातील क्रीडा प्राधिकरणानं प्रयत्न करावेत, असं जमुना बोरोचं म्हणणं आहे.