शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (16:38 IST)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मुंबई, पुणे आणि ठाणे तयार आहे का?

मयांक भागवत
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, पुणे या महानगरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 144 दिवसांवर, तर पुण्यात 197 दिवस आहे. एकीकडे, कोरोनाग्रस्तांचे आकडे कमी होतायत.
तर दुसरीकडे रुग्णालयातून डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या वाढतेय. राज्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती आशादायक दिसत असली तरी, येणाऱ्या काळात सणासुदीच्या दिवस आहेत. अनलॉक आणि सणांचे दिवस, मोठ्या संख्येने लोक बाहेर पडल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या परिस्थितीत कोव्हिड-19 च्या दुसऱ्या टप्प्यातील संसर्गासाठी आपण तयार आहोत का?
कोव्हिड-19 चा दुसऱ्या टप्प्यातील संसर्गाची भीती
मुंबईत जुलै-ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होणारी वाढ स्थिरावू लागली. मात्र, गणेशोत्सवानंतर शहरात कोव्हिड-19 रुग्णांच्या संख्येत लाक्षणीय वाढ झाली. मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडल्याने मुंबई, पुण्यात रुग्णांची संख्या वाढल्याचं समोर आलं.
देश अनलॉक होत असल्याने कोव्हिड-19 च्या दुसऱ्या टप्प्याच्या संसर्गाची भीती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी वर्तवली होती. "पुढील तीन महिने आपल्याला सावध राहावं लागेल. सणासुदीचा काळ आणि थंडी सुरू होणार असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील संसर्गासाठी तयार रहावं लागेल. लोकांनी योग्य काळजी घेतली तर, या दुसऱ्या टप्प्यातील संसर्गाचा योग्य मुकाबला करू शकतो," असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन म्हणाले होते.
निती आयोगानेही भारतात कोरोनाचा दुसऱ्या टप्प्यातील संसर्ग होण्याची शक्यता आहे. पण, पहिल्यापेक्षा देशातील आरोग्य व्यवस्था सक्षम असल्याचा दावा केला होता.
काय म्हणतात राज्याचे आरोग्यमंत्री?
राज्य आता जवळपास अनलॉक झालंय. बाजारपेठा उघडल्या आहेत. मुंबईत सर्वसामान्यांची जीवनवाहिनी लोकल ट्रेन सुरू करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे.
 
राज्य सरकारलाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता सतावतेय. याबाबत बीबीसीशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "यूरोप, अमेरिकेत कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झालाय. पण, देशात आणि राज्यात दुसरी लाट येईलच असं आत्ताच म्हणता येणार नाही. पण, काळजी नक्कीच वाटते. जर, मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली तर रुग्णालयांच्या पातळीवर अडचणी येऊ नयेत. यासाठी आपल्याला पुढची पावलं सावध राहून टाकावी लागतील."
राज्यात सद्यस्थितीत 14 लाख 78 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.63 टक्के असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मुंबईची तयारी?
देशाची आर्थिक राजधानी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुंबईची जीवनवाहिनी लोकल ट्रेन काही दिवसातच सामान्यांसाठी सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. पण, त्याचसोबत संसर्ग पसरण्याची भीती देखील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. एकीकडे मुंबईत सर्वांत जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण असताना हे शहर दुसऱ्या लाटेचा सामाना कसं करणार? ज्या शहरात सोशल डिस्टंसिंग शक्य नाही, त्याठिकाणी दुसरी लाट आली तर काय? हा प्रश्न उपस्थित होणं सहाजिक आहे.
कोव्हिड-19 विरोधात मुंबईची तयारी
एकूण कोव्हिड-19 बेड्स 18,478
रिक्त असलेले बेड्स 9,923 (50 टक्क्यांपेक्षा जास्त)
7624 क्वॉरेंन्टाईन सुविधा असलेले बेड्स रिकामे
533 ICU बेड्स उपलब्ध
4,898 ऑक्सिन पुरवठा असलेले बेड्स रिक्त
व्हॅन्टिलेटरची सुविधा असलेले 235 बेड्स रिक्त
(स्त्रोत- मुंबई महापालिका)
कोरोना मुंबईत पीकवर असताना रुग्णालयांमध्ये बेड्स मिळत नव्हते. केईएम, सायन सारख्या पालिका रुग्णालयांच्या दारात रुग्णांचे मृत्यू झाले. मात्र, आता ही परिस्थिती बदलतेय. या आकड्यांवरून स्पष्ट होतं की मुंबई आरोग्य व्यवस्था हळूहळू बळकट होत आहे.
 
मुंबईतील संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. तृप्ती गिलाडा बीबीसीशी बोलताना सांगतात, "मुंबईसारख्या महानगरात कोरोनाग्रस्तांची संख्या स्थिरावली आहे. त्यामुळे पहिली लाट संपत आली आहे असं आपण म्हणू शकतो. पण सणाचे दिवस आणि हिवाळ्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्यापेक्षा आपली आरोग्यसेवा नक्कीच सक्षम झाली आहे. पण, यामुळे आपलं दुर्लक्ष व्हायला नको."
डॉक्टरांच्या माहितीनुसार हिवाळ्यात फुप्फुसांचे आजार वाढतात. त्यामुळे कोव्हिडच्या काळात लोकांनी स्वत:ची काळजी घेतली तर दुसऱ्या लाटेचा आपण नक्की सामना करू शकू. खासकरून, दिवाळीत बंद घरात न भेटता लोकांनी खुल्या जागेत नातेवाईकांना भेटावं.
टास्कफोर्स प्रमुख डॉ. ओक काय म्हणतात?
मुंबई दुसरी लाट झेलण्यासाठी सज्ज आहे का? यावर बोलताना राज्य सरकारच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणतात, "आपल्याकडे रुग्णालयं आहेत, फिल्ड रुग्णालयं उभी झाली आहेत. आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. रुग्णांच्या परिस्थितीनुसार कोणतं औषध प्रभावी काम करेल याची उत्तम माहिती डॉक्टरांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या काही महिन्यांपेक्षा आता मुंबईची आरोग्यसेवा अधिक मजबूत आहे."
 
मुंबईत सद्यस्थितीत 19 हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र जमेची बाजू म्हणजे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 144 दिवसांवर पोहोचलाय.
डॉ. ओक सांगतात, "दुसरी लाट येणारच नाही असा विचार योग्य नाही. आपल्याला त्यासाठी तयार रहायला हवं. पुढील एक वर्ष सरकारचं लक्ष फक्त कोव्हिड-19 वर असलं पाहिजे. तयारी कमी करून अजिबात चालणार नाही. सरकारने कोव्हिड आणि नॉन कोव्हिड रुग्णालयं 50-50 टक्के ठेवली पाहिजेत."
पुणे कसा करणार कोरोनाचा सामना?
पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 767 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 21 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होत आहे हे खरं आहे. पण ऑगस्ट, सप्टेंबरचा महिना पुणेकर कधीच विसरू शकणार नाहीत. रुग्णांची संख्या वाढत होती. बेड्स उपलब्ध नव्हते. उपचारांसाठी रुग्णांना वणवण फिरावं लागत होतं.
पण, आता पुणे कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेच सामना करण्यासाठी सज्ज आहे? याबाबत बोलताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणतात, "मागच्या महिन्यात पुण्यात आलेल्या केंद्रीय पथकाने डिसेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. पुण्यात संख्या वाढली तरी आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. कोरोना कमी झालाय पण संपलेला नाही. त्यामुळे आपल्याला केसेस वाढू नयेत यावर लक्ष केंद्रीत करायला हवं."
 
पुणे जिल्ह्यात सद्य 24194 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मृत्यूचा आकडा 6657 वर पोहोचलाय. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की, पुण्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 197 दिवस, तर रिकव्हरी रेट 93 टक्के आहे.
पुण्याची तयारी
पुण्यात कोव्हिड-19 साठी 20, 849 बेड्स आहेत
त्यातील 14,187 (68 टक्के) बेड्स उपलब्ध
ऑक्सिजन नसलेले 8743 बेड्स रिकामे
4412 ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड्स उपलब्ध
703 आयसीयू बेड्स रिक्त
आयसीयू आणि व्हॅन्टिलेटर्सचे 329 बेड्स रिक्त
(स्त्रोत- पुणे महापालिका)
"गेल्या सात महिन्यात पुण्यातील यंत्रणेने चांगलं काम केलं. त्यामळे आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि येणाऱ्या काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन तयार आहे" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ठाणे कसा करणार मुकाबला?
मुंबई, पुण्याच्या तुलनेत ठाण्यात कोरोनाचा संसर्ग उशीरा सुरू झाला आणि झपाट्याने पसरला. संसर्गाला रोखण्यासाठी आरोग्यसेवा पुरेशी नव्हती. त्यामुळे शहरात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात मुंबईपेक्षा जास्त 19,257 जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या परिस्थितीत येणारे सणासुदीचे दिवस आणि दुसऱ्या लाटेची भीती हाताळण्यासाठी ठाणे सज्ज आहे का? हे आम्ही तपासून पाहण्याचा प्रयत्न केला.
ठाण्यात बेड्सची उपलब्धता
एकूण बेड्सची संख्या- 4384
रिक्त बेड्स- 3523 (जवळपास 80 टक्के)
फक्त 861 बेड्सवर रुग्णांचे उपचार सुरू
ऑक्सिजनची सुविधा असलेले 1793 बेड्स रिक्त
आयसीयूचे 225 आणि व्हॅन्टिलेटरचे 106 बेड्स उपलब्ध
(स्त्रोत- ठाणे महापालिका)
ठाणे शहराच्या तयारीबाबत बीबीसीशी बोलताना ठाणे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी उपायुक्त संदीप माळवी म्हणाले, "कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली तरी ठाणे शहर पूर्णपणे तयार आहे. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांसाठी 90 टक्के बेड्स उपलब्ध आहेत. गेल्या सात महिन्यात आरोग्यसेवा बळकट करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं. ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटरचे 2000 पेक्षा जास्त बेड्स रिक्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होतेय. पण, येणाऱ्या काळासाठी आमची तयारी पूर्ण आहे."
 
ठाणे शहरात गेल्या 24 तासात 204 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर रिकव्हरी रेट 92 टक्के असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाल्यानंतर ठाण्यातील 5 रुग्णालयं नॉन कोव्हिड करण्यात आली आहेत.
आरोग्यसेवकांना दुसऱ्या लाटेची भीती?
महानगरांच्या तयारीबाबत बीबीसीशी बोलताना फोर्टीस-हिरानंदानी रुग्णालयाच्या जनरल फिजीशिअन डॉ. सुजाता चक्रवर्ती सांगतात, "एक आरोग्यसेवक म्हणून सणांनंतर येणाऱ्या दुसऱ्या लाटेबाबत भीती नक्की वाटते. दुसरी लाट येईल की नाही, नक्की सांगता येणार नाही. पण, कायम तयार रहावं लागेल. आरोग्य क्षेत्रासोबत लोकांनाही आपली काळजी घ्यावी लागेल. मास्कचा वापर, हात धूणे, सोशल डिस्टंसिंग पाळावं लागेल. हिवाळ्यात फुफ्फुसांचे आजार वाढतील. त्यामुळे आजाराची गुंतागुंत वाढेल. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे."
राज्यात कसे वाढले कोरोनाचे आकडे?
महाराष्ट्रात कोरोनाचा पीक सप्टेंबर महिन्यात आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 11 सप्टेंबरला राज्यात 24,886 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोनाग्रस्तांचे आकडे हळुहळू कमी होवू लागेल. 26 ऑक्टोबरला 3645, तर 29 ऑक्टोबरला 5902 रुग्णांची नोंद झाली.
राज्याच्या तयारीबाबत बोलताना राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, "दर 15 दिवसांनी, आपण येणाऱ्या 15 दिवसात किती रुग्ण येऊ शकतील याचा जिल्हा आणि महापालिका क्षेत्रानुसार अंदाच घेतो. किती रुग्णांना ऑक्सिजनची, व्हॅन्टिलेटर लागेल याचं प्रोजेक्शन केलं जातं. ही माहिती जिल्हा आणि महापालिकांना दिली जाते. जेणेकरून त्यांना पुढे तयारी करता येईल. म्हणून मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या ठिकाणी रुग्णालयं उभारण्यात आली."
फ्रान्स, जर्मनीत पुन्हा लॉकडाऊन
यूरोपमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेनंतर फ्रान्स आणि जर्मनीच्या सरकारने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलाय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी देशात दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे.
मॅक्रॉन यांनी देशाला संबोधित करताना शुक्रवारपासून (30 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या लॉकडाऊनच्या मार्गदर्शक तत्त्वांविषयी माहिती दिली.
 
याअंतर्गत नागरिकांना अतिआवश्यक कामं आणि वैद्यकीय कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहे. रेस्टॉरंट्स, बार बंद राहतील, तर शाळा आणि कारखाने सुरू राहतील.
कोरोनामुळे फ्रान्समधील मृतांचा आकडा एप्रिलनंतर आता सर्वोच्च पातळीवर आहे. मंगळवारी (27 ऑक्टोबर) देशात कोरोनाचे 33,000 नवीन रुग्ण आढळले.
मॅक्रॉन यांनी म्हटलं की, "देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका पसरला आहे. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयंकर असणार आहे, यात काही एक शंका नाही."
यापूर्वी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी म्हटलं होतं की, "देशाला त्वरित कारवाईची गरज आहे आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या राष्ट्रव्यापी प्रयत्नांची आवश्यकता आहे."