मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (15:06 IST)

शरद पवारः महाराष्ट्रानं कर्ज घेऊन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावं

उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर, इंदापुरात अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान झाल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तुळजापुरात आज (19 ऑक्टोबर) शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रानं कर्ज घेऊन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावं, असा उपाय त्यांनी या संवादामध्ये सुचवला.
 
यावेळेस बोलताना ते म्हणाले, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहणी करून गेल्यानंतर त्यांना भेटेन. अतिवृष्टीच्या संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज लागेल, तर महाराष्ट्रानं ते कर्ज घ्यावं. काही वर्षांपासून कर्जरोखे घ्यायला महाराष्ट्रानं सुरुवात केली आणि त्याला बाजारात चांगला प्रतिसाद आहे, अशी बातमी आहे. कर्ज हे डोक्यावरचं ओझं आहे. पण लोकांना बाहेर काढण्यासाठी दुसरा पर्याय नाही."
 
"अतिवृष्टीच्या संकटाला महाराष्ट्र तोंड देतोय. काही जिल्ह्यात नुकसानीचं प्रमाण जास्त आहे. सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालंय," असं पवार म्हणाले.
 
अतिवृष्टीमुळे ऊसाचं मोठं नुकसान झालं आहे. साखर कारखानदारी लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पवारांनी सांगितलं. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "एकनाथ खडसे यांचं भाजपच्या जडणघडणीत मोठं योगदान आहे. ते विविध खात्यांचे मंत्री होते. त्यांना वाटत असेल की त्यांच्या कामाची नोंद घेतली जात नाहीये तर तो त्यांचा निर्णय आहे."
 
शरद पवार यांचा आज दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. कालही (18 ऑक्टोबर) त्यांनी उस्मानाबाद परिसरात दौरा केला.
 
तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. केंद्राची वाट न पाहाता राज्याने मदत दाखल करावी असं मत त्यांनी मांडलं.
 
'एकटं राज्य तोंड देऊ शकणार नाही, केंद्राच्या मदतीची गरज'
शरद पवार यांनी काल (18 ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना भेटी दिल्या. गावकऱ्यांशी संवाद साधून पवारांनी नुकसानीचा आढावा केला.
 
"एखाद्यावेळी अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई येते, तेव्हा पीक जातं ते त्यावर्षीपुरतं. पण या संकटामुळे जमिनीची जी अवस्था झाली आहे, त्यामुळे पुढची काही वर्षे पीकच घेता येणार नाही. अतिवृष्टीचे हे संकट संपूर्ण शेतीव्यवस्था आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारं संकट आहे," असं शरद पवार काल म्हणाले होते.
 
पवार पुढे म्हणाले, "जमीन खरडवून गेली. त्यामुळे या नुकसानीचे स्वरूप हे नेहमीपेक्षा मोठे आहे. याशिवाय काही ठिकाणी कुणाच्या विहिरी होत्या, कुणाच्या पाईपलाईन होत्या, कुणी ठिबक सिंचन व्यवस्था केली होती. अन्य काही साधनं होती, तीदेखील वाहून गेली."
 
या नुकसानीला एकटं राज्य तोंड देऊ शकणार नाही, केंद्राकडून मदत मिळाली पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले. लोकप्रतिनिधींना घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संबंधित प्रतिनिधींशी बोलू, असंही आश्वासन पवारांनी दिलं.