सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (17:18 IST)

अतिवृष्टीनंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात नेते मंडळीचे दौरे

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौरा करणार आहेत. 19 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या काळात ते दौऱ्यावर असतील. विशेष गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमधून सुरुवात होईल. 
 
19 ऑक्टोबरला बारामतीमधून दौऱ्याची सुरुवात केल्यानंतर ते कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा या परिसराचा दौरा करत उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे 20 तारखेला देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तर शेवटच्या दिवशी ते 21 हिंगोली, जालना आणि औरंगाबादचा दौरा करतील. या तीन दिवसांत देवेंद्र फडणवीस 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 किमीचा प्रवास करणार आहेत.
 
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार 19 आणि 20 तारखेला मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. ते तुळजापूर, उमरगा, औसा, परंडा, उस्मानाबादमधील भागांना भेटी देतील. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपासूनच बारामतीमधून आपल्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे. यानंतर ते सोलापूर आणि इंदापूर परिसराची पाहणीही करणार आहेत. याशिवाय, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे कोकणात जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.