सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (13:33 IST)

French-Open-Tennis : श्वार्ट्झमनचा पराभव करून नदाल अंतिम फेरीत

राफेल नदालने १३व्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. लाल मातीचा बादशाह समजल्या जाणाऱ्या नदालने उपांत्य फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनवर विजय मिळवला. नदालने अंतिम फेरी गाठत रॉजर फेडररच्या २० ग्रँडस्लॅम जेतेपदांशी बरोबरी साधण्याच्या दिशेने कूच केली.
 
नदालने श्वार्ट्झमनला ६-३, ६-३, ७-६ असे नमवत १३व्या फ्रेंच ग्रँडस्लॅम जेतेपदापासून तो एक विजय दूर आहे. नदालने यंदाच्या स्पर्धेत एकही सेट न गमावण्याची कामगिरी उपांत्य फेरीतही कायम राखली. तिसऱ्या सेटमध्ये मिळालेली थोडीफार झुंज वगळता नदालचे सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण राहिले.
 
श्वार्ट्झमन कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत खेळत होता. त्याने गेल्याच महिन्यात लाल मातीवर झालेल्या इटालियन खुल्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नदालला नमवले होते. मात्र नदालने येथे अनुभव पणाला लावत विजयश्री खेचून आणली. नदालला अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिच आणि स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यातील विजेत्याशी झुंज द्यावी लागेल.