शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (15:02 IST)

उद्धव ठाकरेः ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करणार का?

श्रीकांत बंगाळे
1. माझ्या बहिणीची 5 एकर पेरूची बाग जागेवर आडवी झाली, इतका पाऊस पडलाय. बागेतली सगळी झाडं उपटून पडली. जी बाग 15 वर्षं जीव लावून सांभाळली, तिचं भविष्य झिरो झालंय. यंदा 20 ते 22 लाखांचं नुकसान होणार आहे. तलाठी पंचनामा करून गेलाय. - गोरक्षनाथ भांगे, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र
 
2. आमच्याकडे 15 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे चार एकरावरं सोयाबीन पूर्ण सडलं. शेवटी उभ्या वावरात ट्रॅक्टर फिरवावा लागला. 30 क्विंटलच्या जवळपास सोयाबीन झालं असतं, पण पावसानं तोंडचा घास पळवला. - दीपक वाघ, जालना, मराठवाडा
 
3. आमच्याकडे आठ दिवसांपासून दररोज पाऊस सुरू आहे. पावसामुळे कापूस खाली लोंबलाय, बोंडं खराब झालीय. 15 एकरवर आम्हाला साधारणपणे 150 क्विंटल कापूस होतो, यंदा 80 क्विंटलपर्यंत कापूस व्हायची शक्यता आहे. अजून काही कुणी शेताची पाहणी करायला आलं नाही. - नितेश भुरे, नांदेड, मराठवाडा
 
4. पावसामुळे आमचं सोयाबीन वाहून गेलं आहे. जी काही हाती लागली ती काळीडक पडली आहे. पाच एकरात माझा 40 क्विंटल सोयाबीन होते, यंदा ती 9 क्विंटल झाली आहे. मागच्या वर्षी पंचनामे होऊनही काहीच मदत मिळाली नाही, यंदा काय होईल माहिती नाही. - सुभाष खेत्रे, बुलडाणा, विदर्भ
 
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची ही काही प्रातिनिधिक उदाहरणं.
 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे राज्यातल्या या शेतकऱ्यांप्रमाणेच इतर शेतकऱ्यांचं हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं आहे.
 
यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवार आणि सोमवारी (18 व 19 ऑक्टोबर) मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही 9 जिल्ह्यांचा दौरा करून नुकसानीची पाहणी करणार आहे.
 
पण, नुसती पाहणी नको, ओला दुष्काळ जाहीर करून तातडीनं मदत करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यामुळे ओला दुष्काळ काय असतो आणि आणि महाराष्ट्र सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का, याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.
 
ओला दुष्काळ काय असतो?
ओला दुष्काळ ही दुष्काळाच्या विरुद्ध परिस्थिती असते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काही काळ सतत पाऊस पडल्यास त्यामुळे होणारं शेतीचं नुकसान म्हणजेच ओला दुष्काळ होय.
 
एखाद्या भागात दिवसभरात 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास आणि या पावसामुळे 33 टक्क्यांहून अधिक पिकांचं नुकसान झाल्यास त्या भागाचा समावेश ओला दुष्काळग्रस्त भागात केला जातो.
 
याअंतर्गत कोरडवाहू शेतीसाठी जवळपास 13 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायती शेतीसाठी जवळपास 18 हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई दिली जाते.
'ओला दुष्काळ जाहीर करा'
राज्यातील शेतीचं नुकसान पाहून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय, "परतीच्या पावसानं मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली पीकं नष्ट झाली आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळणं गरजेचं आहे. पण सरकारकडून फक्त पंचनाम्याचे आदेश दिले जात आहेत, यापलीकडे काही केलं जात नाही."
 
पण, राज्यात पावसामुळे शेतीच्या नुकसानीची आकडेवारी सरकारकडे जमा झाल्यानंतर ओला दुष्काळासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असं कृषीमंत्री दादा भुसे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
ते म्हणाले, "राज्यात परतीचा पाऊस सुरू आहे. ज्या ज्या भागात पाऊस झाला आहे, त्या भागातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच यासंबंधीची आकडेवारी शासनाकडे जमा होईल. त्यानंतर मग मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल."
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला विलंब करत असल्याचा आरोप केला आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "महाराष्ट्रातल्या 17 ते 18 जिल्ह्यांत परतीच्या पावसामुळे नुकसान झालं आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उदीड, कापूस ही पीकं उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करायला हवेत."
 
पण, कृषी मंत्री दादा भुसे यांना हा आरोप मान्य नाही.
 
ते म्हणाले, "राज्यात 3 ते 4 आठवड्यांपूर्वीही पाऊस झाला आहे. त्यावेळच्या पंचनाम्यांची आकडेवारी शासनाकडे आली आहे. पण, आता सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू आहेत. आताची आकडेवारी सरकारकडे आली की दोन्हीवेळची आकडेवारी बघून ओला दुष्काळ जाहीर करण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल."
 
नुकसान भरपाई किती मिळणार?
परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार किती मदत देणार, यावरुनही वाद सुरू आहे.
 
याविषयी राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गेल्या वर्षीच्या मागणीचा उच्चार केला.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये, बागायती शेतीसाठी हेक्टरी 50 हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची मागणी केली होती. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी आता ही मागणी पूर्ण करावी, अशीच आमची इच्छा आहे."
 
उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता.
 
त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं, "शेतकऱ्याला साधारणत: 25 ते 50 हजार रुपये प्रतिहेक्टर देणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कोणतीही अट न घालता तात्काळ 25 हजार रुपये प्रतिहेक्टर सरकारनं द्यावेत."
 
तर मग प्रश्न उपस्थित होतो की उद्धव ठाकरे सरकार शेतकऱ्यांना आता किती मदत करणार?
 
हाच प्रश्न आम्ही कृषीमंत्री दादा भुसे यांनी विचारला.
 
यावर भुसे म्हणाले, "पावसामुळे झालेल्या नुकसानीची अंतिम आकडेवारी शासनाकडे आल्यानंतर किती क्षेत्राचं आणि कोणत्या पिकांचं नुकसान झालं आहे, ते पाहिलं जाईल. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल आणि मग किती मदत द्यायची हे ठरवलं जाईल. पण, शेतकरी बांधवांना मदत मिळालीच पाहिजे, असं सरकारचं धोरण आहे."