बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2019 (12:16 IST)

बालभारती नवीन अभ्यासक्रम : छत्तीसचे 'तीस सहा' केल्यानं मराठीचं 'गणित' सुटेल का?

मिनाज लाटकर
 
मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आता अकरा ऐवजी 'दहा एक' वाचा, पंचवीस ऐवजी 'वीस पाच' वाचा, अशा सूचना बालभारतीने केल्या आहेत. जोडाक्षरांचा किचकटपणा टाळण्यासाठी तसंच मराठी भाषा सोपी करण्याच्या उद्देशाने हा बदल केल्याचं बालभारतीचं म्हणणं आहे.
 
या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुसरीच्या अभ्यासक्रमात झालेला हा बदल शिक्षकांसाठी एक धक्काच होता.
 
या पुस्तकात नवी आणि जुनी पद्धत, अशा दोन्ही स्वरूपात मांडणी देण्यात आली आहे. या वर्षापासून शिक्षकांना याच पद्धतीने शिकवायच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
पाठ्यपुस्तकांमध्ये संख्यानामांबरोबर हा नवा बदल झाल्याचे दिसून येताच दोन दिवस महाराष्ट्रभर यावर चर्चा सुरू आहे. संख्यानामं हे मराठीचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये अचानक बदल केल्यामुळे नक्की काय साध्य होणार असा प्रश्न सोशल मीडियासह सर्वत्र विचारला जातोय. तसेच अतीसुलभीकरणाच्या नावाखाली मराठी भाषेचं सौंदर्य जाईल अशीही भीती व्यक्त होत आहे.
 
गणित शिकण्यासाठी मुलांना ही नवी पद्धत उपयोगी ठरेल, असं मत बहुतांश शिक्षणतज्ज्ञांनी आणि भाषा अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे. मात्र अचानक ही पद्धत वापरात आल्यामुळं गणित शिकवणारे शिक्षक आणि मुलं यांना थोडंसं जड जाईल अशी काळजीही त्यांनी व्यक्त केली. रूढ पद्धतींमुळे जर गणित, आकडे शिकण्यासाठी अडथळे येत असतील तर नव्या पद्धतींचा आणि इतर भाषांनी उपयोगात आणलेल्या पद्धतींचाही विचार केला पाहिजे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
 
'गणित शिकण्याच्या वाटेतील खडे आणि काटे काढून टाकायचे होते'
बालभारतीच्या गणित समितीच्या अध्यक्षा डॉ. मंगला नारळीकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, की आकड्यांमधील ही जोडाक्षरं मुलांना गोंधळात टाकणारी होती. त्यामुळे काही संख्यांचं वाचन दुसऱ्या पद्धतीनेही करता येतं हे सांगण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. यामध्ये भाषेला धक्का लावण्याचा कोणताही हेतू नाही.
 
"नव्या पद्धतीबरोबर जुनी पद्धतही राहाणार आहे. ती बाद ठरवलेली नाही. मुलांना आपल्याला हवी ती पद्धत निवडू द्या. 63 हा आकडा शब्दांमध्ये लिहिताना आधी तीन येत असेल किंवा 98 हा आकडा लिहिताना आधी आठ लिहावे लागत असेल तर दुसरीमधील विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. अशामुळे गणिताबद्दल त्यांच्या मनात राग, भीती, नावड तयार होते. म्हणून त्यांच्या गणित शिकण्य़ाच्या मार्गातील खडे आणि काटे आम्हाला काढून टाकण्यासाठी दोन्ही पद्धतींचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे."
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष वसंत काळपांडे यांना ही बदललेली पद्धत योग्य वाटते. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "रूढ पद्धतीनं जे संख्यावाचन होतं, ती पद्धत विद्यार्थ्यांना समजायला अवघड जाते. त्यामुळे प्राथमिक वर्गांमध्ये गणित शिकत असताना नवीन अवलंबलेली पद्धत उपयोगी पडेल. कारण गणितात शंभरच्या पुढे संख्या गेली की संख्यावाचन सोपं होतं, पण दोन अंकी संख्या आणि त्यांची एकेक किंमत समजायला विद्यार्थ्यांना कठीण जाते. पण ही नवीन पद्धत अतिशय उपयुक्त आहे, कारण विद्यार्थ्यांचा प्राथमिक पाया जोपर्यंत पक्का होत नाही तोपर्यंत गणित समजत नाही."
 
"गणितातल्या ज्या मूलभूत प्रक्रिया आहेत, म्हणजेच वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार या विद्यार्थ्यांना व्यवस्थित जमत नाहीत. त्यामुळे आकडे समजून घेण्याची ही पद्धत खूप उपयुक्त आहे," असं काळपांडे यांना वाटतं. शिक्षकांना हा बदल एकदम अनपेक्षित होता, पण त्यांना हा सुखद धक्का बसला आहे, असंही ते सांगतात.
 
" या पद्धतीने गणित समजायला सोपं होईल अशी प्रतिक्रिया मला अनेक शिक्षकांनी दिली आहे. पण हा बदल फक्त प्राथमिक शिक्षणापुरताच मर्यादित आहे. हा बदल सार्वत्रिक होणे फार कठीण आहे. बालभारतीचा तसा बदल करण्याचा विचार नाही. संख्यावाचन करताना 'वीस पाच' म्हणजे पंचवीस अशा पद्धतीने शिकवले जाईल. त्यामुळे मुलांचा कोणताही गोंधळ होणार नसून त्यांना गणित समजायला सोपं जाईल," असं काळपांडे यांनी म्हटलं.
 
'भाषेपेक्षा मुलांना विषय समजणं महत्त्वाचं'
 
लेखिका माधुरी पुरंदरे यांच्या मते हा फक्त भाषेचा प्रश्न नाही तर गणिताचा आहे. त्या म्हणतात, "मुलांना या पद्धतीनं शिकणं सोपं जात असेल आणि गणितज्ज्ञांनी विचार करून ठरवलं असेल तर या पद्धतीचे बदल केले पाहिजेत.
 
शाळेत शिकत असताना वेगवेगळया सामाजिक आणि बौद्धिक स्तरातील विद्यार्थी येतात. या पद्धतीने समजत असेल तर भाषेत तसे बदल केले पाहिजेत. हे बदल स्वीकारायला थोडा वेळ लागेल, पण मग मुलांना विषय समजणं जास्त महत्त्वाचं आहे."
 
"रूढ असलेली पद्धत आपण सगळे स्वीकारत जातो. पण सोपं काय, अवघड काय याचा विचार तज्ज्ञांनी केला पाहिजे आणि भाषेत बदल केले पाहिजे," असंही त्यांनी सांगितलं.
 
'निर्णय चांगला पण पूर्वतयारी हवी होती'
कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील कन्या विद्यामंदिरचे कृष्णा कोरे सांगतात," शिक्षक म्हणून मला हा निर्णय योग्य आणि सकारात्मक वाटतो. गणिताची एकूण आकडेवारी मुलांना अवघड वाटत असते. त्यात त्यांना जोडाक्षरं समजायला कठीण जातात. त्यामुळे जोडाक्षरांची अशी फोड विद्यार्थ्यांना सोपी जाईल.
 
"पण हा निर्णय असा अचानक राबवणे योग्य नाही. यासाठी शिक्षकांची काही पूर्वतयारी होणं गरजेचं होतं. कारण हा बदल शिक्षकांनी स्वीकारणं, त्यांच्या अंगवळणी पडणं जास्त गरजेचं आहे. इतक्या वर्षांच्या शिकवण्याच्या पद्धतीत असा अचानक बदल केला तर शिक्षक कसे शिकवतील? त्यामुळे हा निर्णय जरी योग्य आणि सकारात्मक असला तरी शिक्षक गणित शिकविण्यात हा बदल कशाप्रकारे करतील यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. "
 
'आकडे सोपे करण्याची गरज'
शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी या नवीन पद्धतीचं स्वागत केलं आहे. "विद्यार्थ्यांना वजाबाकी, गुणाकार, भागाकार करताना जर संख्यावाचन येत नसेल तर या क्रिया करताना त्यांना अडचणी येतात," असं त्यांनी सांगितलं.
 
"महाराष्ट्रातील 200 शाळांमधील एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना मला लक्षात आलं, की विद्यार्थ्यांना दशक आणि एकक या संकल्पनाच समजत नाहीत. इंग्रजी भाषेत जसे अंक उच्चारले जातात 'फिफ्टी फोर' वगैरे त्यातून दशक-एकक स्पष्ट होतात. मराठीत मात्र चोवीस, पंच्चावन्न अशा उच्चारांमुळे एकक दशक स्पष्ट होत नाहीत. तर अठ्यात्तर की अस्ठ्यांत्तर, एकोणीस की एकोणावीस अशा उच्चारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत असतो. त्यामुळे गणिताचा तणाव कमी करण्यासाठी आकडे सोपे करण्याची गरज आहे."
 
बालभारतीचे संचालक सुनील मगर यांच्यानुसार, "हा बदल अचानक केला नाही. मागच्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात हा बदल केला होता. आता दुसरीच्या वर्गात केला गेला आहे आणि गणित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावरूनच हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात अशा बदललेल्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे, याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल. "