मोहम्मद मोर्सी: न्यायालयातील सुनावणी सुरू असतानाच इजिप्तच्या माजी राष्ट्रपतींचं निधन
इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांचं न्यायालयातील सुनावणीदरम्यानच निधन झाल्याची बातमी इजिप्तच्या सरकारी वाहिनीनं दिली आहे. न्यायालयातील कामकाजानंतर मोर्सी बेशुद्ध पडले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
67 वर्षांच्या मोहम्मद मोर्सी यांच्यावर हेरगिरीचे आरोप होते. 2013 साली लष्करानं उठाव करून त्यांना पदच्युत केलं होतं.
मोर्सी सत्तेवर आल्यानंतर वर्षभरातच इजिप्तमध्ये आंदोलन-निदर्शनांना सुरुवात झाली होती. त्यानंतर लष्करानं उठाव करून मोर्सींना अटक केली होती. मोर्सींच्या अटकेनंतर त्यांच्या तसंच मुस्लिम ब्रदरहूडच्या समर्थकांविरोधात मोहीमच हाती घेण्यात आली.
मोहम्मद मोर्सी यांच्याशी संबंधित प्रकरणांची सुनावणी राजधानी काहिरामध्ये सुरू होती. त्यांच्यावर पॅलेस्टाइनमधील मुस्लिम गट हमाससाठी हेरगिरी करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
सोमवारी सुनावणीसाठी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. न्यायालयासमोर आपली बाजू मांडल्यानंतर ते बेशुद्ध झाले. मोर्सी यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेचे व्रण नसल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं आहे. सरकारी वकिलांनी ही माहिती दिली.
तुरूंगवासात असलेल्या मोर्सी यांची प्रकृती बऱ्याच काळापासून चिंताजनक होती. आपल्या वडिलांना वेगळं ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत नसल्याचा आरोप मोर्सी यांचा धाकटा मुलगा अब्दुल्लानं गेल्या वर्षीच ऑक्टोबर महिन्यात केला होता. मोर्सी यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह होता.
पाच महिन्यांपूर्वी अब्दुल्ला यांन वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं, की इजिप्त सरकारला मोर्सी यांचा मृत्यू हवा आहे. त्यांना लवकरात लवकर नैसर्गिक मृत्यू यावा म्हणूनच त्यांना कोणतेही उपचार दिले जात नाहीयेत.