गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 15 जून 2019 (12:41 IST)

इंग्लंडमधल्या पावसाचं करायचं तरी काय?

वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये सुरू झाला आहे मात्र खेळापेक्षा चर्चा आहे ती पावसाची. वर्ल्ड कपच्या आनंदावर विरजण घालण्याचं काम पाऊस करत आहे. गुरुवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना एकही बॉल न टाकता रद्द करण्यात आला.
 
यंदाच्या स्पर्धेतला पावसामुळे रद्द झालेला हा चौथा सामना.
 
हा बारावा वर्ल्ड कप आहे. याआधीचे वर्ल्ड कप मिळून 402 सामने झाले आहेत आणि त्यापैकी फक्त 2 सामने रद्द झाले आहेत.
 
याच्या तुलनेत यंदाच्या वर्ल्ड कपच्या 18 सामन्यांपैकी 4 पावसामुळे रद्द करावे लागले आहेत.
 
आपल्या लाडक्या संघाला पाठिंबा देण्यासाठी जगभरातून चाहते इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. पावसामुळे सामने होत नसल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड होत आहे. प्रक्षेपणकर्त्या कंपनीचंही नुकसान होत आहे.
 
पावसामुळे सामना रद्द होत असल्याने दोन्ही संघांना गुण विभागून देण्यात येत आहेत.
 
सेमी फायनलमध्ये स्थान पटकावण्यासाठी जास्तीत जास्त गुण मिळवण्याची स्पर्धा असताना, गुण विभागून दिलं जाणं कोणत्याही संघासाठी नुकसानदायी आहे.
 
पावसाने वाहून जाणाऱ्या सामन्यांवर उतारा काय?
 
छताचा पर्याय आहे का?
विम्बल्डन तसंच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धांमध्ये पाऊस आल्यास कोर्टवर छप्पर येतं. हे उघडझाप करता येणारं छप्पर असतं. गरज पडेल तेव्हा ते उघडतं. परिस्थिती सर्वसामान्य असताना ते बंद राहतं.
 
अशा स्वरूपाचं आच्छादन किंवा छत क्रिकेट स्टेडियममध्ये बसवलं जाऊ शकतं का?
 
क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत टेनिस कोर्ट लहान असतं. क्रिकेट स्टेडियमवर आच्छादन किंवा छत घालणं खर्चिक आहे. हे काम गुंतागुंतीचंही आहे.
 
इंग्लंडमधली मैदानं वेगवेगळ्या आकाराची आहेत. त्यामुळे प्रत्येक मैदानावर आच्छादन बसवणं हे स्वतंत्र आव्हान आहे.
 
विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर असं उघडझाप होणारं आच्छादन बसवण्यासाठी 100 मिलिअन युरो एवढा प्रचंड खर्च झाला होता. विम्बल्डन स्पर्धा एकाच प्रांगणात होते. वर्ल्ड कपचे सामने 11 विविध ठिकाणी होत आहेत.
 
वर्ल्ड कप आयोजनाचा खर्च तसाही प्रचंड आहे. अकराच्या अकरा स्टेडियमवर आच्छादन बसवणं संयोजकांवर आर्थिक बोजा टाकू शकतं.
 
ऑस्ट्रेलियात डॉकलँड्स स्टेडियमवर कायमस्वरूपी आच्छादन आहे. तिथे काही आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. मात्र षटकार मारताना बॉल छताला लागून खाली पडल्याचे प्रसंग घडले आहेत. याव्यतिरिक्त खुल्या वातावरणात गवताचा, वाऱ्याचा, हवामानाचा परिणाम बॉलच्या हालचालीवर होतो. बॉल स्विंग होतो.
 
ते सगळं इनडोअर स्टेडियमध्ये होईलच याची शाश्वती नाही. इनडोअर स्टेडियम बंदिस्तच असल्याने कायम कृत्रिम प्रकाशातच खेळ होतो. बॉल दिसण्यात यामुळे अडचण होऊ शकते. काही प्रयोगांनंतर ऑस्ट्रेलियानेही डॉकलँड्स स्टेडियमवर सामने खेळलेले नाहीत.
 
अख्ख्या मैदानावर कव्हर घालता येईल का?
इंग्लंडच्या तुलनेत श्रीलंकेत प्रचंड पाऊस पडतो. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यावेळी पाऊस पडल्यानंतर ग्राऊंडस्टाफ अख्ख्या मैदानावर कव्हर घालताना क्रिकेट चाहत्यांनी पाहिलं. वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे सामने रद्द होऊ लागल्यावर चाहत्यांनी श्रीलंकेचं उदाहरण देत असं करता येऊ शकतं का असा प्रश्न विचारला?
 
संपूर्ण आऊटफिल्डवर कव्हर घातलं तर मैदानात ओल राहत नाही. मैदान खेळाडूंसाठी सुरक्षित बनतं. सगळं मैदान आच्छादित राहिल्याने खेळाडू घसरून पडण्याची शक्यताही कमी होते. एरव्ही फक्त खेळपट्टीवर कव्हर असतं आणि बाकी मैदान मोकळं असतं. अख्खं मैदान कव्हर केलं तर खेळ लवकरात लवकर सुरू होऊ शकतो.
 
भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यानच्या सामन्यात खेळपट्टीवर कव्हर अंथरण्यात आलं होतं. मात्र बाकी मैदान मोकळंच होतं. यामुळे अनेक ठिकाणी निसरडं आणि ओलसरपणा राहिला होता. अशा मैदानात खेळणं खेळाडूंच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
 
संपूर्ण मैदानावर कव्हर घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज असते. पावसाची चाहूल लागताच झटपट मैदानात येऊन अख्ख्या मैदानाला कव्हर घालण्याचं काम वेगाने करू शकतील अशा कौशल्यपूर्ण माणसांची आवश्यकता आहे.
 
युकेत, एजबॅस्टन मैदानावर ब्रम्बेला नावाची व्यवस्था 1981 ते 2001 या कालावधीत होती. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ही पद्धत बंद केली. कारण पिच कव्हर केल्याने खेळपट्टी ओलसर होत असल्याचं निष्पन्न झाल्याने ही पद्धत बंद करण्यात आली.
 
राखीव दिवस
इंग्लंडमध्ये 1999 मध्ये वर्ल्ड कपचं आयोजन झालं होतं. त्यावेळी सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आले होते. मात्र या वर्ल्ड कपच्या राऊंड रॉबिन अर्थात प्राथमिक फेरीसाठी राखीव सामन्यांची व्यवस्था नाही. फक्त सेमी फायनलचे दोन सामने आणि फायनलसाठी राखीव दिवसाची व्यवस्था आहे.
 
माणूस आता चंद्रावर गेला आहे. मात्र एका मोठ्या स्पर्धेसाठी राखीव दिवसांची व्यवस्था नाही असे उद्गार बांगलादेशचे प्रशिक्षक स्टीव्ह ऱ्होडस यांनी काढले होते. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील लढत पावसामुळे रद्द झाली होती. त्यानंतर ते बोलत होते.
 
प्राथमिक फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवणं तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण आहे. यामुळे आर्थिक बोजाही वाढतो असं स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी दिलं होतं.
 
पावसात खेळणं शक्य आहे का?
पावसात फुटबॉलचे सामने होतात मात्र पाऊस पडत असताना क्रिकेट खेळणं खेळाडूंच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकतं.
 
पावसामुळे बॉल ग्रिप करणं बॉलर्ससाठी अवघड होऊ शकतं.