बीबीसीकडून दिल्या जाणाऱ्या बीबीसी स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर पुरस्काराची घोषणा आज सायंकाळी सात वाजता नवी दिल्ली येथे होणार आहे.
तब्बल दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज विजेत्याचं नाव जाहीर होणार असल्यामुळे पुरस्काराबाबत उत्सुकता वाढली आहे.
बीबीसी स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर पुरस्कारासोबतच बीबीसी सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महिला खेळाडू तसंच बीबीसी लाईफटाईम अॅचिव्हमेंट अॅवॉर्डसुद्धा आज देण्यात येईल.
वरील पुरस्कारांसोबतच यावेळी बीबीसीकडून टोकियो ऑलिम्पिक, पॅरॉलिम्पिक स्पर्धेतील महिला खेळाडू आणि महिला हॉकी संघातील खेळाडू यांनाही गौरवण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यास बीबीसी संस्थेचे महासंचालक टीम डेव्ही यांच्यासह क्रीडा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची उपस्थिती असणार आहे.
बीबीसी न्यूजच्या सर्व भारतीय भाषांच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया पेजवर तुम्ही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता.
विजेत्याची निवड कशी होणार?
बीबीसीने निश्चित केलेल्या ज्युरींकडून या पुरस्कारांसाठी भारतीय महिला खेळाडूंना नामांकनं देण्यात आली. ज्युरींमध्ये ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि लेखक यांचा समावेश आहे.
ज्युरींकडून सर्वाधिक मते मिळालेल्या पहिल्या पाच महिला खेळाडूंना या पुरस्कारांचं नामांकन देण्यात आलं.
या महिला खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आल्यानंतर 8 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन मतदान घेण्यात आलं.
गेल्या वर्षी 2020 मध्ये बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिने बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर पुरस्कार पटकावला होता.
यावेळी नेमबाज मनू भाकर हिला बीबीसीचा सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळाला. तर बीबीसी लाईफटाईम अॅचिव्हमेंट पुरस्कार हा अॅथलीट अंजू बॉबी जॉर्ज यांना प्रदान करण्यात आला होता.
यंदाचे नामांकनप्राप्त खेळाडू
आदिती अशोक
आदिती अशोक हिने गोल्फ खेळप्रकारात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. तिने 2016 मध्ये गोल्फ खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी ती फक्त 18 वर्षांची होती. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही तिने सहभाग नोंदवला.
ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्फ खेळात प्रतिनिधित्व करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. इतकंच नव्हे तर या स्पर्धेत सहभागी होणारी ती सर्वात कमी वयाची भारतीय खेळाडू होती.
याशिवाय, 23 वर्षीय आदिती अशोक टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही सहभागी झाली होती. या स्पर्धेत फक्त काही अंकांच्या फरकामुळे ती चौथ्या स्थानी राहिली.
गोल्फ खेळात आदितीने मिळवलेल्या यशामुळे भारतात या खेळाविषयी रस वाढला आहे. पूर्वी फारच कमी लोकांना माहिती असलेल्या या खेळाबद्दल आता चर्चा होऊ लागली आहे.
याशिवाय, 2016 मध्ये लेडीज युरोपियन टूर स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याची कामगिरीही आदितीने करून दाखवली होती. 20 डिसेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार आदिती जगभरात 125 व्या स्थानी होती.
अवनी लेखारा
20 वर्षीय अवनी लेखारा ही पॅरॉलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
अवनीने टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 कॅटेगरीत नवा विक्रम प्रस्थापित केला होता.
याशिवाय महिलांच्या 50 मीटर रायफर 3 पोझिशन SH1 कॅटेगरीत तिने कांस्य पदक पटकावलं आहे.
बालपणी एका भीषण कार अपघातात अवनी जखमी झाली होती.
यावेळी तिच्या शरीराच्या कंबरेखालील भागास इजा पोहोचून अर्धांगवायूचा झटका आला.
यानंतर अवनीच्या वडिलांनी तिला नेमबाजी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तेव्हापासून अवनीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. खेळण्यासोबतच अवनी सध्या कायद्याचं शिक्षणही घेत आहे.
लव्हलिना बोरगोहांई
लव्हलिना बोरगोहांईने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंग खेळप्रकारात कांस्यपदक पटकावलं आहे.
याव्यतिरिक्त लव्हलिनाने विविध स्पर्धांमध्ये पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे.
इंडिया ओपनच्या पहिल्याच स्पर्धेत 2018 मध्ये तिने सुवर्णपदक पटकावल्यानंतर तिने जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर तिने ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधित्व केलं.
ईशान्य भारतातील आसाम राज्यात जन्मलेल्या 24 वर्षीय लव्हलिनाने आपल्या दोन मोठ्या बहिणींकडून बॉक्सिंग खेळण्याची प्रेरणा घेतली आहे.
मिराबाई चानू
वेटलिफ्टिंग चॅम्पियन सायखोम मिराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली.
अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय वेटलिफ्टर ठरल्यामुळे देशभरात तिच्या कामगिरीचं कौतुक झालं.
2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही मिराबाई चानूने सहभाग नोंदवला होता. पण त्यावेळी ती अपयशी ठरली. मात्र पुढच्याच वर्षी जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून तिने याची कसर भरून काढली.
मिराबाई ही ईशान्य भारतातील मणिपूर या राज्याचं प्रतिनिधित्व करते. ती एका चहाची टपरी चालवणाऱ्याची मुलगी असल्यामुळे तिच्या यशाला महत्त्व प्राप्त होतं.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तिने आपल्या खेळातील कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या असंख्य अडचणींना दूर सारून तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या नावाची दखल सर्वांना घेण्यास भाग पाडलं.
पी. व्ही. सिंधू
बॅडमिंटनपटू पुसरला वेंकटा सिंधू अर्थात पी. व्ही. सिंधू हिने सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे.
पहिल्यांदा रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य तर गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकलं आहे.
सिंधूच्या लक्षवेधी कामगिरीचं सत्र अजूनही सुरूच आहे. 2021 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावण्याची किमया केली.
2019 मध्ये तिने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावलं होतं.
वयाच्या 17 व्या वर्षीच 2012 मध्ये सिंधू BWF जागतिक क्रमवारीत पहिल्या 20 खेळाडूंमध्ये पोहोचली होती.
2018 आणि 2019 च्या फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला अॅथलीटच्या यादीत सिंधूचा समावेश होता.
याशिवाय, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईअर पुरस्काराची सुरुवात झाली तेव्हा 2019 चा पुरस्कार पी. व्ही. सिंधूनेच पटकावला होता, हे विशेष.