1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 27 मार्च 2022 (13:38 IST)

पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा पुन्हा भडका

Petrol-diesel prices rise again पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा पुन्हा भडकाMarathi Business News In Webdunia Marathi
इंधन भडक्याने सर्वसामान्य माणसाचं आयुष्य त्रस्त झालं आहे. रविवारी पेट्रोल 50 पैशांनी, तर डिझेल 55 पैशांनी वाढले. त्यामुळे सहा दिवसात 3 रुपये 75 पैशांपर्यंत ही इंधन दरवाढ झाली आहे.
 
मुंबईत पेट्रोलचे दर 113 रुपये 35 पैशांवरून 113 रुपये 85 पैसे झाले आहेत. डिझेलचे दरही 97 रुपये 55 पैशांवरून 98 रुपये 10 पैसे झालेत. दिल्लीत पेट्रोल 98 रुपये 61 पैशांवरून 99 रुपये 11 पैसे झाले, तर डिझेल 89 रुपये 87 पैशांवरून 90 रुपये 42 पैशांवर गेले.
 
मागील 6 दिवसात पाचव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं गणित कोलमडण्याती स्थिती आहे. सीएनजीवरील व्हॅट 13.5 टक्क्यांवरून 3 टक्के केल्याने किलोमागे किमान पाच रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने सहा महिन्यात सीएनजीचे दर 11.43 रुपयांनी वाढवलेले असताना राज्याने सीएनजी वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. व्हॅट कपात 1 एप्रिलपासून लागू होत आहेत.
 
प्रत्येक राज्यात इंधनाचे दर वेगळे आहेत. संबंधित राज्यांच्या स्थानिक कर आकारणीतील फरकामुळे या दरांमध्ये थोडी तफावत दिसते.
 
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भाव 130 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचला होता. पण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. कच्च्या तेलाची किंमत सध्या 112 डॉलरच्या घरात आहे.
 
राज्य स्तरावर इंधनावर लागणार व्हॅट वेगवेगळा असल्याने शहरांमधील इंधनाच्या दरातही फरक असतो. 3 नोव्हेंबरला केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हटवल्यानंतर किंमती स्थिर होत्या. बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशसहित अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरपेक्षा अधिक दराने विकलं जात आहे.
 
महाराष्ट्रामध्ये 100 रुपयाचं पेट्रोल भरल्यास त्यापैकी 52.5 रुपये हे कर म्हणून आकारले जातात. महाराष्ट्रात सर्वाधिक कर गोळा केला जातो. केंद्रीय कर आणि राज्याचा कर अशी विभागणी असते. पेट्रोलियम मंत्रालयाचा भाग असणाऱ्या पेट्रोलियम प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅनलिसिस सेलच्या आकड्यांनुसार हे स्पष्ट झालं आहे.
 
दिल्लीत हे प्रमाण 100 रुपयांमागे 45.30 रुपये इतकं आहे.
 
100 रुपयांच्या इंधनावर 50 रुपयांहून अधिक रक्कम कर म्हणून घेणाऱ्या राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये केंद्रीय करापेक्षा अधिक कर हा राज्य सरकारच्या तिजोरीत जातो. यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांचा समावेश आहे.
 
केंद्रीय कर हा 27.9 रुपये प्रति लिटर इतका निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक राज्यामध्ये व्हॅट हा वेगवेगळा आकारला जात असल्याने दरांमधील फरक दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये 25 टक्के व्हॅटबरोबरच 10.12 रुपये प्रति लिटर कर आणि केंद्र सरकारकडून घेण्यात येणारा कर अशी रक्कम आकारली जाते. त्यातही मुंबई, ठाणे, अमरावती आणि औरंगाबादमध्ये एक टक्का अधिक व्हॅट आकारला जातो.