1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 27 मार्च 2022 (10:16 IST)

CNG 7-8 रुपयांनी स्वस्त होणार, रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा

अर्थसंकल्पातील घोषणेनुसार 'सीएनजी'वरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) दहा टक्के कपात करण्याची अधिसूचना शनिवारी जारी करण्यात आली होती. त्याप्रमाणे 1 एप्रिलपासून हा वायू राज्यात प्रती किलो 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होईल,

सध्या 'सीएनजी'वर 13.5 टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारण्यात येतो. त्यात 10 टक्के कपात करून तो तीन टक्के करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. त्यानुसार वित्त विभागाने करात कपात करण्याची अधिसूचना जारी केली असून ती राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली.

नैसर्गिक वायूवर तीन टक्के मूल्यवर्धित कर आकारला जाईल, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. हा बदल येत्या शुक्रवारपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून अमलात येईल. या निर्णयामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. त्याचा फायदा रिक्षा, टॅक्सी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना तसेच त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.