जायरा वसीम: बॉलीवुड सोडण्याच्या निर्णयामुळे 'दंगल गर्ल' झाली ट्रोल
दंगल आणि सिक्रेट सुपरस्टारसारख्या चित्रपटांतून झळकलेली बालकलाकार जायरा वसीमने हिंदी चित्रपटसृष्टी सोडली. बॉलीवुड का सोडत आहे याचं कारण देताना जायराने एक फेसबुक पोस्ट लिहिली. तिच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
काही जणांनी तिच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे तर काही जणांनी तिच्यावर टीका केली आहे. बंगाली लेखिका तसलिमा नसरीनने म्हटलं की जायरा वसीमने घेतलेला निर्णय मूर्खपणाचा आहे.
त्यांनी लिहिलं आहे की " ओ माय गूजबम्पस्. बॉलीवुडमधली गुणी अभिनेत्री जायरा सांगत आहे की बॉलीवुडमुळे तिची अल्लाहवरील श्रद्धा कमी झाली. आणि तिने बॉलीवुड सोडलं. काय मूर्खपणाचा निर्णय आहे. मुस्लीम समुदायातल्या कित्येक गुणी मुलींना बुरख्याच्या काळोखात लोटलं जात आहे."
दिल्लीत पत्रकारितेचं शिक्षण घेणारी खुशबू लिहिते, बॉलीवुड सोडायचं आहे तर खुशाल सोडा पण आपल्या फेसबुक पोस्टवर कुराणची शिकवण द्यायची गरज काय? जर तुम्हाला एखादं काम आवडत नसेल तर ते सोडा पण प्रमोशन करायची काय गरज आहे.
तिच्या या निर्णयानंतर मुस्लीम समुदायातील टीव्ही अभिनेत्याने म्हटलं आहे की मी अभिनय करतो आणि ते इस्लामविरुद्ध नाही. टीव्ही अभिनेता इकबाल खान म्हणतो जर जायराला अॅक्टिंग सोडायची असेल तर काही हरकत नाही. हा तिचा स्वतःचा निर्णय आहे. कदाचित ती जे करत असेल ते चुकीचं असेल आणि आता तिला ते करावंसं वाटत नसेल. मी एक अभिनेता आहे आणि मी काही चुकीचं वागत नाही आणि माझं काम मला इस्लामचं पालन करण्यापासून रोखत नाही.
कॅनडातले अभ्यासक तारेक फतेह यांनी ट्वीट केलं आहे. दंगल स्टार जायरा वसीमने बॉलीवुड सोडलं आणि म्हटलं की इस्लामला यापासून धोका होता. जायरा पुढे काय करणार? बुरखा की नकाब?
जायराच्या निर्णयाचं समर्थन देखील केलं जात आहे.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी म्हटलं आहे की तिच्या निर्णयावर टीका करणारे आपण कोण आहोत? हे तिचं आयुष्य आहे. तिला हवं तसं तिनं जगावं. मला आशा वाटते की ती यापुढे जे काही करेल त्यात तिला आनंद मिळेल.
फोटोग्राफर विरल भयानी सांगतात की मी जायरा वसीम माझ्या नेहमी लक्षात राहील. ती खूप वेगळी होती. ती अगदी थोडंच स्मितहास्य करत असे आणि फोटो देण्यासाठी फारशी उत्सुक नसे. पण तिच्यासोबत काम करणं हे मला आव्हानात्मक वाटायचं. तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
बॉलीवुडमध्ये काही चित्रपटांत काम केलेली पाकिस्तानी अभिनेत्री यांनी फ्रीडम ऑफ चॉइस असं म्हणत ट्वीट केलं आहे. जायराला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असताना असा निर्णय घेणं नक्कीच कठीण गेलं असणार. तुझा इथवरचा प्रवास अवर्णनीय होता. आत्मचिंतन करून तुला हा निर्णय घ्यावा वाटला याचं मी कौतुक करते.
पण फिल्म इंडस्ट्रीतल्या काही लोकांनी या निर्णयावर टीका केली आहे. अभिनेता हनुमान सिंह सांगतात, आम्ही अभिनेते लोक विविध भूमिका अंगीकारूनही सर्व धर्मांना अंगीकारतो. आपल्या सर्वांना हा जन्म एकदाच मिळाला आहे. असं असलं तरी सर्व जाती, वय, नाती, भूमिका आणि धर्म आम्ही एकाच वेळी जगत असतो, अनुभवत असतो. आपल्याला अभिनेता बनण्याचं वरदान मिळालेलं आहे. जायरा वसीम तू एक गुणी अभिनेत्री आहेस. अभिनेता म्हणून कॅमेऱ्याशी प्रामाणिक राहणं हाच कलाकारांचा धर्म आहे.
जायराला बॉलीवुडमध्ये संधी देणाऱ्या आमीर खाननं अद्याप यावर काही ट्वीट केलेलं नाही.